अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
प्रशासनातील विविध विभागाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड न संपणारी आहे. वर्षभरात अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 11 विभागात 29 सापळे रचले त्यात 46 जण अडकले. लाच घेण्यामध्ये नेहमीप्रमाणे पोलीस व महसूल विभाग आघाडीवर असल्याचे यावर्षीही दिसून आले. पोलीस विभागात 10 सापळ्यात केलेल्या कारवाईमध्ये 10 पोलीस व त्यांच्यासाठी लाच घेणारे चार खासगी व्यक्ती अडकल्या. तसेच महसूल विभागातील सात कारवाईत सात कर्मचारी (वर्ग 3) व त्यांच्यासाठी तीन खासगी व्यक्तीने लाच घेतली आहे.
सर्वसामान्य व्यक्तींचे कामे लवकर होत नाही अशी नेहमी ओरड असते त्यामागील कारण म्हणजे कामासाठी मोजावे लागणारे पैसे, मात्र ते देण्याची इच्छा नसलेल्या व्यक्तींकडून लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली जाते. अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे वर्षभरात 11 विभागातील लाचखोरीच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामध्ये नगरविकास, वैध मापन शास्त्र, जिल्हा परीषद, पोलीस, विद्युत, पाटबंधारे, महसूल, उत्पादन शुल्क, शिक्षण, वसंतराव नाईक महामंडळ, भूमी अभिलेख या विभागांचा समावेश आहे. त्यात पोलीस विभागातील सर्वांधिक पोलीस अंमलदार लाचेच्या जाळ्यात अडकले आहेत. पोलिसांसाठी लाच घेण्यासाठी खासगी व्यक्तीही मागे राहिलेल्या नाहीत. त्यांच्यासाठी चार खासगी व्यक्तींनी लाच घेतली. तसेच महसूल विभागातील वर्ग तीनचे सात कर्मचारी लाच घेताना सापडले. त्यांच्यासाठी तीन खासगी व्यक्तीही लाच घेताना अडकल्या आहेत. त्याखोलोखाल विद्युत 3, जिल्हा परीषद 2, नगरविकास, वैध मापन शास्त्र, पाटबंधारे, उत्पादन शुल्क, शिक्षण, वसंतराव नाईक महामंडळ, भूमी अभिलेख या विभागात प्रत्येकी एक कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, लाचखोरीत वर्ग एकचे चार व वर्ग दोनचे दोन अधिकारी अडकले आहेत. वर्ग तीनचे तब्बल 27 जणांविरूध्द लाच प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तसेच 13 खासगी व्यक्ती लाचेच्या जाळेत अडकल्या आहेत. सर्वांधिक प्रमाण हे वर्ग तीनच्या कर्मचार्यांचे आहेत. वरिष्ठ अधिकार्यांसाठी लाच मागितल्यानंतर ते सिध्द न झाल्यास फक्त कर्मचारीच यामध्ये अडकला जातो त्यामुळे वर्ग तीनचे कर्मचारी लाचखोरीत आघाडीवर आहेत.
निवडणुकीमुळे यंदा कारवाईत घट
यावर्षी सुरूवातीला लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त होते. त्यामुळे लाचखोरीच्या प्रमाणात मागील वर्षीपेक्षा यापूर्वी अल्पप्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. मागील वर्षी (सन 2023) येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 34 कारवाई केल्या होत्या त्यात 46 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. मागील वर्षी देखील पोलीस व महसूल विभाग लाचखोरीत टॉपवर होता.
कोणत्याही विभागात नागरिकांना त्यांच्या कामासाठी अधिकारी, कर्मचार्यांकडून पैशांची मागणी केली जात असेल तर त्यांनी अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा किंवा लाचलुचपत विभागाचा टोल फ्री क्रमांक 1064 नंबरवर संपर्क करावा. नागरिकांनी न घाबरता तक्रार द्यावी.
– पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर