अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक लाभार्थ्याला होण्याच्या दृष्टीने लाभार्थ्यांची नोंदणी अधिक प्रमाणात वाढविण्यात यावी. जिल्ह्यात असलेल्या अंगणवाडी सेविकांना दरमहा नोंदणीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात यावे. प्रत्येक अंगणवाडी सेविकेने दरमहा 250 पेक्षा अधिक नोंदणी करावी. याकामी आरोग्य मित्रांचीही मदत घेण्यात यावी. योजनेच्या लाभापासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आरोग्य विभागाच्या योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे, अशासकीय सदस्य सुधा कांकरिया, विधी समुपदेशक सारिका सुरासे आदी उपस्थित होते. बैठकीत मुलांच्या तुलनेत मुलींचे लिंगगुणोत्तर सुधारण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केवळ नियमित तपासण्यांवर अवलंबून न राहता, सापळा तपासणी, तसेच गुप्त माहितीवर आधारित कारवाई प्रभावीपणे राबविण्यात यावी. संशयित आस्थापना व व्यक्तींविरोधात लक्ष केंद्रित करून, कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई करण्यात यावी. ज्या तालुक्यांमध्ये मुलींच्या गुणोत्तराचे प्रमाण कमी आहे, त्याठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करण्यात यावे. ग्राम व तालुकास्तरासह जिल्हास्तरीय यंत्रणेने या कामात आपली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी यावेळी दिल्या.
ज्या तालुक्यांमध्ये जन्म व मृत्यू नोंदींचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी आहे, त्या तालुक्यांनी या बाबीकडे विशेष लक्ष देऊन नोंदणीची प्रलंबित प्रकरणे तातडीने पूर्ण करावीत. संबंधित तालुका स्तरावरील अधिकार्यांनी कारणांचा सखोल आढावा घेऊन सुधारात्मक उपाययोजना राबवाव्यात व पुढील कालावधीत नोंदणीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढेल, याची जबाबदारी निश्चित करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकार्यांनी यावेळी दिल्या. संशयित क्षयरुग्णांचे लवकर निदान व योग्य उपचार होणे हे क्षयरोग निर्मूलनासाठी महत्त्वाचे असल्याने यावर अधिक भर द्यावा.
जिल्ह्यात संशयितांच्या तपासणीची संख्या वाढवावी. सकारात्मक अहवाल आलेल्या रुग्णांवर तातडीने उपचार सुरू करावेत आणि प्रत्येक रुग्णाची नोंद ङ्गनिक्षयफ पोर्टलवर करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. घोगरे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नागरगोजे यांनी आरोग्य विभागाच्या कामकाजाची माहिती दिली. बैठकीस सर्व संबंधित विभागप्रमुख व तालुका आरोग्य अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.





