अहिल्यानगर (प्रतिनिधी)
शेकोटीसाठी शेतातील लाकडे चोरल्याच्या संशयावरून एका युवकावर चाकूने हल्ला केला. तसेच त्याच्या चुलत्याला मारहाण करण्यात आल्याची घटना गुरूवारी (13 नोव्हेंबर) रात्री 10 वाजेच्या सुमारास काटवन खंडोबा परिसरातील रस्त्यावर घडली. हल्ल्यात जखमी झालेल्या रोहीत रवी पंडीत (वय 21, रा. संजय नगर, काटवन खंडोबा) यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी दिलेल्या जबाबावरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
संतोष अशोक जाधव, अतुल अशोक जाधव (दोघे रा. टिळक रस्ता, अहिल्यानगर) आणि त्यांच्या इतर तीन अनोळखी साथीदारांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी रोहीत पंडीत हे गुरूवारी रात्री काम संपवून मित्रासोबत घरी जात होते. काटवन खंडोबामागील रस्त्यावर शेकोटी पेटलेली दिसल्याने तेथे ते शेकण्यासाठी थांबले. त्यांचा मित्र तेथून निघून गेल्यानंतर, संतोष जाधव तेथे आला. माझ्या मालकीचे लाकूड का आणले? त्याची शेकोटी का करतो? असे म्हणत त्याने रोहीतला मारहाण केली.
यानंतर रोहीत तेथून घरी गेला. मात्र, काही वेळातच गल्लीतील एका मुलाने काटवन खंडोबाजवळ तुझे चुलते सुनील अशोक पंडीत यांचे भांडण सुरू आहे, अशी माहिती दिली. रोहीत तात्काळ घटनास्थळी धावला असता, संशयित आरोपी सुनील पंडित यांना मारहाण करत असल्याचे दिसले. रोहीतने मध्यस्थी केली असता त्याच्यावर चाकूसारख्या धारदार शस्त्राने वार केले आणि जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.




