अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
प्राथमिक शिक्षक पदावरील अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे. याबाबतचे परिपत्रक शालेय शिक्षण विभागाने जारी केले आहे. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने 23 ऑगस्ट 2010 च्या अधिसूचनेद्वारे प्राथमिक शिक्षकांसाठी (1ली ते 8वी)किमान शैक्षणिक व व्यावसायीक अर्हता निश्चित केली असून, शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य केली आहे. पण 20 जानेवारी 2016 च्या शासन निर्णयानुसार अनुकंपा तत्वावर नियुक्त शिक्षण सेवकांना टीईटी उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र हा निर्णय राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने निश्चित केलेल्या अटींशी विसंगत आहे.
त्यामुळे ही सूट अट रद्द करण्यात आली असून अनुकंता तत्वावरील नियुक्त व नव्याने नियुक्त होणार्या शिक्षकांनाही टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याचे अनिवार्य करण्यात आले आहे. ही परीक्षा पास होण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. टीईटी नसल्यास अशा उमेदवारांची शिक्षक पदावरील सेवा बंद करण्यात येईल असा इशाराही या परिपत्रकात देण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे प्राथमिक शिक्षक पदावरील अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना आता तीन वर्षांच्या आत टीईटी परीक्षा पास व्हावी लागणार आहे.