Friday, May 3, 2024
HomeUncategorizedनिसर्गकन्या बहिणाबाई चौधरी संस्कारक्षम विद्यापीठ

निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी संस्कारक्षम विद्यापीठ

जगदीश गंगाराम ढोले

साध्या सोप्या शब्दांमधून जीवनाचे सारंसपुरं तत्त्वज्ञान सांगणारी, धरतीच्या कुशीतं स्वर्ग पाहणारी खान्देशची निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी आज 3 डिसेंबर त्यांची पुण्यतिथी.

- Advertisement -

‘कर्म हीच पूजा’ मानून संपूर्ण आयुष्यभर उन्हातान्हात कष्ट करीत काव्याला सोबत घेऊन जगणारी बहिणाबाई म्हणजे खान्देशच्या काळ्या मातीला पडलेलं एक हिरवं स्वप्न होतं. अशी ही सरस्वती खान्देशात जन्माला आली. हिचा संपूर्ण खान्देशवासीयांना सार्थ असा अभिमान आहे. केळी, कापूस, ऊस आणि कविता यासाठी प्रसिध्द असणार्‍या आणि गिरणा, तापी, बोरी, सुकी यासारख्या नद्यांनी सुजलाम् सुफलाम् झालेल्या या खान्देशाला कवितेच्या बाबतीत खरी समृध्दी प्राप्त करून दिली ती कवयित्री बहिणाबाई चौधरींनी. स्वतः निरक्षर -असूनही सुशिक्षित, विचारवंत, पंडितांना लाजवेल असं ‘जुन्यात चमकेल व नव्यात

झळकेल’ अशी काव्यरचना त्यांनी केली. बहिणाबाई हा मराठी काव्यसृष्टीतला एक चमत्कारच होता; कारण अक्षरश: शेतात कष्ट करताना सहजपणे ही स्त्री जी गाणी म्हणायची आणि आज तिच गाणी ऐकताना अंगावर चांदण बरसतं. ज्

या काळात बहिणाबाई जगली तो काळ स्त्रियांना घर आणि शेत एवढाच वावर ठेवणारा होता. त्या काळात मराठी काव्यप्रांतात कधी भा. रा. तांबे, कवी नारायण मुरलीधर गुप्ते, कवी केशवसुतांसारखे महान कवी जोमाने काव्यलेखन करीत होते. त्याच काळात जळगावी संसाराच गाणं म्हणत म्हणत जात्यावर दळण दळता ही स्त्री सुंदर व सहजपणे साध्या सोप्या शब्दांमध्ये ओव्या रचत होती. साध्या सोप्या शब्दांत रचलेली, सर्वांना विचार करायला लावणारी बहिणाबाईंची कविता सरस आणि देखणी आहे किंवा देखणी आहे म्हणूनच सरस आहे. एवढ्या साध्या सोप्या भाषेत जीवनाचं शाश्वत, खरंखुरं तत्त्वज्ञान जगाच्या पाठीवर जर कुणी मांडल असेल तर ते केवळ बहिणाबाईंनीच.

अरे घरोटा घरोटा

तुझ्यातून पडे पिठी

तसं माझं गानं

पोटातून येतं ओठी

साधे शब्द परंतु त्यातील आशय, भावसौंदर्य विचारवंतांना विचार करायला लावणारं असंच आहे. बहिणाबाईंची कविता म्हणजे स्वतः समाजाचे जीवनानुभव आहे. ती स्वत: काव्याला सोबत घेऊनच जगली. अगदी सकाळी भल्या पहाटे स्वयंपाक करताना चूल पेटवल्यापासून तर शेताची सर्व कामे करता करता सदैव, सर्वत्र काव्य त्यांच्यासोबतच राहत असे. चूल पेटवताना जर नुसता धूर बाहेर पडत असेल तर ती संतापून म्हणायची,

पेट पेट धुक्कायेला

किती घेसी माझा जीव

आरे इस्तवाच्या धन्या

कसं आलं तुले हीव

बहिणाबाईंची निरीक्षण क्षमता विलक्षण दांडगी होती. सर्व सामान्यांना दिसत नाहीत, जाणवत नाहीत तो निसर्ग सौंदर्यांचा अविष्कार, व्यवहारातील विशेष, शेती शिवारातील बदल, नाते संबंधातील भाव, स्त्री विषयक दृष्टिकोन त्यांच्या सहज लक्षात येतात आणि तेवढ्याच तत्परतेने ते गाण्यातून व्यक्तही होताना दिसतात.

अरे संसार संसार

जसा तवा चुल्ह्यावर

आधी हाताले चटके

तव्हा मिळते भाकर

तल्लकबुध्दी, स्मरणशक्ती, जीवनातील सुख दुःखाकडे समभावाने पाहू शकणारी दूरदृष्टी, उपदेशाचे देशी बोल आणि त्याला विनोदाची तरल व सूक्ष्म खोली, जगण्यातून, अनुभवातून आत्मसात केलेले तत्त्वज्ञान त्यांच्याकडे होते. खर्‍या अर्थाने त्यांच्या कविता वाचल्या तर त्या कवितांमध्ये गद्य वाक्यप्रयोग, बोलीभाषेतील सुंदर वर्णसाम्य, नादसौंदर्य, खान्देशी बोलीचा अचूक वापर यासारख्या वैशिष्ट्यांतून खान्देशी समृध्द संस्कृतीचा वारसा स्पष्टपणे जाणवतो. या संस्कृतीला काव्यपरंपरेत सर्वोच्च शिखरावर नेण्याचे काम खर्‍या अर्थान बहिणाबाईंच्या काव्याने अधिक केलं आहे.

बहिणाबाई हे खर्‍या अर्थाने संसार आणि कविता यांच्याशी एकरूप झालेलं व्यक्तिमत्त्व होतं. त्यांच्या कवितेत जाज्वल्य सत्य दडलेलं आहे. कवितेतून व्यक्त होणारं बहिणाबाईचं व्यक्तिमत्त्व म्हणजे घरादारात, शेतीशिवारात रमलेल्या खानदानी, मराठमोळ्या घरधनीच आहे. संसाराचा सारा गाडा ओढत, कुटुंब, मुलंबाळं, झाडं, झुडुप, निसर्ग या सार्‍यासोबत जीवनातील प्रत्येक गोष्टींवर मनापासून प्रेम करत ही स्त्री कवितेतून जगली.

किमान शब्दांमध्ये अर्थाची कमाल गाठायला लावणारे शब्द सुचायला दैवी प्रतिभा असावी लागते. ती त्यांच्याकडे होती. सामान्य माणसाच्या आशा, आकांक्षा, स्वप्न, अपेक्षा, सुख, दुःख या सर्व गोष्टी आपण सारे बघू शकतो. परंतु, हे दुःख व्यक्त करण्याची शक्ती फार थोड्या माणसांकडे असते. दुसर्‍याचे

दुःख आपल्या शब्दातून साकारायची ताकद ज्या व्यक्तीकडे असते, त्याच्यातील संवेदना खर्‍या अर्थाने ईश्वरसाक्ष संवेदना असते.

तिच ईश्वरसाक्ष संवेदना बहिणाबाईंकडे, त्यांच्या शब्दांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येते. बहिणाबाईंनी सारं जीवनचित्र साध्या-सोप्या शब्दात रेखाटल्याने ते तेवढ्याच सहजपणे रसिकांच्या हृदयापर्यंत भिडते. खान्देशी बोलीतील गोडवा त्यांच्या शब्दरचनेमुळे अधिकच सुखावतो..

मेहरूणचा तलाव

नही लहान सहान

अरे त्यानं भागवली

जयगावची तहान

मोठा आशयदेखील बहिणाबाई अगदी तेवढ्याच सहजपणे, पण तितक्याच विचारप्रवर्तक पध्दतीने मांडतात.

आला सास गेला सास

जीवा तुझं रे तंतर

अरे जगनं मरणं

एका सासाच अंतर !

बहिणाबाईंच्या कविता म्हणजे जीवनविषयक तत्त्वज्ञान आहे. कुणी त्याला चालतं-बोलतं विद्यापीठ, कुणी बावनकशी सोनं तर कुणी मोहरांचा हंडा असेदेखील म्हणतात. जीवनाच्या अखेरपर्यंत मार्ग दाखविणारा हा अनमोल ठेवा आहे. हे साहित्य म्हणजे खान्देशचं देशी लेणं आहे. मराठी वाङ्मयाचे आभूषण आहे. पिढ्या बदलल्या, रसिक बदलले तरीही बहिणाबाईंच्या काव्याची गोडी थोडीदेखील कमी झाली नाही. त्या गाण्याची मोहिनी ओसरली नाही तर दिवसेंदिवस ती वाढतच आहे. त्यात दररोज नवीन जीवनाविषयक दृष्टिकोन सापडतो.

म्हणूनच की काय अलीकडे त्यांच्या काव्यकर्तृत्वाला वैभव प्राप्त करून देणारी घटना घडली ती म्हणजे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव. या विद्यापीठाचा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव असा नामविस्तार करून या खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई व त्यांच्या काव्याचा खर्‍या अर्थाने गौरव झाला आहे. आणि खान्देशवासीयांनादेखील सुखद आनंद प्राप्त झाला. अशा या महान, प्रतिभासंपन्न व संवेदनशील कवयित्रीस त्यांच्या स्मतीदिनी विनम्र अभिवादन !

(लेखक हे धनाजी नाना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, खिरोदा येथे उपशिक्षक आहेत.)

- Advertisment -

ताज्या बातम्या