इगतपुरी | प्रतिनिधी
पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरी तालुक्यात यंदा पावसाने पाठ फिरविल्याचे चित्र समोर येत आहे. मान्सून दाखल होऊन वीस दिवसांचा अवधी उलटूनही तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने धरणांनी तळ गाठला आहे. रोजच ढग काही वेळ जमा होतात मात्र पाऊसच पडत नाही. दरवर्षीच्या प्रमाणात सरासरी पेक्षाही कमी पाऊस झाल्याने तालुक्यात यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अशीच जर परिस्थिती राहिली तर तालुक्यात मोठी पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बळीराजाही पावसाची चातका प्रमाणे वाट पाहत आहे. सुरवातीला थोडा पाऊस पडला त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या मात्र पावसाने उघडीप दिल्याने या पेरण्या व्यर्थ गेल्याने याचा फटका आता शेतकऱ्यांना बसतांना दिसत आहे. यामुळे आता शेतकरी आर्थिक संकटात असुन पावसा अभावी दुबार पेरणीचे संकट त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे.
शासनाने जमलेल्या ढगांवर फवारणी करून कृत्रिम पाऊस पाडून दिलासा द्यावा अशी मागणी आता तालुक्यातून समोर आहे. सद्य स्थितीत दारणा धरणात 3.64, कडवा धरणात 6.40, मुकणे धरणात 2.43 तर वालदेवी, भावली, वाकी, तळेगाव डॅममध्ये 5.01, भाम धरणात 0 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मुंबई व मराठवाड्यातील जिल्ह्यांना इगतपुरी तालुक्यातील धरणांमधुनच वर्षभर पाणी पुरवठा केला जातो. मात्र पावसाने अशीच जर ओढ दिली तर मोठा दुष्काळ पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा