Monday, April 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSanjay Raut: आमच्याकडे फक्त तक्रार करणार? आम्हाला मतं देणार नाही देणार? ठाकरे...

Sanjay Raut: आमच्याकडे फक्त तक्रार करणार? आम्हाला मतं देणार नाही देणार? ठाकरे बंधुंच्या स्फोटक मुलाखतीचा टीझर जारी

मुंबई | Mumbai
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ठाकरे बंधूंची मुलाखत घेतली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची ही मुलाखत ८ आणि ९ जानेवारीला प्रकाशित होणार आहे. त्याआधी ठाकरे बंधूंच्या या मुलाखतीचा पहिला टीझर संजय राऊत यांनी शेअर केला आहे. या मुलाखतीत युतीत आल्यानंतर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पहिला वार केला आहे.

खासदार संजय राऊत आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ठाकरे बंधूंची मुलाखत घेतली आहे. या संयुक्त मुलाखतीमुळे ठाकरे गट आणि मनसे यांचा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा अजेंडा समोर येणार असल्याचे संकेत आहेत. दोन्ही पक्षांनी संयुक्तपणे मुंबई महापालिकेसाठी वचननामा जाहीर केल्यानंतर आता मुलाखत दिली आहे.

- Advertisement -

ठाकरे बंधुंना एकत्र येण्यासाठी २० वर्षे वाट का पाहावी लागली
संजय राऊतांनी शेअर केलेल्या ठाकरे बंधूंच्या स्फोटक मुलाखतीच्या टीझरमध्ये ठाकरे बंधूंना एकत्र येण्यासाठी महाराष्ट्राला 20 वर्षे वाट का पाहावी लागली, असं संजय राऊत प्रश्न विचारताना दिसत आहे. तर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्यासाठी या सगळ्यांचे खटाटोप सुरु आहेत, असा दावा राज ठाकरे करताना दिसत आहे. त्याचबरोबर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधूंच्या युतीबाबत ‘ही करप्शन व कन्फ्युजनची युती आहे’ असे विधान केल्याबाबत संजय राऊतांनी विचारणा करताच राज ठाकरे यांनी “भ्रष्टाचाराच्या गोष्टी तर फडणवीसांनी करूच नयेत”, अशा शब्दांत त्यावर परखड मत व्यक्त केले.

“राज्यात सत्तेत बसवलेली माणसं आहेत सगळी, यातला बसलेला कुणीच नाहीये. आणि बसवलेला माणूस फक्त धन्याचं ऐकतो”, असं म्हणत एका उत्तरादरम्यान राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. तसेच, राज्यात बिनविरोध निवडणुका होण्याच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांकडून पैसे वाटण्यात आल्याचं कारण नमूद केलं. “बिनविरोध निवडणुका झाल्या हा वाटलेल्या नोटांमुळे झालेला प्रॉब्लेम आहे. त्यामुळे नोटाचाही अधिकार गेला”, असं राज ठाकरे म्हणाले.

आमच्याकडे फक्त तक्रार करणार? आम्हाला मतं देणार नाही देणार?
दरम्यान, राज ठाकरेंनी या मुलाखतीमध्ये पुन्हा एकदा मदतीसाठी मनसे पण मतांसाठी नाही या तक्रारीवर भाष्य केलं. सरकारकडून निराशा झाल्यास जनता राज ठाकरेंकडे येईल, असं संजय राऊतांनी या मुलाखतीमध्ये म्हणताच राज ठाकरेंनी त्याबाबत भाष्य केलं. “आमच्याकडे फक्त तक्रार करणार? आम्हाला मतं देणार नाही देणार?” असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

या मुलाखतीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची आक्रमक शैली दिसून आली. राज्यातील राजकारणापासून ते मुंबईतील विविध समस्यांबाबतही यामध्ये भाष्य झाल्याचे दिसून येत आहे. दुर्देवाने आजचे राज्यकर्ते हे मुंबईकर नाहीत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. तर, मुंबईकरांना काय हवेय हे इथे जन्माला आल्याशिवाय कळणार नसल्याचे राज यांनी म्हटले. महेश मांजरेकर यांनी मुंबईतील वाहतूक समस्या आणि इतर प्रश्न उपस्थित केल्याचे टीझरमध्ये दिसून आले.

ताज्या बातम्या

Shrigonda Crime : केरोसीन विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये दुप्पट वाढ

0
अहिल्यानगर (प्रतिनिधी) जगभरातील युध्दजन्य परिस्थितीमुळे एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यावर परिणाम होत असताना राज्य शासनाने पर्यायी उपाय म्हणून केरोसीन वितरणाला चालना दिली आहे. अंत्योदय व प्राधान्य कुटुंब...