Wednesday, May 29, 2024
Homeनाशिक‘स्टाईस’वर प्रशासकीय मंडळ नियुक्त

‘स्टाईस’वर प्रशासकीय मंडळ नियुक्त

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

तालुक्यातील मुसळगाव ( Sinnar- Musalgaon ) येथील सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीवरील ( STICE ) प्राधिकृत अधिकार्‍याची नियुक्ती नूतन सहाय्यक निबंधक प्रेरणा शिवदास यांनी रद्द केली असून संस्थेचे संस्थापक चेअरमन स्व. सूर्यभान गडाख यांच्या कन्या सुधा माळोदे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय प्रशासकीय मंडळाची नियुक्ती केली आहे.

- Advertisement -

माळोदे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत माजी चेअरमन नारायण पाटील यांची उपाध्यक्षपदी तर सदस्यपदी संजय संपतराव शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

‘स्टाईस’च्या संचालक मंडळाची ऑगस्ट 2020 मध्येच मुदत संपली असून कोवीडच्या संकटामुळे निवडणूक पूढे ढकलत शासनाने संचालक मंडळाला डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानंतरही करोनाचे संकट वाढतच गेल्याने राज्य शासनाने सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणूका डिसेंबर 2021 पर्यंत स्थगित केल्या होत्या. संस्थेवर नामकर्ण आवारे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलची सत्ता असली तरी पुढे संचालक मंडळात फूट पडत गेली.

मावळते चेअरमन पंडित लोंढे यांनी एक वर्षाची मुदत संपल्यानंतरही राजीनामा न दिल्याने आवारे यांच्यासह सात संचालकांनी त्यांच्याशी असहकार पुकारला. लोंढे-अविनाश तांबे गट अल्पमतात असला तरी अविश्वास ठरावासाठी आवश्यक संख्याबळ नसल्याने दोन्ही गटांमध्ये चार-सहा महिने कामकाजावरुन रस्सीखेच सुरू होती. शेवटी आवारे यांच्यासह त्यांच्यासोबतच्या सहा संचालकांनी राजीनामा दिल्याने सत्ताधार्‍यांबरोबर सहाच संचालक शिल्लक राहिले.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 73 अ अ अ (5) मधील तरतूदीनुसार 8 सदस्य कार्यरत नसल्यामुळे कलम 77 अ पोटकलम (1) (1-अ) (ब-1) नुसार संचालक मंडळ 23 जून रोजी राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने बरखास्त करीत प्राधिकृत अधिकारी म्हणून लेखापरीक्षक संजीव शिंदे यांची नियुक्ती केली होती. मात्र, आ. माणिकराव कोकाटे यांनी प्राधिकृत अधिकार्‍याऐवजी प्रशासकीय मंडळ नेमण्यासाठी आग्रह धरला होता.

त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून राज्य शासनाच्या सहकार विभागाने 9 ऑगस्ट रोजी प्रशासक मंडळ नेमण्यास परवानगी दिली. सहकार आयुक्तांनी तसे आदेश 10 ऑगस्ट रोजी सहाय्यक निबंधकांना दिले. त्यानंतर सिन्नरला सहाय्यक निबंधक म्हणून नव्याने रुजू झालेल्या प्रेरणा शिवदास यांनी प्राधिकृत अधिकार्‍याऐवजी तीन सदस्यीय प्रशासकीय मंडळ नेमण्याचा आदेश दिला.

पदभार स्वीकारला

नूतन प्रशासक मंडळाने काल पदभार स्वीकारला. त्यानंतर माजी चेअरमन अविनाश तांबे, पंडित लोंढे यांनी माळोदे यांच्यासह तिघांचाही सत्कार केला. यावेळी माजी संचालिका मीनाक्षी दळवी, माजी संचालक शिवाजी आवारे, बाबासाहेब दळवी, व्यवस्थापक कमलाकर पोटे यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या