पैठण । प्रतिनिधी
आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi ) निमित्त पैठण येथील नाथ समाधी मंदिरात लाखो वारकऱ्यांनी भक्तीभावाने दर्शन घेतले. वारकऱ्यांच्या ‘भानुदास एकनाथ’ च्या जयघोषाने अवघी पैठणनगरी दुमदुमली आहे.
सकाळी रेणुकादेवी शरद साखर कारखान्याचे चेअरमन विलास भुमरे, नाथ संस्थानचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे, शेखर शिंदे नामदेवराव खराद, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पवन लोहिया यांच्यासह मान्यवरांनी नाथांचे दर्शन घेऊन तालुक्यात चांगला पाऊस पडू दे, बळीराजा सुखू दे असे नाथांना साकडे घातले. एकादशी निमित्त विविध सामाजिक संघटनांनी वारकऱ्यांना साबुदाणा खिचडी, पिण्याचे पाणी, केळी, बटाटा चिप्स आदी उपवासाच्या फराळ पदार्थांचे मोफत वाटप केले.
हे देखील वाचा : “बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे…”; मुख्यमंत्र्यांनी घातले पांडुरंगाच्या चरणी साकडे
आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकऱ्यांनी पहाटे गोदावरी नदीत पवित्र स्नानासाठी मोठी गर्दी केली होती. स्नान करून नाथ समाधी मंदिर व गावातील नाथमंदिरात दर्शनासाठी वारकऱ्यांनी लांब रांगा लावल्या होत्या. भानुदास एकनाथ च्या जयघोषाने संपूर्ण शहर नाथभक्तीमय झाले होते.
आषाढी एकादशीला पंढरपूर येथे जावू न शकले वारकरी व भाविक पैठण येथे नाथांच्या दर्शनला येतात. यावेळी नाथ मंदिरात वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. वारकऱ्यांना मंदिरात सुरळीत दर्शन घेता यावे यासाठी नाथ संस्थानचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे, महेश खोचे, पांडुरंग निरखी, मारोती वाणी यांनी विशेष व्यवस्था केली होती.
हे देखील वाचा : ‘लाडकी बहिण’नंतर आता लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा मिळणार ‘इतकी’ रक्कम
येणाऱ्या वारकऱ्यांना शहरातील विविध रस्त्यावर सामाजिक संघटनांनी साबुदाणा खिचडी, केळी, बटाटा चिप्स, पिण्याचे पाणी आदी फराळाचे पदार्थ मोफत वाटप केले. पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दशरथ बुरकुल, संजय मदने, पोका. सुधीर ओव्हळ, नरेंद्र अंधारे यांनी वारकऱ्यांचे चोरट्यांपासून संरक्षण व्हावे यासाठी शहरात व मंदिर परिसरात विशेष पोलीस बंदोबस्त ठेवला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा