Sunday, May 19, 2024
Homeब्लॉगBlog - अण्णासाहेब शिंदे : दूरदृष्टीचे नेतृत्व

Blog – अण्णासाहेब शिंदे : दूरदृष्टीचे नेतृत्व

देशाचे माजी कृषी राज्यमंत्री अण्णासाहेब शिंदे यांची कारकीर्द देशाच्या अन्नधान्य उत्पादनवाढीच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरली. देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यात शिंदे यांची कामगिरी मोलाची आहे. शिंदे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त…

भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना गेल्या 75 वर्षांत देशाने केलेली प्रगती आणि कामगिरीचा आढावा घेतला जात आहे. भारताने विकासाचे जे टप्पे गाठले त्यात अन्नधान्याची स्वयंपूर्णता ही महत्वाची उपलब्धी आहे. तत्कालीन केंद्रीय कृषी राज्यमंत्री अण्णासाहेब शिंदे यांनी त्यादृष्टीने केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. नाशिक जिल्हयाच्या सिन्नर तालुक्यातील पाडळी (ठाणगाव) हे अण्णासाहेबांचे जन्मगाव! सन 1922 साली एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण ठाणगाव येथे व नंतर पुढील शिक्षण संगमनेर येथे झाले.

- Advertisement -

महाविद्यालयीन शिक्षण व वकिली शिक्षण पूर्ण करताना महात्मा गांधींच्या प्रेरणेने त्यांनी ‘चले जाव’ चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. तुरुंगवासही भोगला. कम्युनिष़्ट चळवळीतंही ते सहभागी झाले. पुढे यशवंतराव चव्हाण यांच्या सान्निध्यात आल्यावर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला व त्यातूनच पुढे त्यांनीही राजकीय कारकीर्द सुरु झाली.

सन 1947 ते 1965 या कालावधीत भारतातील अन्नधान्य समस्या भयावह होती. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी व अन्न समस्या दूर करण्यासाठी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरुंनी त्यावेळी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु केले होते. परंतु त्या प्रयत्नांना फारसे यश येत नव्हते. अमेरिकेसारख्या श्रीमंत देशातून गहू व लाल ज्वारी आयात करुन काही अंशी उपासमार थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. अमेरिकेत जनावरांना खाऊ घातले जाणारे खाद्य भारतीय जनतेला खाऊ घालत असल्याबद्दल त्याकाळी शासनकर्त्यांना टीकेला सामोरे जावे लागले. अन्नधान्य समस्या अत्यंत नाजूक व प्राधान्यक्रमाचा विषय होता.

या समस्येवर तोडगा काढणे काळाची गरज होती. शास्त्रज्ञ व शासनकर्ते प्रामाणिक प्रयत्न करीत होते, पण योग्य दिशा सापडत नव्हती. अशावेळी पंडीत नेहरु महाराष्ट्रातील प्रवरानगर येथे आशिया खंडातील पहिल्या सहकारी साखार कारखान्याच्या कार्यक्रमाप्रसंगी यशंवतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नेहरु आणि अण्णासाहेब शिंदे यांची भेट झाली. त्याच प्रसंगातून भारतीय शेतीच्या क्रांतीला आणि शेती विकासाला चालना मिळाली.

पंडीत नेहरु यांनी अहमदनगर जिल्हयातील सहकारी साखर कारखाना आणि ऊस शेतीची  प्रत्यक्ष पाहणी केली. पंडीत नेहरु अत्यंत प्रभावित झाले. उत्तर प्रदेशातदेखील असाच सहकारी साखार कारखाना काढावयाचा आहे,  कारखाना उभा करु शकेल अशा व्यक्तीची गरज आहे, असे नेहरूंनी सांगितले. यशवंतरावांनी अण्णासाहेब शिंदे यांचे नाव पंडितजींना सुचवले. तेव्हापासून भारताच्या राजकरणात अण्णासाहेबांचे आगमन झाले.

इंदिरा गांधी आणि अण्णासाहेब यांनी एकत्र काम करुन उत्तर प्रदेशातील फुलपूर येथे सहकारी साखार कारखाना उभारणी केली. त्यानिमित्ताने नेहरु घराण्याला अण्णासाहेबांची सामाजिक क्षमता समजली. सन 1962 मध्ये अण्णासाहेबांना अहमदनगर जिल्हयातून लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवार म्हणून उभे केले. ते प्रचंड मताने विजयी झाले. पुढे ते नगर जिल्हयाचे खासदार म्हणून सलग 1977 पर्यंत राहिले. केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना 13 वर्षे सलग कृषी खात्याचे मंत्री म्हणून काम करण्याची जबाबदारी मिळाली. भारतीय कृषी क्रांतीचे जनक म्हणून त्यांनी खर्या अर्थाने काम केले. सामाजिक व कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना अण्णासाहेबांचे कृषी क्षेत्रातील योगदान निश्चितच प्रेरणादायी आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कृषी उत्पादन, विशेषतः अन्नधान्य व लोकसंख्या यांचा ताळमेल बसत नव्हता. शेती उत्पादन व देशातील अन्नधान्याची गरज यात फार मोठी तफावत होती. उपासमारीने लोक मरत होते. अनेकांना एक वेळ जेवण घेवून एक वेळ उपाशी राहण्याची जणू सवय झाली होती. हा प्रश्न त्यावेळी हाताळण्याची जबाबदारी पंजाबराव देशमुख यांच्यावर आली. देशमुख यांनी अमेरिका, रशिया व इंग्लंड आदी विकसित देशांशी संपर्क साधून भारतीय कृषी समस्येवर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले. त्यात थोडेफार यश मिळाले. त्या प्रयत्नांचा भाग म्हणून देशमुख यांनी भारत कृषक समाज ही राष्ट्रीय पातळीवरील शेतकरी संस्था स्थापना केली.

1952 पासून पंजाबराव देशमुख एक दशक कृषी राज्यमंत्री म्हणून केंद्र शासनात कार्यरत होते. त्यांचे योगदान त्या परिस्थितीत खूप उपयुक्त व महत्वाचे होते. कृषिमंत्री म्हणून ज्यांनी स्वातंत्र्यानंतर काम केले त्यात डॉ. राजेंद्र प्रसाद, के.एम.मुन्शी, रफी अहमद किदवई, अजित प्रसाद जैन, स. का. पाटील यांनी अनुक्रमे जबाबदारी सांभाळली. परंतु त्यापैकी कोणाचाही शेतकरी म्हणून संबंध नव्हता. त्यामुळे 1947 ते 1962 पर्यंत कृषी क्षेत्राच्या समस्येवर तोडगा निघू शकला नाही. पंजाबराव देशमुख राज्यमंत्री असल्याने व शेती व्यवसायाशी संबंधित असल्याने काही अंशी समस्या सोडवण्यास मदत झाली.

त्यानंतर अण्णासाहेब शिंदे यांचा केंद्र शासनाच्या मंत्रिमंडळात समावेश झाला व कृषी क्रांतीचे खर्या अर्थाने सर्वांगीण विकासासाठी योग्य रितीने व सफल धोरणे अवलंबवण्यात आली. त्या काळात अण्णासाहेबांना स्वतंत्रपणे मुक्त हस्ते निर्णय घेण्यास शिथीलता दिली होती. त्यांनी राज्यमंत्री म्हणून कामकाज पाहिले. कॅबिनेट मंत्री म्हणून ज्यांनी-ज्यांनी अण्णासाहेबांबरोबर काम केले त्यांनी अण्णासाहेब राज्यमंत्री असले तरी पंडीत जवाहरलाल नेहरु व लालबहादूर शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे निर्णय स्वातंत्र्य अबाधित राहिले. अण्णासाहेबांकडे कोणीही राजकारणी म्हणून पाहत नव्हते. त्यांच्या विद्वत्तेवर व कार्यक्षमतेवर बहुतांश मंत्रिमंडळ व संसद सदस्य विश्वास ठेवत.

कृषि खात्याचे कामकाज सुरु करण्याअगोदर सखोल अभ्यास, विविध कृषि संशोधकांशी चर्चा, संशोधन केंद्रावर पाहणी व संशोधक-शास्तज्ञ यांच्या सूचना, मार्गदर्शन, त्यांच्या अडचणी जाणून घेताना अण्णासाहेब एखाद्या विद्यार्थ्यांसारखे काम करीत. त्यातून मिळालेल्या ज्ञानामुळे शासकीय पातळीवर निर्णय घेणे त्यांना अत्यंत सोपे झाले. कृषी शास्त्रज्ञ आणि संशोधकांना काम करताना येणार्‍या अडचणी दूर करण्यासाठी त्यांना विश्वास दिला. स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले.  अण्णासाहेबांनी शास्त्रज्ञांना विश्वास दिला. दिल्लीजवळच्या पुसा इन्स्टिट्यूटमध्ये ते भेट देण्यास जात. संशोधकांशी चर्चा करीत. त्यामुळे शास्त्रज्ञ आणि संशोधकाचा आत्मविश्वास वाढला. 1970 च्या दशकात जगातील सर्वात मोठे शेती संशोधन भारतात सुरु होते.

त्याचे सर्व श्रेय अण्णासाहेबांना जाते. सूर्यफूल व सोयाबिन बियाणे आयात करुन त्यांची भारतात लागवड सुरू झाली हे अण्णासाहेबांच्या प्रयत्नाचे फलीत आहे. संशोधकांनी केलेल्या सूचना आणि संशोधन शासन यंत्रणेमार्फत प्रत्यक्षात उतरवणे व तळागाळातील शेतकर्‍यांपर्यंत पोहचवण्याचे अत्यंत जिकरीचे काम अण्णासाहेबांनी आपल्या खाद्यांवर घेतले. आयसीएआर, आयएआरआय आदी केंद्रीय कृषी संस्थांची उभारणी केली. फक्त कृषी उत्पादनच नव्हे तर शेतीसाठी लागणारी खते, औषधे, औजारे यांचे उत्पादन करणे, अधिक दूध देणारी दुभती जनावरे, कुक्कुटपालन, मत्स्य शेती यांची शासन, सहकारी व खाजगी संस्थांमार्फत मदत घेवून उभारणी करणे.

अधिक पीक उत्पादन देणार्‍या जाती तयार करणे, त्यावर संशोधन करणे, त्यांच्या बियाणाचे उत्पादन, त्यांचे वितरण आदी गोष्टीवर त्यांनी भर दिला. नवनवे तंत्रज्ञान, आधुनिकीकरण आदी गोष्टीना लोकांचा विरोध असतानाही त्या सुरु ठेवण्यावर आण्णासाहेबांचा भर होता. प्रत्येक राज्यात कृषी विद्यापीठाची स्थापना करणे, प्रत्येक राज्यातील स्थानिक परिस्थिती, हवामान, पीक पेरा यांचा विचार करुन तसे संशोधन केंद्रांची आयसीएआर किंवा आयएआरआमार्फत उभारणी करुन ती कार्यन्वित करणे, त्यासाठी लागणारे मनुष्यबळ, निधी याच्या उपलब्धतेसाठी शासनाकडून ते मंजूर करुन घेणे ही अत्यंत जोखमीची कामे अण्णासाहेबांनी केली.
शेती उत्पादनवाढीसाठी पाणी हा महत्वाचा भाग आहे.

त्यासाठी सिंचन व्यवस्था वाढवणे हे अत्यंत महत्वाचे आणि अवघड काम त्या-त्या राज्य शासनाकडून करुन घेण्याची क्षमता अण्णासाहेबांमध्ये होती. उत्पादन वाढीसाठी खते, रसायने, बियाणे, पाणी याबरोबरच भांडवलाचीसुध्दा आवश्यकता होती. राष्ट्रीयकृत बँका शेतीसाठी अर्थसाह्य देण्यास तयार नसत. म्हणून गावपातळीवर विविध कार्यकारी सोसायट्यांची  स्थापना, जिल्हा बँका व राज्यपातळीवरील शिखर बँका यांचे सक्षमीकरण करणे हे महत्वाचे काम केंद्र व राज्य शासनामार्फत करुन घेणे, देशपातळीवर कृषी वित्त पुरवठा करणारी स्वतंत्र संस्था स्थापन करणे ही कामेही अण्णासाहेबांनी केली.

’नाबार्ड’ ही त्यांच्याच दूरदृष्टीतून स्थापन झालेली संस्था! राष्ट्रीयकृत बँकानांही कृषी वित्तपुरवठा करण्याचे बंधन आदी बाबी त्यांनी शासनपातळीवरुन सूचित केल्या होत्या. शेतीला पूरक म्हणून दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्यशेती, कृषी प्रक्रीया आदी जोडधंदा असावा, असे अण्णासाहेबांनीच सांगितले आणि तशा योजनाही मंजूर केल्या. शेतमालास बाजारात योग्य दर मिळावा म्हणून कृषी उत्पादन मूल्य धोरण ठरवण्यात आले. शेती उत्पादन तळागाळातील ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी वितरण व्यवस्था निर्माण करणे व त्यावर शासनाचे नियंत्रण असणे या बाबीही त्यांनी मंजूर करून घेतल्या.

शेतमालाची साठवणूक करण्यासाठी फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना करुन देशभर गोदामाचे जाळे निर्माण करण्याची दूरदृष्टी आण्णासाहेबांनी दाखवली. पशुधन विकासासाठी स्वतंत्र धोरण ठरवण्यात आले. आज होलस्टीन, जर्सी या जास्त दूध उत्पादन देणारे वाण अण्णासाहेबांमुळेच शक्य झाले. दूध उत्पादनात भारत हा जगात दुसर्‍या क्रमांकाचा देश बनला आहे. अण्णासाहेबांचे कृषी क्षेत्रातील योगदान आणि दूरदृष्टी याचा परिपाक म्हणून आज भारत अन्नधान्यात स्वयंपूर्णच नव्हे तर निर्यातदार म्हणून ताठ मानेने उभा आहे. अण्णासाहेब हे राजकारणी म्हणून देशाला लाभले नाहीत तर एक समाजसेवक, संशोधक, तज्ञ, विचारवंत, त्यागी, निःस्वार्थी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व देशाला लाभले.

– अभिनव निवृत्ती गोडसे, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या