Friday, May 3, 2024
HomeUncategorizedकोविड-19 च्या प्रकोपात इतर आजारांकडे दुर्लक्ष

कोविड-19 च्या प्रकोपात इतर आजारांकडे दुर्लक्ष

आतापर्यंत जगातील 213 देशांत कोरोनाग्रस्तांची संख्या 1 कोटी 90 लाखांपर्यंत तर कोविड-19 मुळे मृत्यूचा आकडा 7 लाख 12 हजार इतका झाला. आपल्या देशातही सार्स-कोविडच्या संपर्कात आलेल्यांची संख्या 19 लाख 80 हजारांपर्यंत पोहोचली व संसर्गामुळे 41 हजार रुग्णांचा मृत्यू झाला. टाळेबंदी उठविल्याने व चाचण्यांची संख्या वाढविल्यामुळे भारतात दररोज जवळपास 57 हजार नव्या रुग्णांची भर पडत असून जागतिक आकडेवारीनुसार अमेरिका व ब्राझीलनंतर आपलाच क्रमांक आहे. दिवसेंदिवस परिस्थिती अजून गंभीर होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढल्याने इतर आजारांच्या महाराक्षसाकडे दुर्लक्ष होत आहे, असे दिसून येत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-19 हा वैश्विक स्तरावरील संसर्गजन्य आजार असल्याचे जाहीर केल्यानंतर अनेक देशांनी लॉकडाऊन घोषित केले व संपूर्ण जनजीवन ठप्प झाले. यादरम्यान आरोग्य यंत्रणा कोरोनाग्रस्तांच्या उपचाराला प्राध्यान्य देत असताना मधुमेह, उच्च रक्तदाब, एड्स, मलेरिया व दरवर्षी 15 लाख मृत्यूस कारणीभूत ठरणारा क्षय (टीबी) या आजारांनी महाराक्षकाचे रूप धारण केले आहे.

- Advertisement -

जागतिक आरोग्य संघटनेच्या ग्लोबल मलेरिया प्रोग्रामचे डॉ पेड्रॉ अलोन्सो यांच्या मते कोविड-19च्या प्रकोपामुळे मलेरिया प्रतिबंध उपाययोजना 20 वर्षे मागे फेकली गेली. कोरोनाच्या भीतीमुळे अनेक खासगी दवाखाने बंद असल्याने तसेच सागरी व हवाई वाहतुकीवर बंदी घातल्याने आवश्यक त्याठिकाणी योग्यवेळी औषधी न पोहोचल्याने कोरोना व्यतिरिक्त इतर आजाराने ग्रस्त रुग्णांचे हाल झालेत.

जागतिक स्तरावर टीबी रुग्णांच्या एकूण संख्येच्या 27 टक्के रुग्ण भारतात आहेत. लॉकडाऊनमुळे असे रुग्ण दवाखान्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत किंवा क्षयतज्ज्ञांची कोविड सेंटरला नेमणूक झाल्याने, रुग्णांचे योग्यवेळात निदान व औषध योजना झाली नसल्याने तसेच एक टीबीचा रुग्ण एका वर्षात 15 व्यक्तींना बाधित करू शकतो, या कारणांमुळे परिस्थिती पूर्वपदावर येईल तोपर्यंत जागतिक स्तरावर क्षयरोगाच्या जीवाणूंचा प्रसार होऊन रुग्णसंख्या 63 लाखांपर्यंत वाढून 14 लाख रुग्णांचा मृत्यू होण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेच्या जीवसंख्याकी विभागाने व्यक्त केली आहे.

एड्सच्या रुग्णांना सेवा देणारी रुग्णालये कोरोना केअर सेंटर झाल्याने, एड्सग्रस्तांना देण्यात येणारी अँटिरोट्रोव्हायरल थेरपीचे प्रमाण घटल्याने व त्यावरील औषधींचा तुटवडा झाल्याने एड्समुळे दरवर्षी मृत्यू पावणार्‍यांच्या संख्येत 5 लाखांची भर पडण्याची तसेच मलेरियाच्या रुग्णांची संख्या व त्यामुळे होणार्‍या मृत्यूचे प्रमाण दुप्पट होण्याची भीती 144 देशांचे सर्वेक्षण केल्यावर जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. कोविड-19 सह एड्स, टीबी, टॉयफाइड, मलेरियासारख्या जीवघेण्या राक्षसरुपी आजारांपासून बचाव करण्यासाठी प्रिकोशन इज बेटर द्यान क्युअर याप्रमाणे सावधगिरी बाळगून स्वतःची व परिवाराची काळजी घेणे गरजेचे आहे.

प्रा.डॉ.पी.एस.लोहार – 8806832020 (लेखक हे चोपडा महाविद्यालयात वरीष्ठ प्राध्यापक तथा विद्यापीठात अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आहेत.)

- Advertisment -

ताज्या बातम्या