Sunday, May 19, 2024
Homeधुळेमराठा आरक्षणाबाबत तातडीने अध्यादेश काढावा

मराठा आरक्षणाबाबत तातडीने अध्यादेश काढावा

धुळे । प्रतिनिधी Dhule

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने मराठा समाजाचे आरक्षणाला स्थगिती मिळाली असली तरी राज्य सरकारने अध्यादेश काढून तो सुची 9 मध्ये समाविष्ट करून त्याचे कायद्यात रूपांतर करावे, अशी मागणी मराठा समाजातर्फे करण्यात आली. आरक्षणाला विरोध करणार्‍या अपप्रवृत्तीच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत दहन करण्यात आले.

- Advertisement -

मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. मागण्यांची त्वरीत दखल घ्यावी, अन्यथा आणखी तिव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे राज्यभरात मराठा समाजातून संतापाची लाट व्यक्त होत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा आंदोलन करण्याची भुमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली असून त्याचाच प्रारंभ म्हणून आज सकाळी मनोहर टॉकीज परिसरात असलेल्या छत्रपती शिवरायांच्या स्मारकाजवळ मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्‍यांसह समाजबांधव एकत्रित आले. छत्रपती शिवरायांना अभिवादन करून एक मराठा-लाख मराठा, अशी घोषणा देत आंदोलनाला सुरूवात झाली.

दरम्यान, यावेळी आंदोलकांनी मराठा आरक्षणाला छुप्या पध्दतीने विरोध करून न्यायालयात मंजुरी प्रक्रियेत अडसर आणणार्‍या अपप्रवृत्तीच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करत पुतळ्याचे दहन केले. तसेच पोलीस अधिकार्‍यांना लेखी स्वरूपातील मागण्यांचे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सन 2018 मध्ये संपुर्ण महाराष्ट्र लाखोंच्या संख्येने एकत्र येऊन शांततेच्या मार्गाने मोर्चा काढण्यात आला होता. राज्यभरात निघालेल्या जवळपास 58 मोर्चांची दखल घेत तत्कालीन सरकारने स्वतंत्र आरक्षण लागू केले होते.

हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असतांना मराठा समाजाने ते घटनापिठाकडे वर्ग करण्याची मागणी केली होती. असे असतांना सर्वोच्च न्यायालयाने सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील प्रवेश तसेच नोकर भरतीतील मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली आहे.

विशेष म्हणजे, मागील महिन्यात आर्थिक दृष्ट्या मागास घटकाच्या आरक्षणाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने घटनापिठाकडे सोपवितांना असा कुठलाही अंतरिम आदेश दिलेला नव्हता. मग मराठा समाजाचे आरक्षण प्रकरण घटनापिठाकडे सोपवितांना अंतरिम आदेश देऊन नैसर्गिक न्याय प्रणालीचे उल्लंघन केले आहे. ही बाब मराठा समाजावर अन्यायकारक असून त्याचा निषेध करीत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सद्यस्थितीत शैक्षणिक प्रक्रियेसह नोकरभरतीची प्रक्रिया सुरू असून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सरकारने एकतर ही प्रक्रिया थांबवावी. किंवा मग अध्यादेश काढून आरक्षण द्यावे अन्यथा मराठा समाजाच्या असंतोषाचा उद्रेक होऊन पुन्हा राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

या आंदोलनात मराठा क्रांती मोर्चाचे मनोज मोरे, साहेबराव देसाई, डॉ.संजय पाटील, जगन ताकटे, संदीप पाटोळे, प्रा.बी.ए.पाटील, प्रफुल्ल माने, अनंत पाटील, शितल नवले, विक्रमसिंह काळे, युवराज महाले, अमर फरताडे आदींसह पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांना शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक हेमंत पाटील, आझादनगरचे पोलीस निरिक्षक दिनेश आहेर यांच्या उपस्थितीत मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तसेच मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.

आजी-माजी आमदारांची हजेरी

मराठा क्रांती मोर्चाच्या आज झालेल्या आंदोलनात शहरातील आजी-माजी आमदारांनी हजेरी लावली. आंदोलन सुरू झाल्यानंतर माजी आ.राजवर्धन कदमबांडे हे देखील आंदोलनात सहभागी झाले होते. याबरोबरच शहराचे विद्यमान आ. डॉ.फारूक शाह हे देखील आंदोलनात शेवटपर्यंत आंदोलनकांसोबत थांबले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या