दिल्ली । Delhi
फुटबॉलचा महान खेळाडू लिओनेल मेस्सी याच्या कोलकाता दौऱ्यात सॉल्ट लेक स्टेडियमवर झालेल्या अभूतपूर्व गोंधळामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठे वादळ निर्माण झाले आहे. या घटनेनंतर आसामचे मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हिमंता बिस्वा सरमा यांनी थेट पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाच अटक करण्याची मागणी केली आहे. गृहमंत्री म्हणून या गोंधळाची जबाबदारी त्यांनी घ्यावी, असे सरमा यांचे म्हणणे आहे.
शनिवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना सरमा यांनी पश्चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर कठोर टीका केली. “कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात झालेला गोंधळ हे स्पष्टपणे दर्शवतो की, राज्यात कायद्याचे राज्य पूर्णपणे कोलमडले आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी हजारो चाहत्यांनी हजारो रुपये खर्चून तिकिटे खरेदी केली होती. मात्र, ‘व्हीआयपी’ संस्कृतीमुळे मेस्सी मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या गर्दीतच राहिला. त्यामुळे प्रेक्षकांना त्याची साधी झलकही पाहता आली नाही, याबद्दल सरमा यांनी संताप व्यक्त केला.
या प्रशासकीय अपयशासाठी सर्वप्रथम राज्याच्या गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि कोलकाता पोलीस आयुक्तांना अटक करावी, अशी थेट मागणी सरमा यांनी केली. मेस्सीसारखा जागतिक आयकॉन कोलकातामध्ये असताना, प्रशासनाच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे अशा प्रकारे अराजकता निर्माण होणे हे बंगालसाठी अत्यंत लज्जास्पद आहे, असे सरमा म्हणाले. इतर राज्यांमध्ये मोठ्या कार्यक्रमांचे झालेले यशस्वी व्यवस्थापन आणि बंगालमधील या गोंधळाची तुलना करून, सरमा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.
मेस्सीच्या पहिल्या वहिल्या भारत दौऱ्यातील कोलकाता लेगमध्ये, सॉल्ट लेक स्टेडियममध्ये तो अवघ्या काही मिनिटांसाठी उपस्थित होता. मात्र, व्हीआयपी लोकांनी त्याला पूर्णपणे वेढल्यामुळे सामान्य चाहत्यांना त्याला नीट पाहताच आले नाही. यामुळे संतप्त झालेल्या जमावाने स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि गोंधळ घातला.
या घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चाहत्यांची माफी मागत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. यासोबतच, कार्यक्रमाच्या मुख्य आयोजकालाही पोलिसांनी अटक केली आहे. तरीही, विरोधकांनी या घटनेवरून पश्चिम बंगाल सरकारला घेरले असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.




