नाशिकरोड/देवळाली कॅम्प । प्रतिनिधी Nashikroad / Deolali Camp
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील देवळालीसह, धुळे, लासलगाव, मूर्तीजापूर या नव्याने विकसित केलेल्या अमृत भारत रेल्वे स्थानकांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संपन्न झाले.
देवळाली कॅम्प रेल्वे स्थानकांवरील लोकार्पण सोहळ्यांवेळी भाजप जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, ब्रिगेडियर आर. के. सैनी, देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड नामनिर्देशित सदस्य सचिन ठाकरे, भाजप जिल्हा सरचिटणीस शरद कासार, सिम्बॉयसिस विद्यापीठ संचालक सी. आर. पाटील, माजी नगरसेवक बाबुराव मोजाड, शंकर एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. गुजर सुभाष शाळेचे सचिव रतन चावला, भाजप पर्यावरण आघाडीचे तानाजी भोर, प्रसाद आडके, नीलेश बंगाली, प्रकाश कर्डीले, देवळाली कॅम्प रेल्वेस्थानक प्रबंधक आर. के. कुठार यांच्यासह पुरस्कार विजेते, स्वातंत्र्यसैनिक, राज्य प्रशासनाचे अधिकारी, बँक व डाकघरांचे अधिकारी, शालेय विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, क्षेत्रीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समिती, मंडळ उपभोक्ता सल्लागार समिती, स्थानक सल्लागार समिती यांचे सदस्य उपस्थित होते.
अमृत रेल्वे स्थानक योजनेतंर्गत देवळाली कॅम्प येथे शाळांमध्ये निबंध व चित्रकला स्पर्धा झाल्या. या स्पर्धांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यानंतर देशभक्तिपर सांस्कृतिक कार्यक्रम झाले. सचिन ठाकरे यांनी सभेला मार्गदर्शन केले. महेंद्र चौथमल यांनी सूत्रसंचालन केले. जयश्री बोडके यांनी आभार मानले.
देशभरातील 103 पुनर्विकसित अमृत भारत रेल्वे स्थानकांचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते या स्थानकांचा विकास ‘अमृत भारत स्टेशन योजना’अंतर्गत करण्यात आला असून, यामध्ये मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील देवळाली, मूर्तिजापूर, धुळे व लासलगाव स्थानकांचा समावेश आहे.
या स्थानकांवर भव्य प्रवेशद्वार, आकर्षक फसाड, हाय मास्ट लायटिंग, आधुनिक प्रतीक्षालय, तिकीट काऊंटर, सुसज्ज स्वच्छतागृहे आणि दिव्यांग व वृद्ध प्रवाशांसाठी रॅम्प यांसारख्या आधुनिक सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. प्लॅटफार्म कव्हर शेड, कोच इंडिकेशन प्रणाली आणि डिजिटल डिस्प्लेही लावण्यात आले आहेत.
.
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुविधेसाठी लिफ्ट, एस्केलेटर आणि विशेष मार्गांचे निर्माण सुरू आहे. ही स्थानके आता केवळ प्रवासाचे केंद्र राहिले नाहीत, तर सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचेही केंद्र बनतील, जिथे नागरिक केवळ प्रवासासाठी नव्हे, तर आनंद व विश्रांतीसाठी येतील, असा विश्वास रेल्वेने व्यक्त केला.
अमृत भारत स्टेशन योजना दीर्घकालीन विकासावर लक्ष केंद्रित करणारी योजना असून, प्रत्येक रेल्वे स्थानकासाठी मास्टर प्लॅन तयार केला जात आहे. हा प्लॅन प्रवाशांची संख्या, वाहतुकीची गरज याबरोबरच स्थानिक सांस्कृतिक गरजा आणि शहरी विकासाच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक स्थानकाचे स्थानिक गरजेनुसार सुधारणा करण्यात येतील, ज्यामुळे प्रवाशांचा अनुभव अधिक सुसह्य व सुखद होईल.