सह्याद्री मिथक, पुराण कथांंमध्ये सापडतो का? वैदिक आणि उत्तर वैदिक काळातही त्याचे अगदी कमी संदर्भ येतात. पण पुराणातल्या ऋषींचा संदर्भ वैदिक वाङ्मयाशी येतो आणि त्या अनुषंगाने काही संदर्भ शोधता येतात. हा सारा खटाटोप करायचा कशासाठी? ज्ञात इतिहासातले सह्याद्रीचे संदर्भ स्पष्ट आहेत. मग वेद पुराणांमधले संदर्भ हवेत कशाला? शिवाय पुराणातल्या संदर्भाची संगती लावता येत नाही. पण भारताच्या दोन टोकांमधील अभिसरणाची प्रक्रिया समजावुन घ्यायची असेल तर हे संदर्भ नजरेआड करता येणार नाहीत. त्यातून अर्थ मर्यादित घ्यावे लागतील. पण शेकडो वर्षे चाललेल्या या प्रक्रियेचे ढोबळभान येईल. दरम्यान, हा लेख संशोधनपर नाही, तर निर्देशपर आहे. ज्यातून काही गोष्टींकडे संदर्भ म्हणून बघता येईल, याचा निर्देश फक्त करायचा आहे.
मिथक आणि पुराणांमधील कथांच्या अनुषंगाने सह्याद्रीच्या निर्मिती प्रक्रियेचा अन्वयार्थ शोधायचा, तर या कथांमध्ये सह्याद्रीशी जास्त निगडित दोन कथा येतात. एक स्कंदपुराणातला सह्याद्री खंंड आणि दुसरे म्हणजे परशुरामाच्या संदर्भातले उल्लेख. यात परशुरामाची कथा अनेक गोष्टीकडे निर्देश करते. परशुरामाचा जन्म आणि सुरुवातीचे वास्तव्य नर्मदेजवळ आहे. परशुरामाचा तपस्थान सध्याच्या ओरिसात मानता येईल. म्हणजे साधारणपणे उत्तरेकडील जनप्रवाह नर्मदेपर्यंत सुरुवातीला स्थिरावला. परशुरामाच्या कथेतील दुसरा एक भाग पृथ्वी नि:क्षत्रिय करण्याचा! एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केल्यानंतर त्याने सर्व भूमी कश्यपांना दान केली. महेंद्र पर्वतावर परशुराम तपश्चर्येस निघून गेले. म्हणजेच पूर्व घाटावर! यात परशुराम सप्त चिरंजीवांपैकी एक असल्याचा संदर्भ कायम लक्षात ठेवावा लागेल.
कारण त्यांचा संदर्भ अनेक कालखंडामध्ये येत राहतो. पश्चिम सागरावर उभे राहून त्यांनी वरुणाची प्रार्थना केली. वरुणाने त्याला नवी भूमी दिली. आपल्या पराक्रमाने त्याने समुद्र मागे हटविला आणि अपरांत प्रदेश निर्माण केला. म्हणजे गुजरातपासून केरळपर्यंतचा प्रदेश. आता या कथेकडे केवळ मिथक म्हणून बघितले, तर सह्याद्री निर्मितीच्या प्रक्रियेची कोणातरी द्रष्ट्याला कल्पना होती. ती कथा मिथकाच्या रुपाने आली आहे.परशुरामशी संबंधित प्रदेश आणि स्थळांचा विचार केला, तर उत्तरेतील महाजनपदे आंंध्रांच्या पुढे विस्तारण्याच्या काळातील ही मिथके असावीत! या कालखंडात दोन भिन्न श्रद्धांचा आणि उपासनांचादेखील मिलाफ संभवनीय आहे.
श्री दत्तात्रेयाचे स्थान महाराष्ट्रात, परशुरामाची आई माहुरवासी रेणुका. नर्मदेचा अडलेला विस्तार दक्षिणेत सरकू लागल्याचा पहिला टप्पा म्हणजे सह्याद्रीच्या उपरांंगा. यातील कामधेनुची कथा आणि कार्तवीर्य संघर्ष विचारात घेतला तर गाय आणि म्हैस या संदर्भातील तत्कालीन अर्थव्यवस्था आणि त्यांच्या रूपांंतरणाचाही विचार करता येतो.
श्री दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांंचे रूप. त्यांंच्या जन्मस्थळाच्या अनेक कथा अस्तित्वात असल्या, तरी त्यांचा प्रभाव क्षेत्र महाराष्ट्र, गुजरात आणि दक्षिणेकडील भाग हेच आहे. श्रद्धांच्या मिलाफातून नव्या स्वतंत्र, तरीही जुन्या श्रद्धांंतून उद्भवलेल्या श्र्द्धांंकडे निर्देश करता येतो. श्रद्धांचा माध्यमातून येणारा संघर्ष, श्रद्धांच्या मिलाफातून शांत होतो आणि नंतर तो त्या संस्कृतीचा भाग होतो. याच पद्धतीने स्कंद पुराणातील सह्याद्री खंंडाकडे बघता येईल. यातील निवेदक देवता शिव् आहे. स्कंद पुराणातील वर्णनाप्रमाणे विष्णुचे वास्तव्य वटवृक्षात, ब्रह्मा पलाश वृक्षात, शक्ति आम्र वृक्ष आणि इतर देवपत्नी वेलींमध्ये, या पुराणातील एका संदर्भानुसार पळसाच्या तीन पानातल्या मधल्या पानात विष्णू, उजव्या पानात शिव आणि डाव्या पानात ब्रह्मा असतात. या सार्या संदर्भाकडे पवित्र वृक्षांच्या देवाण-घेवाणीच्या संदर्भात बघता येईल. स्थानिक वृक्ष प्रजातींमध्ये दोन्ही प्रवाहांच्या देवतांच्या वास ही देखील श्री दत्तात्रेयांच्या रूपाने सुरू झालेल्या सात्मीकरणाच्या प्रक्रियेचा भाग मानता येईल काय?
सह्याद्री खंंंडाच्या बाबतीत आणखी एका पैलूंकडे लक्ष वेधता येईल. स्कंदाला शिवाने ब्राह्मण शाखांचे वर्गीकरण सांगितले आहे. या दहा शाखांचें मुख्य वर्गिकरण पंचगौड आणि पंचद्रविड असे आहे. सह्याद्रीकडे उत्तर-पूर्वेकडून आलेल्या ब्राह्मण जाती आणि दक्षिणेतल्या ब्राह्मण जाती, यातील सात्मीकरणाची प्रक्रिया म्हणून या वर्गीकरणाकडे बघता येईल. परशुरामाने समुद्रातील भूमी तयार करणे आणि ब्राह्मणांना तिथे वसवणे, हेही मिथक या प्रक्रियेशी जुळू शकेल. सामाजिक सात्मिकरण प्रक्रिया कधीच सहज-सुलभ नसते. संघर्ष आणि समन्वय यांचे शेकडो वर्षे चाललेले द्वंद्व नव्या जाणीवा निर्माण करतं. याच विचाराने सह्याद्री खंंडाच्या अनुषंगाने उद्भवलेला वाद पेशवाईपर्यंत पोहोचतो. अनेक भिन्न गटांच्या नव्याने एकत्रित येण्याच्या प्रक्रियेत श्रेष्ठत्वाचा प्रश्न शेकडो वर्षे सुटत नाही. त्याचा परिपाक म्हणून या प्रक्रियेकडे बघता येईल का? सह्याद्रीच्या प्रदेशात फार पूर्वी वसलेल्या जाती आणि नव्याने या प्रक्रियेत येऊ बघणार्या जाती, हा सह्याद्रीचा वसाहतीकरणाचा आकृतिबंध दाखवू शकेल.
याच पद्धतीने गौतम आणि अगस्ती या ऋषींचा संदर्भ सह्याद्रीशी जोडता येईल. गौतम ऋषींनी गोदावरीच्या रुपाने गंगा पृथ्वीवर आणली. ती का आणली? या मिथकाकडे बघितले, की पुन्हा गायीच्या रूपाने सह्याद्रीकडे रुजू लागलेली नवी अर्थव्यवस्था, या संदर्भाने विचार करता येतो. या दोन्ही ऋषींच्या जन्माच्या बाबतीत मतमतांंतरे आहेत. पण कार्यक्षेत्र मात्र सह्याद्रीचा प्रदेशच आहे, हे निर्विवाद!
अगस्ती ऋषींच्या संदर्भात हा विचार जास्त व्यापकपणे करता येतो. काशीतून दक्षिणेकडे प्रस्थान सहेतूक असावे का? विदर्भराजाच्या कन्येशी, लोपमुद्राशी विवाह हा दोन प्रदेश एकत्र आणण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग असू शकतो. अगस्त्य हे औषधींचे जाणकार आणि भाषांंचे अभ्यासक असावेत. त्यांंनी दक्षिणेकडील भाषा अवगत केल्या असतील. तमिळ भाषेतील त्यांंचे योगदान हे याचेच निदर्शक. त्यांंच्याकडील वरील दोन महत्त्वाच्या शक्तींमुळेच ते दक्षिणेकडे जाण्यासाठी अनवट सह्याद्रीतून मार्ग काढू शकले असतील. म्हणजे त्यांच्या रूपाने या दोन स्वतंत्र पर्वतप्रणाली आणि त्यानुसार तयार झालेल्या दोन संंस्कृती जोडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असेल का? अगस्त्यांच्या माध्यमातून अनवट दक्षिण- उत्तरेकडच्या वसाहतींना समजली असेल का?
मिथक आणि पौराणिक संदर्भ जोडत गेले की अनेक नव्या मांडणीच्या शक्यता दिसू लागतात. सह्याद्रीच्या बाजूने होत गेलेल्या वसाहत निर्मितीच्या प्रक्रियेत पुराणे काही संदर्भ देऊ शकतात. तेे संदर्भ पुन्हा-पुन्हा तपासले तर मांडणी जास्त स्पष्ट होऊ शकेल. भारताच्या सांस्कृतिक इतिहासाच्या मांडणीत हा विचार पुन्हा- पुन्हा करत राहावा लागेल, त्यासाठी केलेले हे छोटेखानी टिपण.
अनिता जोशी, भारतीय विद्या अभ्यासक