Wednesday, April 23, 2025
Homeदेश विदेशPahalgam Terror Attack : कोण आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड सैफुल्ला खालिद?

Pahalgam Terror Attack : कोण आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड सैफुल्ला खालिद?

नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था

जम्मू आणि काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादाचे थैमान पाहायला मिळाले आहे. अनंतनाग जिल्ह्यातील पहलगामच्या बैसरन खोऱ्यात नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल २६ निष्पाप नागरिकांनी आपला जीव गमावला. हा हल्ला २०१९ मधील पुलवामा घटनेनंतरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे.

- Advertisement -

या अमानुष हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबाच्या ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. या संघटनेने यापूर्वीही अनेक वेळा जम्मू आणि काश्मीरमध्ये घातपात घडवले आहेत. TRF ही लष्करचीच एक आघाडी संघटना असून, ती विशेषतः स्थानिक युवकांना भरती करून कट रचते. या हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्ला खालिद असल्याचे स्पष्ट झाले आहे. तो सैफुल्ला कसुरी या नावानेही ओळखला जातो आणि लष्कर-ए-तैयबाचा उपप्रमुख आहे. सैफुल्ला हा जम्मू आणि काश्मीरमधील TRF आणि लष्करच्या कारवायांचा मुख्य चालक मानला जातो.

सैफुल्ला हा दहशतवादी हाफिज सईदचा अतिशय जवळचा सहकारी आहे. दोघांमध्ये घनिष्ठ संबंध असून, अनेक महत्त्वाच्या दहशतवादी कारवायांचे नियोजन त्यांनी एकत्रितपणे केले आहे. सैफुल्ल्याला आधुनिक गाड्यांचा छंद असून, तो नेहमी बुलेटप्रूफ आणि महागड्या वाहनांमध्येच प्रवास करतो. त्याची सुरक्षा इतकी कडेकोट आहे की भारतीय पंतप्रधानांच्या सुरक्षेपेक्षाही ती जास्त मानली जाते. त्याच्या आजूबाजूला सतत अत्याधुनिक शस्त्रांनी सुसज्ज असलेल्या अनेक दहशतवाद्यांचे संरक्षण असते. त्यामुळे त्याच्यावर हल्ला करणे फार अवघड मानले जाते.

सैफुल्लाला पाकिस्तानात व्हीव्हीआयपी वागणूक मिळते. पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी त्याच्यावर फुले उधळतात, स्वागत करतात. दोन महिन्यांपूर्वी तो पाकव्याप्त पंजाबमधील कंगनपूर येथे एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. या कार्यक्रमात पाकिस्तानी लष्कराचे कर्नल जाहिद जरीन खट्टक हेही उपस्थित होते आणि त्यांनी सैफुल्लाच्या भाषणाचे आयोजन केले होते.

एका कार्यक्रमात सैफुल्लाने भारतीय लष्कर आणि नागरिकांविरुद्ध उघड धमक्या दिल्या. त्यानंतर खैबर पख्तूनख्वा येथे झालेल्या एका बैठकीत तो म्हणाला, “आज २ फेब्रुवारी आहे. मी वचन देतो की २ फेब्रुवारी २०२६ पर्यंत आपण काश्मीर काबीज करू.” या बैठकीचे आयोजनही पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय यांनी केले होते. येथे मोठ्या संख्येने सशस्त्र दहशतवादी उघडपणे उपस्थित होते. या बैठकीत सैफुल्लाने जाहीर घोषणा केली की, “आमचे मुजाहिदीन येत्या काळात अधिक तीव्रतेने हल्ले करतील. २ फेब्रुवारी २०२६ पर्यंत काश्मीर मुक्त होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे.”

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या