मुंबई | Mumbai
भारतीय संगीत क्षेत्रातील जेष्ठ गायिका, सूरसम्राज्ञी, पद्मविभूषण आशा भोसले यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. रविवारी, १२ एप्रिल रोजी आशा भोसलेंनी ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे आशा भोसलेंचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर आज सोमवारी (ता. १३ एप्रिल) सायंकाळी ५.१५ वाजता आशा भोसलेंच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आहे.
तब्बल सहा दशकं रसिकप्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज अनंतात विलिन झाला. आशाताईंच्या जाण्यानं सूरही गहिवरलेत. तर, शब्दही हिरमुसलेत. फक्त सिनेसृष्टीच नाहीतर, अख्खा देश शोकसागरात बुडालाय. आशा भोसले यांचे जाणे हा संपूर्ण देशासाठी धक्का आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कॅबिनेटमधील अनेक मंत्री, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, महापौर रितू तावडे, मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच, अभिनेत्री तब्बू, अभिनेत्री आशा पारेख, अभिनेता रितेश देशमुख, गायक सुदेश भोसले, अभिनेते राकेश रोशन, अभिनेत्री नीना गुप्ता, मंगलप्रभात लोढा आणि भय्याजी जोशी, सुप्रिया सुळे, आशिष शेलार, राज्यपाल जिष्णू देव शर्मा, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे तसेच विश्वास नांगरे-पाटील यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
अनेक दशके जगातील रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या पार्थिवावार आज दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, लोअर परळमधील त्यांच्या निवासस्थानी आशाताई भोसले यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेले. यानंतर दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी आशाताईंच्या अखेरच्या प्रवासाला अर्थात त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली. त्यांच्या अंत्ययात्रेत “आशाताई अमर रहे,” “जब तक सूरज चाँद रहेगा, आशाताई का नाम रहेगा” अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिकांनी आशाताईंच्या पार्थिवावर फुले अर्पण केली.
यानंतर दुपारी 4.30 वाजता आशा ताईंचे पार्थिव हे दादर, शिवाजी पार्क स्मशानभूमीत पोहोचले. यावेळी संपूर्ण भोसले कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित होते. आशा भोसलेंची बहीण, गायिका उषा मंगेशकर यांनी सर्वप्रथम आपल्या लाडक्या बहिणीला निरोप दिला. त्यानंतर प्रोटोकॉलनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व अन्य नेतेमंडळींनी, सिनेसृष्टीतील अभिनेते आमिर खान, विकी कौशल, माजी महापौर श्रद्धा जाधव, गायक शान, सुदेश भोसले, अभिनेता विवेक ओबेरॉय, संगीतकार अनु मलिक, भजन सम्राट अनुप जलोटा, गायक नंदेश उमप यांनी पुष्पचक्र वाहात आशाताईंना अभिवादन केले. यावेळी गायकांनी आशाताईंना गाणे म्हणत अनोखी श्रद्धांजली वाहिली.
दादरच्या स्मशानभूमीत दुपारी ४ वाजून ५० मिनिटांनी आशाताईंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार विधी करण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी त्यांची लाडकी नात जनाई भोसले हिला अश्रू अनावर झाले. त्यानंतर धार्मिक विधिंना सुरुवात करण्यात आली. धार्मिक विधि झाल्यानंतर त्यांना पोलिसांकडून सलामी देण्यात आली. या सलामीनंतर शासकीय इतमामांत सर्वांच्या लाडक्या आशा भोसलेंवर अग्निसंस्कार करण्यात आले.
व्हर्सेटाईल गायिका म्हणून ओळख
भारतरत्न आणि ‘गानसम्राज्ञी’ लता मंगेशकर यांची लहान बहीण असलेल्या आशा भोसले यांना हिंदी सिनेसृष्टीची व्हर्सेटाईल गायिका म्हणून ओळखल जायचे. तब्बल सहा दशकं त्यांनी इंडस्ट्रीत आपल्या गाण्यांना आवाज दिलाय. त्यांनी केवळ हिंदीतच नाहीतर, मराठी, बंगाली, गुजराती, तमिल, तेलुगुसह अनेक भाषांमध्ये गाणी गायलीत. हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज संगीतकार आरडी बर्मन, ओपी नैय्यर, सचिन देव बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्यासोबत त्यांनी अनेक अजरामर गाणी गायली.





