दक्षिण आफ्रिकेतील जेबी मार्क्स ओव्हल मैदानावर भारताच्या महिला क्रिकेटपटूंनी पराक्रम गाजवला. 19 वर्षांखालील महिला विश्वचषक जिंकून मैदान मारले. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यावर सुुरुवातीपासून शेवटापर्यंत भारतीय खेळाडूंचीच पकड होती. कोणत्याही प्रकारच्या महिला क्रिकेट स्पर्धांमधील भारताचा हा पहिला विश्वचषक आहे. त्यामुळे त्याचे महत्व अनन्यसाधारण तर आहेच पण विशेषत: महिला खेळाडूंनी मिळवलेल्या विजयाचे महत्व तेवढ्यापुरते मर्यादित नसते. असे विजय खेळण्याचे स्वप्न बघणार्या देशाच्या कानाकोपर्यातील मुलींचे खेळाडू म्हणून मार्ग प्रशस्त करतात. मुलींना पाठबळ देण्यासाठी त्यांच्या पालकांना काही अंशी का होईना पण प्रोत्साहित करु शकतात. खेळ व्यक्तिमत्व विकासास पूरक ठरतात. खेळ जिद्द, संघभावना, आव्हानांचा सामना आणि खिलाडूवृत्ती शिकवतात. आरोग्य राखण्यासाठी मदत करतात. खेळ खेळणार्या सगळ्यांचीच संघांमध्ये निवड होते आणि त्यांना खेळण्याची संधी मिळते असे नाही. तथापि वर उल्लेखिलेली मूल्ये अंगी बाणवण्यासाठी तरी मुलामुलींनी खेळावे असे तज्ञ सांगतात. पण मुलांच्या तुलनेत मुलींनी खेळाडू होण्याचे स्वप्न पाहाणे हेच त्यांच्यासाठी एकविसाव्या शतकातही मोठे आव्हान आहे. भारतीय महिला हॉकीपटूंचा संघर्ष हे त्याचे चपखल उदाहरण आहे. विजयी क्रिकेट संघातील अर्चना देवी, मन्नत कश्यप आणि फलक नाझ या खेळाडूंनाही प्रतिकुल परिस्थितीशी झगडावे लागले. खेळासाठी छोट्याशा गावखेड्याच्या सीमा ओलांडणे मुलींसाठी अजुनही वाटते तितके सोपे नाही. मुलींनी खाली मान घालून वावरावे, शक्यतो गप्पच बसावे, प्रश्न विचारु नयेत, उलट बोलू नये, सायंकाळी घराचा उंबरठा ओलांडून बाहेर जाऊ नये, पारंपरिक शिक्षण घेता घेता स्वयंपाक शिकावा, पुरुषांशी बरोबरी करु नये अशीच समाजाची अपेक्षा असते. मुलींचे-स्त्रियांचे जगणे चौकटीत जखडलेले आहे. अलीकडच्या काळात त्याला काही अपवाद आढळू लागले आहेत इतकेच. मुलींनी खेळाडू होण्याची महत्वाकांक्षा ठेवणे आणि त्यांच्या पालकांनी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहाणे ही अनेकींसाठी आजही परिकथा ठरते. असे विजय सामान्य मुलींना स्वप्न बघण्याचे बळ देऊ शकतात. चौकटीबाहेरचा दृष्टीकोन स्वीकारण्याची प्रेरणा देऊ शकतात. भारतीय समाजात महिलांना दुय्यमत्व दिले जाते. सर्व प्रकारच्या क्षमता असुनही केवळ समाजपरंपरा म्हणून सतत दुय्यमत्व स्वीकारुन गप्प बसणे महिलांसाठी वाटते तितके सोपे नसतेच. खेळाच्या मैदानातल्या विजयांमुळे आणि खेळाडूंच्या संघर्षगाथांमुळे सामान्य महिलांचेही धैर्य वाढू शकेल. एकजुटीने आव्हानांचा सामना करणे शक्य आहे असा विश्वास त्यांच्या मनात जागू शकेल. काही जणींसाठी घरातल्या प्रश्नांचा सामना करण्यासाठी तो उपयुक्त ठरु शकेल. परिस्थिती अनुकूल नसली तरी कौशल्य विकासाच्या बळावर धडाडी दाखवली आणि जिद्द एकवटली तर मार्ग सापडतो. ध्येयसाध्य होते हे मुलींनी दाखवून दिले आहे. संघभावनेने संकटे पार करता येतात हे त्यांनी सिद्ध केले आहे. विजयी खेळाडूंचे अभिनंदन.