दिल्ली । Delhi
क्रिकेटच्या जगतातून एक मोठी बातमी समोर येत आहे. टीम इंडियाचा माजी फलंदाज रॉबिन उथप्पा विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. रॉबिन उथप्पावर PF घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे.
पीएफ आयुक्त सदाक्षरी गोपाल रेड्डी यांनी पीएफ वॉरंट जारी केला आहे. हे प्रकरण गंभीर असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे या प्रकरणात गांभिर्याने लक्ष घालून आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रॉबिन उथप्पा ‘सेंचुरीज लाइफस्टाइल ब्रांड प्राइवेट लिमिटेड’ ही कंपनी सांभाळत होता. त्याच्यावर आरोप आहे की त्याने कर्मचाऱ्यांच्या खात्यातून पीएफची रक्कम कापली परंतु ती रक्कम कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात जमा केलीच नाही. त्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रॉबिन उथप्पावर एकूण 23 लाख रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. पीएफ आयुक्तसदाक्षरी गोपाल रेड्डी यांनी 4 डिसेंबर रोजी एक पत्र पुलकेशिनगर पोलिसांना लिहिलं होतं. ज्यात उथप्पा विरोधात वॉरंट जरी करून त्याला अटक करण्यात यावे असे निर्देश दिले होते. परंतु पोलिसांनी हे वॉरंट पीएफ कार्यालयाला हे कारण सांगून परत दिलं की रॉबिन उथप्पाने त्याच राहण्याचं ठिकाण बदललं आहे.
रॉबिन उथप्पा सप्टेंबर 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. त्यानंतर तो आता लेजेंड्स क्रिकेट लीगमध्ये खेळताना दिसतो. अलीकडेच हाँगकाँग सिक्स स्पर्धेत भाग घेतला आणि उत्कृष्ट फलंदाजी केली.
उथप्पाने भारतासाठी 48 एकदिवसीय सामने खेळले असून 934 धावा केल्या आहेत. या काळात त्याचा स्ट्राईक रेट 90.59 होता. उथप्पाने भारतासाठी एकूण 13 टी-20 सामने खेळले असून 249 धावा केल्या आहेत. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सहा अर्धशतके आणि एकदिवसीय सामन्यात एक अर्धशतक झळकावले आहे.