Friday, May 3, 2024
Homeनगरलाळ्या-खुरकुतासह घटसर्प सदृश्य आजाराने 22 जनावरे दगावली

लाळ्या-खुरकुतासह घटसर्प सदृश्य आजाराने 22 जनावरे दगावली

नेवासा | तालुका प्रतिनिधी

तालुक्यातील भेंडा खुर्द व जेऊर हैबती गावाचे परिसरातील जनावरांना लाळ्या खुरकुतासह घटसर्प सदृश्य रोगाची लागण होऊन 22 गाई दगावल्याची घटना घडल्याने पशुधन पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

दरम्यान जिल्हा परिषद पशु संवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांचेशी संपर्क साधला असता लसीचे 9 हजार डोस तातडीने मागविण्यात आले असून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. रिकव्हरी रेटही चांगला असून पशुधन पालकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन श्री.गडाख यांनी केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील भेंडा खुर्द व जेऊर हैबती गावाचे परिसरातील शेतकर्‍यांच्या जनावरांना मोठ्या प्रमाणात लाळ्या खुरकुताची लागण झाल्याचे दिसून आले. या रोगामुळे भेंडा खुर्द येथील रवींद्र काशिनाथ नवले यांच्या 3, विश्वास हरिभाऊ नवले यांच्या 3, जेऊर हैबती येथील शेतकरी अशोक प्रभाकर देशमुख व गजानन प्रभाकर देशमुख यांच्या 10 तर गंगाराम नाथा शिंदे यांच्या 5, चंद्रकांत हरिभाऊ तांबे यांची 1 अशा एकूण 22 गाई दगावल्या आहेत.

याबाबतची माहिती मिळताच जिल्हा परिषद पशूसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांनी जिल्ह्यातील सर्व पशुधन विकास अधिकार्‍यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे यांनी जेऊर येथे भेट देऊन दगावलेल्या गाईंचे स्वतःचे उपस्थितीत शवविच्छेदन केले. जेऊर येथील अशोक देशमुख व भेंडा येथील हरिभाऊ नवले यांच्या दगावलेल्या गाईंचे शवविच्छेदनात लाळ्या खुरकुत रोगामुळे काही जनावरांच्या श्वसन संस्थेवर परिणाम होऊन ती दगावली असल्याचे दिसून आले.तर काही जनावरांचे यकृत निकामी झाल्याचे व आतड्यात रक्ताचा लालसरपणा आढळून आला. सदर नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

संबंधित अधिकारी यांना तपासणी आहवालाची प्रतीक्षा असून जेऊर येथील एका गायीमध्ये घटसर्प सदृश्य लक्षणे आढल्याची माहिती आहे मात्र तपासणी अहवाल आल्यावरच त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

दरम्यान या घटनेनंतर नेवासा तालुक्यातील पशुवैद्यकीय विभाग खडबडून जागा झाला असून सर्व यंत्रणा लसीकरणाचे कामाला लागली आहे. जेऊर हैबती गावतील 1000 जनावरांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. आजपासून भेंडा गावातील जनावरांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे.

दरम्यान सध्या साखर कारखान्याचे गळीत हंगाम सुरू असल्याने हंगाम बंद झालेल्या जिल्हाबाहेरील कारखान्याचे ऊस तोड कामगार व त्यांची जनावरे तालुक्यात येत आहेत. ऊस तोडणी कामगारांचे बैल जास्त प्रमाणावर लाळ्या खुरकूताने बाधित असल्याचे दिसून येत आहे. ज्या शेतकर्‍यांच्या शेतात पाणवठा किंवा गोठ्याजवळ ऊस तोड कामगारांचे निवासी अड्डे आहेत तेथील शेतकर्‍यांचे जनावरे बाधित होण्याचे प्रमाण अधिक आहे.

माझ्या गोठ्यामध्ये मोठ्या गाई, लहान कालवडी, गोर्‍हे अशी लहान-मोठी 25/26 जनावरे आहेत. या रोगाने प्रत्येकी 75 हजार रुपये किंमतीच्या 5 दुभत्या गाई, पहिल्यांदाच गाभणी असलेल्या 60 हजार रुपये किंमतीच्या 4 कालवडी व एक गोर्‍हा दगावला. दुभत्या गाईंपासून दूध उत्पादनातून मला महिन्याला एक लाख रूपये मिळत होते. या दुभत्या गाईचं दगवल्याने दूध उत्पादनाचे 6 लाख तर 10 जनावरे दगवाल्याने सुमारे 6 लाख रुपये असे एकूण 12 लाख रुपयांची हानी झाली आहे. या आपत्तीमुळे तर आभाळच फाटल्या सारखे झाले आहे. विमा नसल्याने सरकारने आम्हाला मदत करावी.

-गजानन देशमुख, पशुधन पालक, जेऊर हैबती ता.नेवासा

लसीकरण सुरू केले असले तरी या लसीचा परिणाम दिसण्यास 20 ते 25 दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे धोका अद्यापही टळलेला नाही. जनावरे दगावलेल्या शेतकर्‍यांना शासनाने तातडीने मदत करावी.

-विश्वास नवले, पशुधन पालक, भेंडा खुर्द

जिल्ह्यातील सर्व पशुधन विकास अधिकार्‍यांना सतर्क राहण्याच्या व बाधित जनावरे आढळल्यास तातडीने लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. भेंडा, जेऊर येथील दगावलेल्या जनावरांचे शवविच्छेदन करून त्याची नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत, त्याचा अहवाल आल्यानंतरच ही जनावरे नेमकी कोणत्या आजाराने दगावली हे स्पष्ट होईल. पुण्याहून तातडीने 9000 डोस मागवून भेंडा-जेऊर परिसरातील जनावरांचे लसीकरण हाती घेण्यात आलेले आहे.त्यामुळे जनावरे दगावण्याचे प्रमाण कमी असून रिकव्हरी रेट चांगला आहे.पशुधन पालकांनी घाबरून न जाता जवळच्या पशुधन विकास अधिकार्‍यांशी संपर्क साधावा.

-सुनील गडाख, जिल्हा परिषद पशु संवर्धन समिती सभापती

- Advertisment -

ताज्या बातम्या