पर्यावरण
डॉ.विजय कुमार
कॅनडाच्या जंगलात लागलेल्या वणव्यांमुळे सुमारे 33 हजार चौरस कि.मी.चा परिसर जळून खाक झाला आहे. गेल्या 10 वर्षांच्या सरासरीपेक्षा 13 पट अधिक हानी यंदा झाली आहे. वणव्याच्या मुळाशी हवामानबदल आणि जागतिक तापमानवाढ असल्याचे पर्यावरण अभ्यासकांचे म्हणणे आहे. आफ्रिका आणि आशियातील जंगलांमध्येही अशाप्रकारची समस्या उद्भवू शकते हे लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण विभागाने वेळीच उपाययोजना केली पाहिजे.
हा वणवा रोखण्यासाठी कॅनडा असमर्थ ठरत आहे. तेथील अग्निशमन दलाच्या मदतीसाठी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेसह अनेक देशांतील एक हजाराहून अधिक अग्निशामक कॅनडाला पोहोचले आहेत. कॅनडाचे अध्यक्ष जस्टिन ट्रुडो यांच्या व्यथा मोठ्या बोलक्या आहेत. त्यांनी म्हटल्यानुसार, आगीच्या वणव्याने केवळ लोक विस्थापित होतातच, पण लोकांच्या घरांची वाताहत होते. त्यांचे जीवनचक्र बदलते. एका ठिकाणी राहत असताना लहानाची मोठी झालेली मुले, कुटुंबाचा सहवास, निसर्गाशी जुळलेले नाते हे सारे जीवनचक्र उद्ध्वस्त होते आणि त्यांना निवार्यासाठी वणवण भटकावे लागते, हे चित्र फार भेदक असते. सध्या कॅनडातील 25 लाख लोक या कठिण प्रसंगातून वाटचाल करत आहेत. आधी या वणव्यातून लोकांना बाहेर काढणे आणि अन्यत्र वसवणे हे कॅनडापुढील आव्हान आहे. त्यानंतर त्यांच्या पुनर्वसनचा प्रश्नही गंभीर होणार आहे.
वणव्याचे कारण काय?
कॅनडाच्या जंगलातील वणव्याचे कारण तेथील संशोधन केंद्राने शोधून काढले आहे. त्यानुसार कॅनडामध्ये गतवर्षी झालेला अपुरा पाऊस आणि कमी झालेली बर्फवृष्टी यामुळे यंदा तेथील वातावरण नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात तापले. पाऊस कमी होता आणि हवेतील उष्णता वाढते तेव्हा जंगलांमध्ये वणवे लागण्याच्या शक्यता वाढतात. संपूर्ण जंगलाला आग लावण्यासाठी एक लहान ठिणगीदेखील पुरेशी असते. या ठिणग्या झाडांच्या फांद्या घासल्यामुळे किंवा सूर्याच्या तीव्र किरणांमुळे अनेक वेळा होतात. हवामानातील बदलामुळे तापमानात वाढ होत असून त्यातून वणव्यांना पोषक वातावरण निर्माण होत असल्याचे ‘नॅशनल ओशिएनिक अॅण्ड अॅटमोस्फेरिक असोसिएशन’ने आपल्या अहवालात म्हटले आहे.
कॅनडाच्या जंगलातील वणव्याचे दूरगामी परिणाम तेथील आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक अशा सर्वच स्तरावर जाणवणार आहेत. न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, पेनिसिलव्हेनिया यांसह दहा प्रमुख शहरांवर या धुराचे लोट पसरले आहेत. अगदी न्यू जर्सीपर्यंत ते आल्याचे दिसून आले आहे. अमेरिकेची हवेची शुद्धता मोठ्या प्रमाणावर खालावली आहे. थोडक्यात, आग कॅनडामध्ये लागली आणि झळ अमेरिकेला बसत आहे. या वणव्याने कॅनडाच्या विकासावर सर्वंकष परिणाम होणार आहेत, ही बाब स्पष्ट झाली आहे. तीन लाख हेक्टर क्षेत्र पूर्णपणे जळून खाक झाले आहे. आता ही सर्व जमीन पुन्हा जंगलमय कशी करायची, शेतीसाठी कशी उपयुक्त करायची आणि त्यावर अवलंबून असलेल्या लोकांचे जीवनचक्र कसे उभे करायचे हा मोठा प्रश्न आहे.
कॅनडामधील वणव्यांची ही मालिका अंतर्मुख करायला लावणारी आहे. 1995 च्या सुमारास ब्राझीलच्या राजधानीत झालेल्या पर्यावरण परिषदेत भारतासारख्या आशियाई देशाने विकसित राष्ट्रांपुढे त्यांनी केलेल्या पर्यावरण विनाशासाठी मदत म्हणून मोठी रक्कम मोजली पाहिजे, असा आग्रह धरला होता. परंतु पाश्चिमात्य राष्ट्रांनी भारताच्या या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले. आता हवामान बदलांचे दुष्परिणाम केवळ आशिया खंडावर नव्हे तर अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनीसह कॅनडा, इटली यांसह अनेक युरोपियन देशांवर होऊ लागले आहेत. विविध प्रकारची चक्रीवादळे, हरिकेन यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता जगभरातील मानवी समुदायाने सावध आणि सजग राहून नैसर्गिक आपत्तींचा मुकाबला कसा करता येईल याबाबत