मुंबई | Mumbai
बीड तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजकीय दबाव होता, हे आजच्या पोलिसांच्या चार्जशीटवरून सिद्ध झाले आहे. कारण या प्रकरणातील घटना ज्याप्रमाणे वेगवेगळ्या करण्यात आल्या त्यातील खंडणी प्रकरण वेगळे, खून आणि हत्या प्रकरण वेगळे, ॲट्रॉसिटी वेगळी अशा पद्धतीने जी प्रकरणा वेगवेगळी करण्यात आली ती मुळात राजकीय दबावापोटी करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी केला आहे. त्यांनी या प्रकारणावर भाष्य केले आहे.
या प्रकरणावर बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या की, “पुरावे म्हणून जे काही देण्यात आले होते, त्याचा क्रम पाहिला तर या लोकांनी मुद्दाम, राजकीय दबाव होता म्हणून तीन वेगवेगळ्या केसेस केल्या होत्या. यामध्ये खंडणी, अॅट्रॉसीटी आणि हत्या हे गुन्हे वेगवेगळे होते. आता या तीनही केस एकत्र आल्याने आता खात्री पटली आहे की यामध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय दबाव होता आणि तो धनंजय मुंडे यांचा होता. म्हणून पहिल्या दिवासापासून मी म्हणत होते की, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे.”
पुढे त्या म्हणाल्या, राज्यात राजकीय दहशत असावी तरी किती? हे यातून दिसून आले आहे. किंबहुना या प्रकरणात जर कोणी म्हणेल की यात मंत्री धनंजय मुंडे यांचा सहभाग नव्हता, तर ते मी कधीही मानूच शकते नाही. वाल्मिक कराड आज मोठे होण्या मागचे कारण फक्त आणि फक्त धनंजय मुंडेच आहे. त्याच्या शिवाय दुसरा तिसरा कोणीही नाहीये. असा घणाघात देखील अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला आहे.
आज सिद्ध झाले आहे की ही तीन वेगवेगळी प्रकरणे कधीच नव्हती. याची सुरूवात २९ नोव्हेंबर रोजी झाली, ज्यामध्ये आधी सुदर्शन घुलेच्या फोनवरून वाल्मिक कराडने खंडणी मागीतली. त्यानंतर ६ तारखेला मारामारी झाली त्यामध्ये त्यांच्यावर सर्व सेक्शन लागले होते. त्यांचा जामीन करायला बालाजी तांदळे माणूस पोहचला आणि त्याने त्यांचा जामीन केला. ७ तारखेला सुदर्शन घुले हा वाल्मिक कराड याच्याशी बोलतो की यापुढे अशी माणसे आपल्या आड यायला लागली तर त्यांचा काटा काढायला पाहिजे. आठ तारखेला विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले हे तिरंगा हॉटेलमध्ये भेटतात आणि ते तिरंगा हॉटेलमध्ये भेटून चर्चा करतात की संतोष देशमुख जर आडवा आला तर त्यांना संपवायचे. मला ना ही भाषा आणि हे सगळे बघून इतका राग इतकी चिड येते की ही माणसे नाहीत असे माझे स्पष्ट मत आहे, असे दमानिया म्हणाल्या.
महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डिजीटल पुरावे मिळाले आहेत, जो व्हॉट्सॲप कॉल केला गेला, यामधून दिसते की सगळ्यांनी हे कृत्य होताना बघीतले आहे. आतापर्यंत आपण ऐकले होते पण आता हे चार्जशीटमध्ये नोंदवले गेले आहे. असे कृत्य ही माणसे बघत असतील तर त्यांचे सिंडीकेट ही माणसे नाहीतच, की क्रूर जमात आहे आणि यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे,” असेही दमानिया म्हणाल्या.
तर महाराष्ट्राने पेटून उठले पाहिजे
बीडमध्ये प्रत्येक दुकानदराकडून खंडणी, हप्ते फिक्स असतात, तेवढे पैसे त्यांना पोहचवावेच लागतात. येवढे मोठे सिंडीकेट काम करत आहे, हे कोणाच्या आशीर्वादाने? ते फक्त धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादाने. तीन गुन्हे वेगळे केले तो राजकीय दबाव होता. खरंतर हे तीनही गुन्हे कधीही वेगळे नव्हते. वाल्मिक कराडला कुठेतरी वाचवायचे म्हणून धनंजय मुंडे यांनी डोकं लावून हे वेगवेगळे करायला लावले. हा माझा थेट आरोप आहे. आता जर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घेतला नाही तर महाराष्ट्राने पेटून उठले पाहिजे” असेही अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा