Monday, July 22, 2024
HomeUncategorizedलसीची लगीनघाई

लसीची लगीनघाई

‘कोरोनाचं आगमन झाल्यावर महिन्याभरातच जगभरातल्या विविध औषधनिर्मात्या कंपन्यांनी औषध आणि लस काढण्याचे दावे केले आहेत. भारतातही 15 ऑगस्टपूर्वी लस बाजारात आणण्याचा दावा भारतीय वैद्यक संशोधन परिषदेनं केला होता. त्यावर साथरोगतज्ज्ञांसह अन्य अनेकांनी टीकेचा सूर लावला, तेव्हा मग विज्ञान मंत्रालयानं लसनिर्मितीची कोणतीही तारीख ठरवली नसल्याचं स्पष्टीकरण दिलं. त्याअगोदर जागतिक आरोग्य संघटनेच्या वैद्यकीय दूतांनी लस बाजारात कधी येईल, याची निश्चित तारीख ठरवता येत नाही.

- Advertisement -

अगोदर प्राण्यांवर चाचण्या, नंतर पिग्मी चाचण्या, क्लिनिकल चाचण्यांचे निष्कर्ष, तीनदा चाचण्या आदी बाबी पूर्ण कराव्या लागतात. शिवाय चाचण्या किती लोकांवर घेतल्या, त्याचे निष्कर्ष काय हे वैज्ञानिक कसोटीवर उतरावं लागतं. त्यासाठी पुरेसा वेळ लागतो. अमुक तारखेलाच हे निष्कर्ष येतील, असंही काही नसतं. कोरोनाचा जगात फैलाव व्हायला लागल्यापासून अमेरिका, इस्त्रायल, चीन, ब्रिटन आदी देशांनी कोरोनाची लस बाजारात आणण्याचे अनेक वायदे केले; परंतु रशिया वगळता अन्य कोणत्याही देशाला कोरोनाची लस बाजारात आणता आली नाही. त्यातच रशियाच्या लसीबाबतही अजून शंका घेतल्या जात आहेत. काही वैद्यकीय तज्ज्ञांनी तर लस यायला वर्ष-दीड वर्ष लागण्याची शक्यता आहे, असं मत व्यक्त केलं. या पार्श्वभूमीवर रशियाची लस बाजारात आली, तर पुण्याच्या सिरम या संस्थेची लस डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बाजारात आणण्याचं अदर पूनावाला यांनी जाहीर केलं आहे.

कोरोनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लस लवकरात लवकर यावी ही अपेक्षा करणं चांगलं आहे; मात्र या लसीच्या निर्माणकार्यात उपयुक्ततेबरोबर सुरक्षिततेचाही विचार केला गेला पाहिजे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं भारत बायोटेक कंपनीसोबत करार केला असून त्यांच्या ङ्गकोवॅक्सीनफ या लसीच्या मानवी चाचण्यांना परवानगी दिली आहे. हैदराबादस्थित कंपनीनं ही लस पुणे इथल्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेबरोबर संयुक्तपणे विकसित केली आहे. संपूर्ण देशात विविध संस्थांमध्ये मानवी चाचण्या करून त्याचं एकत्रित विश्लेषण करूनच लस केव्हा बाजारात येईल, हे कळू शकेल. माणूस आशावादी असतो त्यामुळे लस बाजारात लवकर येईल, या आशेवर कोटयवधी जनता वाट पहात आहे. या लसीच्या मानवी चाचण्या करण्यासाठी देशातल्या बारा संस्थांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये विशेष म्हणजे महाराष्ट्रातल्या नागपूर इथलीही एक संस्था आहे. या संस्थेचं नाव गिल्लूरकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल. निवड करण्यात आलेल्या संस्थांनी या चाचणीसाठी स्वतःहून इच्छुक असणार्या आणि कोणताही आजार नसणार्या निरोगी व्यक्तींची निवड करायची आहे. निवड झालेल्या संस्थानी मानवी चाचणी करण्यासाठी लागणारी कागदपत्रं देऊन परिषदेकडून परवानगी घेणं अपेक्षित आहे.

कोरोनावर उपयुक्त ठरणार्‍या लसीच्या चाचणीचं काम जगातल्या सुमारे 130 कंपन्या करत आहेत. भारतात पहिली क्लिनिकल चाचणी झाली असून दुसर्या चाचणीचं काम सुरू केलं गेलं आहे. या चाचणीत 18 ते 55 या वयोगटातली निरोगी व्यक्ती सहभागी असणं अपेक्षित आहे. कोरोनासारख्या साथरोगाच्या चाचण्या सुरक्षित असतात. त्यामुळे तर विश्वास वाटावा म्हणून रशियातल्या शास्त्रज्ञांनी स्वतःवर चाचण्या करून घेतल्या.

रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी स्वतःच्या मुलीला ‘स्पुटनिक’ या नव्या लसीचा डोस दिला. या चाचणीदरम्यान कुणा व्यक्तीस काही झाल्यास त्यांच्यावर सर्व उपचार मोफत केले जातात. त्यांचा इन्शुरन्स काढून ठेवलेला असतो. तो किती असावा आणि काय असावा याबाबत वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळा निर्णय घेत असतात. चाचणीचे दोन-तीन टप्पे असतात. एकदा त्या व्यक्तीवर चाचणी केली, की 15 दिवसांनी निकाल तपासले जातात.

अपेक्षित असे निकाल आल्यास दुसर्या टप्प्याला सुरवात होते. लस बनवण्यासाठी किंवा त्यावरील क्लिनिकल ट्रायल झाल्यानंतर मानवी चाचण्या करणं हा खरा तर महत्वाचा टप्पा मनाला जातो. कारण त्या चाचण्यांचा मानवी शरीरावर कशा पद्धतीने परिणाम होतो, चाचण्यांचे काय निकाल येतात, यावरच त्या लसीचं यश अवलंबून असतं. कारण या चाचण्या भारताच्या विविध भागात केल्या जाणार आहेत. या चाचण्या दोन-तीन टप्प्यांमध्ये केल्या जातात. या चाचण्या करण्यासाठी संस्थांनी योग्य तो वेळ घेणं अपेक्षित आहे; मात्र कोरोनाचा कहर पाहता त्यांना हे काम युद्धपातळीवर करावं लागतं आहे.

जगभरात लस विकसित करण्याची ठराविक पद्धत अवलंबली जाते. एखाद्या आजारावरची लस बनवताना त्याचे काही साईड इफेक्ट्स तर नाहीत ना हे तपासलं जातं. एखाद्या लसीचे मानवी शरीरावर चाचण्या करण्याचे काही निकष ठरलेले असतात, ते त्या पद्धतीनेच केले जातात. त्यामध्ये कोणतीही तडजोड केली जात नाही, कारण त्या लसीचा उपयोग अंतिमतः आजारी नागरिकांना बरं करण्यासाठी होत असतो. त्यामुळे त्याची सुरक्षितता आणि उपयुक्तता निश्चितपणे तपासली पाहिजे. ही लस विकसित करून बाजारात आणण्यासाठी सुरु असलेल्या धावपळीचं चीज व्हावं, अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. कारण लस बाजारात लवकर आली तर कोरोनमुळे मरणाच्या दारात जाणार्यांना वाचवणं शक्य आहे. ज्या व्यक्तीवर ही चाचणी केली जाणार आहे, त्याच्या सुरक्षितेबाबत कोणतीही तडजोड होता कामा नये. सगळे नियम काटकोरपणे पाळून आणि सर्व मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी करून या मानवी चाचण्या केल्या पाहिजेत.

जगात कोरोनाग्रस्तांची संख्या दोन कोटींपेक्षा जास्त झाली आहे. कोरोनानं सात लाखांहून अधिक जणांचे बळी गेले आहेत. या व्याधीमुळे लागू केल्या गेलेल्या टाळेबंदीनं जगाची अर्थव्यवस्था संकटात आली आहे. कोरोनाचा विस्तार ज्या गतीनं होत आहे, ते पाहता त्यावर सामाजिक अंतरभान, मुखपट्टी, चाचण्या आणि उपचार हेच पर्याय उरले आहेत. विविध देशांमध्ये 160 लसींवर संशोधन सुरू आहे. त्यांच्या मानवी चाचण्या सुरू झाल्या आहेत. चीन, अमेरिका, ब्रिटन या देशांमध्ये कोणाची लस अगोदर येणार, याची जणू स्पर्धा लागली आहे. या सर्वांपासून दूर राहून रशियानं मात्र आपली लस बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं रशियाच्या लसीबाबत शंका घेतली आहे. तरीही रशियाच्या आरोग्य मंत्रालयानं कोरोना विषाणूच्या आजारावर विकसित करण्यात आलेल्या लसीला मंजुरी दिली आहे. कुठल्याही सरकारच्या आरोग्य मंत्रालयाची मंजुरी मिळवणारी ही जगातली पहिली लस ठरली आहे. पुतीन यांनी या लसीची माहिती जगाला दिली. रशियाच्या ङ्गगामालिया इन्स्टिट्यूट ऑफ ऍपिडेमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीफनं ही लस विकसित केली आहे. दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत या लसीच्या मानवी चाचण्या झाल्या. लसीची सुरक्षितता आणि परिणामकारकता तपासण्यासाठी अंतिम फेजच्या क्लिनिकल चाचण्या सुरू राहणार असल्या, तरी सर्वसामान्यांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अमेरिका, चीन, ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्स या देशांच्या आधी रशियाला कोरोना विषाणूवरील लसीची निर्मिती करायची होती. त्या दृष्टीनं जोरदार प्रयत्न सुरू होते. सप्टेंबर आणि ऑक्टोबरपासून या लसीची निर्मिती करण्याचा रशियाचा मानस आहे. दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत या लसीच्या मानवी चाचण्या झाल्या आहेत; मात्र या लसीविरोधात आता काही प्रश्न उपस्थित होत आहेत. या लसीची क्लिनिकल ट्रायल पूर्ण झाल्याचा दावा करणार्या इन्स्टिट्यूटनं अद्याप दुसर्या आणि तिसर्या टप्प्यांची माहिती जाहीर केलेली नाही. लस शोधताना हे दोन टप्पे अत्यंत महत्त्वाचे असतात. शोधण्यात आलेली लस किती सुरक्षित आहे, हे या दोन टप्प्यांमध्ये तपासलं जातं. जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे की, रशियानं पहिल्या टप्प्यात झालेल्या चाचणीचेच आकडे दिले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं रशियाला लसीसाठी घालून देण्यात आलेले नियम पूर्ण करण्याची विनंती केली आहे. रशियाने तयार केलेल्या लसीबद्दल काहीशी चिंता वाटत असल्याचंही म्हटलं आहे. ही लस फक्त असुरक्षितच नाही तर परिणाम न साधणारीही असू शकते असं म्हणत लॉरेन्स गॉस्टिन यांनीही चिंता व्यक्त केली आहे. गॉस्टिन हे जॉर्जटाउन विद्यापीठातले ङ्गग्लोबल पब्लिक हेल्थ एक्स्पर्टफ म्हणून कार्यरत आहेत. या सर्वांच्या आक्षेपांना पुतीन यांनी स्वतःच्या मुलीला डोस देऊन उत्तर दिलं. आता या लसीच्या परिणामकारकतेकडे अवघं जग डोळे लावून बसलं असल्यास नवल नाही.

– प्रा. अशोक ढगे

- Advertisment -

ताज्या बातम्या