मुंबई । Mumbai
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सोनू सूद अडचणीत आला आहे. सोनू सूदच्या विरोधात पंजाबच्या लुधियाना ज्यूडिशियल मॅजिस्ट्रेट रमणप्रीत कौर यांनी अटक वॉरंट जारी केलं आहे.
कोर्टात साक्ष देण्यासाठी सोनू सूदला वारंवार बोलावण्यात आलं होतं. अनेक नोटिसा पाठवूनही सोनूने त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळेच त्याच्या अटकेचं वॉरंट जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यावर आता सोनू सूद काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
लुधियाना येथील वकील राजेश खन्ना यांनी मोहित शुक्ला नावाच्या एका व्यक्तीविरोधात दहा लाख रुपयांच्या कथित फसवणुकीचा खटला दाखल केला आहे. ज्यामध्ये त्यांनी दावा केला आहे की, त्यांना बनावट रिजिका कॉइनमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. यात पैसे गुंतवले तर चांगला आर्थिक फायदा होईल, असं आमिष आरोपींकडून देण्यात आलं होतं. ज्या कॉइनमध्ये गुंतवणूक करण्याचं आमिष दाखवलं होतं, त्या कॉईनचे ब्रँड अॅम्बेसेडर सोनू सूद असल्याचा आरोप आहे.
आता या प्रकरणाशी थेट सोनू सूदचा संबंध नाहीये. पण या फसवणूक प्रकरणात साक्ष देण्यासाठी कोर्टाकडून सातत्याने सोनू सूदला बोलवण्यात येत होतं. मात्र सोनू कोर्टात हजर झाला नाही. यामुळेच त्याच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले. लुधियाना न्यायालयाने आपल्या आदेशात, मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील ओशिवरा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना सोनू सूदला अटक करण्याचे निर्देश दिले.
या सगळ्यावर सोनू सूदने प्रतिक्रिया दिली आहे. माझा या फसवणुकीच्या प्रकरणाशी कसलाही संबंध नाहीये. मी अशा कोणत्याही कॉईनचा ब्रँड अम्बेसेडर नाहीये. यापूर्वी माझ्या वकिलांकडून याबाबत कोर्टात प्रतिसाद देण्यात आला आहे. 10 तारखेला यावर पुन्हा मी माझी बाजू कोर्टात मांडणार असल्याचं सोनू सूदकडून सांगण्यात आलं आहे.