नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
देशाच्या संसदेत आज ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होत असताना दुसरीकडे आज भारतीय लष्कराला मोठे यश मिळाले आहे. श्रीनगरच्या लिडवास भागात झालेल्या कारवाईत लष्कराने पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना ठार मारले आहे. चार पैकी तीन दहशतवाद्यांचा खात्मा ऑपरेशन महादेव मध्ये झाल्याची माहिती समोर येते आहे. श्रीनगरच्या हरवन भागात सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. दहशतवादाविरुद्धच्या या कारवाईला ऑपरेशन महादेव असे नाव देण्यात आले आहे. या कारवाईत मारले गेलेले दहशतवादी पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंधित असल्याचे मानले जात आहे.
या कारवाईत आतापर्यंत तीन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांना मारण्यात यश आले आहे. हे दहशतवादी बऱ्याच काळापासून सक्रिय होते. दरम्यान, सुरक्षा दलांमध्ये आणि दहशतवाद्यांमध्ये अद्यापही चकमक सुरू असून परिसरात शोध मोहीम सुरू आहे. सुरक्षा दल पूर्ण दक्षतेने ही कारवाई करत आहेत.
भारतीय सैन्याच्या चिनार कॉर्प्सने ‘एक्स’ (ट्विटर) सोशल मीडियावर यासंदर्भात माहिती दिली. “तीव्र गोळीबारानंतर तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. ऑपरेशन अजूनही सुरु आहे,” असे त्यांनी सांगितले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सुरक्षा दलांचे पथक येथील जंगलात शोध मोहीम राबवत होते, जिथे तीन टीआरएफ दहशतवाद्यांना घेरण्यात आले होते. हा परिसर श्रीनगरच्या बाहेरील भागात आहे. या जंगलात दहशतवाद्यांशी चकमक झाली आणि सर्वजण ठार झाले. या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांचा संबंध पहलगाम हल्ल्याशी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, संरक्षण दलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास सुरक्षा दलाला काही संशयित लोकांची हालचाल दिसली. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी तातडीने परिसरात शोध मोहीम हाती घेतली. या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्यानंतर आता मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




