Friday, November 22, 2024
Homeनगरआशा व गट प्रवर्तकांचे जिल्हा परिषदेत आक्रोश आंदोलन

आशा व गट प्रवर्तकांचे जिल्हा परिषदेत आक्रोश आंदोलन

शासनाची कामे करणार्‍या बहिणींना हक्काचे पैसे दिले जात नसल्याचा आरोप

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

24 मार्चच्या परिपत्रकाप्रमाणे मानधनात दिलेली वाढ मिळण्यासह विविध मागण्यांसाठी राज्य आशा व गटप्रवर्तक संघटना आयटक संलग्न व जिल्हा आशा कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदसमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यासाठी आशा सेविका व गट प्रवर्तकांनी जोरदार निदर्शने केली. प्रत्येक शासकीय योजनांचा भार आशा सेविकांवर लादला जात आहे. राज्य सरकारने लाडकी बहिणींना दरमहा पैसे देण्याचे गाजर दाखविले असून मात्र ज्या बहिणींनी शासनाचे काम केले त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे दिले जात नसल्याचा सूर आंदोलक महिलांमधून उमटला.

- Advertisement -

या आंदोलनात जनरल सेक्रेटरी कॉ. अ‍ॅड. सुधीर टोकेकर, कार्याध्यक्ष कॉ. सुरेश पानसरे, ऊषा अडानगले, वर्षा चव्हाण, आशा देशमुख, वैजयंती गायकवाड, मनीषा डम्भे, मुक्ता तांबे, जयश्री गुरव, अश्विनी गोसावी, सोनाली शेजुळ, निर्मला खोडदे, शीतल जाधव, स्मिता ठोंबरे आदींसह जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आशा वर्कर यांचे स्थानिक व राज्यस्तरीय प्रश्न असून, ते सोडविणे आवश्यक आहे. महिनाभर काम करून देखील तीन ते चार महिने मानधनासाठी वाट पाहावी लागते, ही अत्यंत खेदाची बाब आहे. मागील नोव्हेंबर 2023 पासून सुरू झालेले वाढीव मानधन हे अद्यापही आशा वर्कर यांच्या खात्यावर जमा झालेले नाही. ते ताबडतोब जमा व्हावे, संघटनेला आलेले मानधन व परिपत्रकाची माहिती ई-मेल अथवा व्हॉट्सअपव्दारे मिळण्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले. माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांनी आंदोलनास पाठिंबा देऊन आशा व गटप्रवर्तकांच्या प्रश्नावर त्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे सांगितले.

बीएफ (ब्लॉक फॅसिलिटर) यांना 24 मार्च 2024 रोजी निघालेल्या परिपत्रकाप्रमाणे नोव्हेंबर 2023 पासून एक हजार रूपये वाढ दिलेली आहे. सदरचा जीआर नुकताच जून महिन्यात नव्याने काढण्यात आलेला आहे. त्यामध्ये संघटनेने गटप्रवर्तक यांना 10 हजार रुपये वाढ देण्याची सातत्याने मागणी केली आहे. याबाबत गेल्या सहा महिन्यांपासून महाराष्ट्र शासनाला व त्यांच्या सर्व मंत्र्यांना निवेदन देऊन मागणी केलेली असताना 10 हजार रुपये दिलेले नाही. दिलेले एक हजार रूपये नाकारून, जोपर्यंत 10 हजार रूपये मानधन देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. विजय गायकवाड यांनी राज्य पातळीवरील मागण्यांवर वरिष्ठ स्तरापर्यंत पाठपुरावा करण्याचे व स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. या मागणीचे निवेदन जिल्हा समन्वयक संज्योत उपाध्ये यांना देण्यात आले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या