मुंबई | Mumbai
राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी आज मेघदूत या शासकीय बंगल्यात कुटुंबासह प्रवेश केला. मात्र, या गृहप्रवेशाला काहीशी भावूक किनारही असल्याचे दिसून आले. शंभुराज देसाई यांनी आज मेघदूतमध्ये प्रवेश करताच ते भावुक झाले, त्यांच्यासह त्यांच्या मातोश्री विजयादेवी शिवाजीराव देसाई या ही भावूक झाल्या. ज्या बंगल्यात शंभूराज देसाई यांचा जन्म झाला, त्याच बंगल्यात त्यांनी आज मंत्री म्हणून प्रवेश केला.
शंभुराज देसाई यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज मेघदूत बंगल्याच्या गृहप्रवेश केला. गृहप्रवेशावेळी मंत्री शंभूराज देसाईं आणि त्यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर झाले. मेघदूत बंगल्यात शंभुराज देसाईंचा जन्म झाला होता. शंभूराज देसाई यांचे बालपण याच बंगल्यात गेले आहे. त्यांचे आजोबा बाळासाहेब देसाई यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना मेघदूत बंगला मिळाला होता. पहिली पाच वर्षे त्यांनी याच वास्तूत घालवली होती. त्यामुळे आज इतक्या वर्षांनी पुन्हा याच घरात पाऊल ठेवताना त्यांच्या मनात साठलेल्या जुन्या आठवणी समोर आल्या आणि भावनांचा बांध फुटला.
मंत्री शंभूराज देसाई यांच्या मातोश्री विजयादेवी शिवाजीराव देसाई यांनी यावेळी भावनांना वाट मोकळी करून दिली. मंत्री शंभूराज देसाई याचा जन्म या बंगल्यातला आहे. मला त्याला कलेकटर करायचं होतं. मात्र तो आज कलेक्टरपेक्षा मोठा झाला. आमदार झाला, मंत्री झाला. आम्हाला पावनगड बंगला मिळाला होता. पण मी विचारयचे मेघदूत बंगला मिळेल का आईची इच्छा त्याने पूर्ण केली. आज त्यांचे वडील असते तर आनंद झाला असता. या बंगल्याशी संबंधीत अनेक आठवणी आहेत. घरात प्रवेश करताना पहिली आठवण बाळासाहेब आणि ताईसाहेबांची आली. आमच्यावेळी हा बंगला ब्रिटिश कालिन होता, अशी आठवण शंभूराज देसाई यांच्या आईने सांगितली.
घराच्या उंबरठ्यावर पाऊल टाकताच आईच्या आणि मुलाच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. संपूर्ण देसाई कुटुंब या क्षणाने भावूक झाल्याचे पहायला मिळाले. शंभुराजे देसाई म्हणाले, “‘मेघदूत’ हे केवळ सरकारी निवासस्थान नाही. इथे माझे बालपण गेलेले आहे, माझे आजोबा आणि वडिलांचे पदकार्य सुरू झाले होते. आज मी या वास्तूत पुन्हा पाऊल ठेवतोय, हे क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय असल्याचे त्यांनी सांगितले.
शंभुराजे देसाई यांनी म्हटले की, आज मी मेघदूत बंगल्यावर राहायला आलो. १९६६ साली माझे आजोबा गृहमंत्री असताना या बंगल्यात माझा जन्म झाला. या बंगल्यात मी लहानपण घालवले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली. १९६५ साली याच बंगल्यावर माझ्या आईचा गृहप्रवेश झाला होता, अशी आठवणही त्यांनी सांगितली. मी टीवाय बीकॅाम शिकत होतो, तेव्हा कुटुंबाची राजकीय जबाबदारी माझ्यावर आली. 29 डिसेंबर 1996 ला मला चेअरमन केले, त्यावेळी 20 वर्ष वय होते. त्यावेळी झालेली कमी वयातील बिनविरोध निवड हा माझा एक विक्रम असल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितले.
देसाईंचे नाशिकशी आहे खास कनेक्शन
मंत्री शंभूराज देसाई यांच्या मातोश्री विजयादेवी देसाई या देवळालीचे माजी आमदार तसेच राज्यसभेचे माजी सदस्य दिवंगत बाळासाहेब देशमुख यांच्या कन्या असल्याने या घटनेने नाशिकचे नातेवाईकही भारावून गेले आहेत. बाळासाहेब देशमुख हे भूतपूर्व नाशिकरोड देवळाली नगर पालिकेचे पहिले अध्यक्ष राहिलेले आहेत. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी संभाळली. प्रसिद्ध फौजदारी वकील म्हणून त्यांची ओळख होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे त्यांनी वकिलीचे धडे घेतले होते. विजयादेवी देसाई या नाशिकरोड येथील कोठारी कन्या शाळेच्या विद्यार्थिनी होत्या. मंत्री शंभूराज देसाई हे देखील दरवर्षी सुट्टीच्या कालावधीत आजोळी म्हणजेच देवळालीत येत असतं.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




