नागपुर । Nagpur
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्यावर सोमवारी (ता. 18 नोव्हेंबर) रात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये देशमुख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
हा हल्ला भाजपा कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप स्वतः देशमुख यांनी केलेला आहे. पण भाजपा नेत्यांकडून हे आरोप फेटाळून लावण्यात आले आहेत. तसेच, हा एक पॉलिटीकल स्टंट असल्याचे सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान या हल्ल्यानंतर नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी माहिती देताना सांगितले की, सोमवारी रात्री ८ वाजता अनिल देशमुख यांची गाडी नरखेडपासून परत येत असताना गाडीवर दगडफेक झाली. पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेतली असून आमचा तपास सुरू आहे. या घटनेनंतर संवेदनशील भागांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
हर्ष पोद्दार पुढे म्हणाले की, या घटनेचा सखोल तपास करण्यासाठी ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कामाला लावले आहे. मी स्वतः घटनास्थळाचा दौरा केला असून तपासावर देखरेख करत आहे. आताच काही निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही. या घटनेतील तथ्य आम्ही लवकरच समोर आणू. दरम्यान अनिल देशमुख यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांना रात्री नागपूरच्या अलेक्सिस (मॅक्स) रुग्णालयात आणले गेले आहे. नागपूरचे पोलीस उपायुक्त राहुल मदाने यांनी सांगितले की, आम्ही रुग्णालय परिसरातही बंदोबस्त वाढविला आहे.
दरम्यान अनिल देशमुख यांचे सुपूत्र सलील देशमुख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. अनिल देशमुख यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्यांची भेट घेतल्यानंतर सलील देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘मी आताच काटोलवरून अनिल देशमुख यांची प्रकृती पाहून परतलो आहे. माझे वडील गोळी घेऊन बेडवर झोपून आहेत. त्यांच्या कपाळाला आणि मानेला दुखापत झाली आहे, सिटीस्कॅन रिपोर्ट आल्यावर सगळं समोर येईल’, असं सांगत त्यांनी देशमुखांच्या प्रकृतीसंदर्भातील माहिती दिली.
देशमुख सायंकाळी सहा वाजता प्रचार सभा संपल्यावर जलालखेडा येथून येत होते, त्यावेळी त्यांच्यासोबत वाहनामध्ये उज्वल भोयर आणि डॉ.गौरव चतुर्वेदी होते. सुरक्षा रक्षकांची गाडी मागे काही अंतरावर होती त्यादरम्यानच हा भ्याड हल्ला झाला, असं सलील देशमुख म्हणाले. हा हल्ला झाल्यावर काटोल नरखेडच नव्हे तर संपूर्ण नागपूर जिल्हा या घटनेचा विचार करू लागला आहे असा संतप्त सूर त्यांनी आळवला.
‘तुमच्या जिल्ह्यात हल्ले का होत आहेत? अमित शहा यांचे दौरे का रद्द होत आहेत? हे देवेंद्र फडणवीस यांना विचारा. हे सगळं देवेंद्र फडणवीस स्वतः करत आहेत असा माझा थेट आरोप आहे’, अशा जळजळीत शब्दांत सलील देशमुख यांनी वडिलांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. एखाद्या नेत्यावर असा हल्ला झाल्यावर कार्यकर्त्यांच्या भावना असतात, मात्र आम्ही सगळ्यांना शांततेचा आवाहन केलं आहे, असंही ते म्हणाले.