Sunday, May 19, 2024
Homeअग्रलेखकरोनाचे जेवढे विषाणू; तेवढा धोरणातील गोंधळ जास्त!

करोनाचे जेवढे विषाणू; तेवढा धोरणातील गोंधळ जास्त!

करोनाचे तीन नवे अवतार येऊन गेले. आता चौथ्या अवताराची चर्चा सुरु आहे. एका ठराविक काळानंतर कोरोनाचा विषाणू पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात येणार्‍या सर्दी तापाच्या विषाणूइतकाच सौम्य होईल. भविष्यात ठराविक कालावधीत त्याचे नवीन अवतार येतील; पण ते धोकादायक नसतील असे साथरोग तज्ज्ञ आणि या संशोधक म्हणतात. बदललेला पण कमी तीव्रतेचा विषाणू प्रसारित होत राहील. परंतु लस आणि सामूहिक संसर्गाच्या परिणामामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढल्यामुळे संक्रमण कमी होईल, मृत्यू फार कमी होतील आणि जीवन महामारी पूर्वीच्या सामान्य स्थितीत परत येऊ शकेल असे मत डॉ. नानासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे. ते ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. तरीही राज्यात प्रशासकीय पातळीवर रोजच सावळा गोंधळ का घातला जात असावा? कालचाच गोंधळ बरा होता असे म्हणण्याची वेळ लोकांवर वरचेवर का आणली जात आहे? ओमायक्रॉनच्या संसर्गाचीही भीती व्यक्त होत होती. तरीही दैनंदिन व्यवहार सुरूच आहेत. लोक घरी बसले नाहीत. त्यांची कामे सुरूच आहेत. कोणत्याही आस्थापना बंद नाहीत की परप्रांतीय कामगार घरी परतले नाहीत. लोक करोनाला नुसते सरावलेले नाहीत तर त्यांनी त्याच्याबरोबर जगणे देखील शिकून घेतले आहे हे का यंत्रणेच्या लक्षात येत नाही? त्यासाठी करोना विषाणूला अजून किती अवतार घ्यावे लागतील? आता तोंडाला मुसके बांधायचे की नाही यावर चर्चा सुरु झाली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर चर्चा झाल्याचे सांगितले जाते. याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेतला जाईल आणि करोना कृती दलाशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना सांगितले. ती भूमिका रास्त आहे. मग तरीही या चर्चेला माध्यमांकडे जाणारे पाय कसे फुटले? मास्क वापराचे निर्बंध इतक्यात दूर होण्याची शक्यता नाही, असे एका ज्येष्ठ मंत्र्यांनी सांगितल्याचे समजते. त्यांनी तरी हे कशाच्या आधारे सांगितले असावे? तोंडाला मुसके बांधून लोक वैतागले आहेत. या चर्चेचा आधार घेऊन आता तोंडाला मुसके बांधले नाही तरी चालेल असा काहींचा समज झाला तर ते चूक ठरवले जाऊ शकेल का? काहींनी मुसके बांधायचेच नाकारले तर? शास्त्रीय निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्री म्हणत असतांना बैठकीत त्यावर चर्चा झाली हे तरी का सांगितले जाते? अनेक मुद्यांवर चर्चा करण्यासाठीच मंत्रिमंडळाची बैठक होत असते. तथापि जनतेला माहित व्हावे असा इतर कोणताही विषय मंत्रिमंडळात चर्चिला जातच नाही असे जनतेने समजावे का? हाच गोंधळ अनेक बाबतीत लोकांच्या अनुभवास येत आहे. सर्व इयत्तांच्या सर्व शाळा सुरु झाल्या आहेत पण महाविद्यालये मात्र बंदच आहेत. लहान मुलांना संसर्गाची भीती नाही पण मोठ्या वयाच्या मुलांना मात्र आहे हे सरकारने कशावरून ठरवले? शाळा सुरु कराव्यात की नाही याचाच गोंधळ खूप काळ घातला गेला. निर्णय घेतला गेला आणि लगेच मागेही घेतला गेला. आम्ही ३-४ वेळा करोना चाचणी करून कंटाळलो आहोत. चाचण्या करून आमच्या नाकाची भोके मोठी व्हायची वेळ आली आहे अशी उद्विग्न प्रतिक्रिया शिक्षक व्यक्त करतात. निर्णय प्रक्रियेतील धरसोडवृत्तीचा हा परिणाम आहे. लसीकरणाची बोगस प्रमाणपत्रे देणारे रॅकेट उघडकीस आले. अशा टोळ्या कशा फोफावल्या? दोषींवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. तथापि किती जणांवर कारवाई करण्यात आली ते अजून गुलदस्त्यातच आहे. राज्यातील साधारणतः १ कोटी लोकांनी लसीची पहिली मात्रा देखील टोचून घेतलेली नाही. याची कारणे किंवा त्यांनी लस टोचून घ्यावी म्हणून सरकारने काय उपाययोजना केल्या हे किती सरकारी अधिकारी सांगू शकतील? सुरुवातीपासूनच करोना हा विलक्षण गोंधळाचा विषय बनला आहे. त्यात सरकारने आणखी भर घालू नये असेच लोकांना वाटत असणार. तेव्हा आता तरी धोरणातील गोंधळ संपेल का? निर्णय घेतले जातील आणि मग जाहीर केले जातील का? चर्चा सुरु आहे, निर्णय होण्याची शक्यता आहे अशा शक्यता-अशक्यतांना पायबंद घातला जाईल का?

- Advertisment -

ताज्या बातम्या