मुंबई | Mumbai
राज्यातील गरिबांसाठी सणासुदीच्या दिवसात आधार असणारी ‘आनंदाचा शिधा’योजना (Anandacha Shidha Scheme) अखेर बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारने (State Government) निवडणुकीच्या (Election) आधी काही महत्त्वाच्या योजना लागू केल्या होत्या. त्यात आनंदाचा शिधा या योजनेचाही समावेश होता. या योजनेचा फायदा राज्यातील जवळपास १ कोटी ६३ लाख लाभार्थींना झाला होता. त्यानंतर आता ही योजना बंद करण्याचा निर्णय झाल्याचे बोलले जात आहे.
आनंदाचा शिधाच्या माध्यमातून रेशनकार्डधारकांना (Ration Card Holders) एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो चना डाळ आणि एक लिटर पामतेल मिळत होते. या योजनेच्या माध्यमातून दसरा, दिवाळी, गुढीपाडवा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती अशा सणांच्या निमित्ताने फक्त १०० रुपयांमध्ये वरील पाच वस्तू दिल्या जात होत्या. मात्र, आता ही योजना बंद करण्यात आली आहे.
दरम्यान, काल (सोमवारी) सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात (Budget) अनेक योजनांना निधीचे वाटप करण्यात आले. परंतु, त्यामध्ये आनंदाचा शिधा आणि इतर काही योजनांच्या निधीबाबत (Funds) कुठेही भाष्य करण्यात आलेले नव्हते. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री असताना ‘आनंदाचा शिधा’ ही योजना लागू करण्यात आली होती. मात्र, आता ही योजना बंद करण्यात आल्याचे सांगितले जाते.