महाराष्ट्रात आषाढी एकादशीला एक वेगळेच स्थान आणि महत्त्व आहे. पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला इथे वारकर्यांचा मोठा मेळा भरतो. एक महिना आधीपासूनच याची तयारी सुरू होते. विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी याठिकाणी अगदी भक्तीभावे येऊन पोहचतात. याचा सोहळा अगदी डोळे दीपवून टाकणारा असतो.
आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असा समज आहे. त्यामुळेच या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पंढरपूर हे असे स्थान आहे जिथे अदृश्यरित्या भगवंताच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो असे म्हटले जाते. वैकुंठभूमीच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आले असा इथल्या लोकांचा समज आहे. म्हणूनच पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा तीर्थक्षेत्राचा पंढरपूर असा उल्लेख आपल्याला दिसून येतो. संत नामदेवांनी आपल्या अभंगात म्हटल्याप्रमाणे आधी रचिली पंढरी, नंतर वैकुंठ नगरी असा उल्लेखही आढळतो. पंढरपूर आणि काशीविश्वेश्वर ही दोनच अशी तीर्थक्षेत्रे आहेत जी कधीही नाश पावणार नाहीत असे सांगण्यात येते. त्यामुळेच आषाढी एकादशीला खूपच महत्त्व देण्यात येते. दर आषाढी एकादशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात जातात आणि ही परंपरा आठशे वर्षांपेक्षाही अधिक काळापासून सुरू असल्याचे सांगण्यात येते.
अगदी पूर्वीच्या काळी जेव्हा संतमहात्मे एकत्र यायचे तेव्हा प्रत्येकजण एकमेकांच्या चरणांवर डोके ठेऊन एकमेकांबद्दल असणारा आदर व्यक्त करायचे. पायावर डोके ठेवल्याने लाभ होतो असा समज होता. त्यामुळे आजही आपल्याकडे थोरामोठ्यांच्या पाया पडण्याची परंपरा कायम आहे. पायावर डोके ठेवल्याने दोघांचेही तेज वाढून अंगात असणारा मी पणा, अहंकार आणि ताठा कमी होतो असे म्हटले जाते. ईश्वर हा चराचरात आहे ही भावना अधिक बळावते. तसंच पूर्वी एकमेकांची भेट घेऊन आपापले अनुभव, कथा, रचना, अभंग आणि भजने याची देवाणघेवाण करण्यात येत असे. तीच परंपरा कायम सुरू ठेवण्यात आली आहे. कार्तिकी एकादशीपासून ते आषाढी एकादशीपर्यंतच्या व्यष्टी आणि समष्टी या साधनेचा एकमेकांकडे अनुभव देण्यासाठी आणि पुढीला पिढीला योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी आषाढी एकादशी या दिवसाला महत्त्व प्राप्त झाल्याचे सांगण्यात येते.
एकादशी महात्म्य कथा नक्की काय आहे हे प्रत्येकाला माहीत असायलाच हवे. एकादशी महात्म्य मराठीत जाणून घेण्यासाठी आम्ही तुम्हाला या लेखातून मदत करत आहोत. एकादशीला अनादी काळापासून महत्त्व आहे. पण एकादशी महात्म्य कथा नक्की काय आहे तुम्हाला त्याची माहिती आहे का? आपल्याकडे पौराणिक, ऐतिहासिक या प्रत्येक कथा असतात. अशीच एकादशी महात्म्य कथा जाणून घ्या.
भगवान शंकर यांनी प्रसन्न होत मृदुमान्य नावाच्या राक्षसाला इतर कोणाकडूनही न मरता केवळ एका स्त्रीच्या हातून मरशील असा वर दिला होता. या वरामुळे मृदुमान्य हा राक्षस खूपच उन्मत्त झाला आणि त्याने आपल्याला कोणतीही स्त्री मारू शकत नाही असा मनात विश्वास ठेवत देवांवर स्वारी केली. यावेळी शंकराकडे अन्य देवांनी मदतीसाठी धावा केला. पण वर दिल्यामुळे शंकर भगवान यांनाही काहीही करता येत नव्हते. त्याचवेळी देवाच्या श्वासातून एक देवी निर्माण झाली आणि तिने मृदुमान्य राक्षसाला ठार केले. त्या दिवशी तुफान पाऊस पडत असल्याने सर्व देवतांना स्नानही घडले. तसंच सर्वजण राक्षस मरेपर्यंत गुहेत लपून राहिल्याने या दिवशी त्यांना पूर्ण दिवस उपवास घडला होता. या देवीचा नाव होते एकादशी आणि त्यामुळेच या दिवशी एकादशीचा उपवास करण्याचा प्रघात पडला. शास्त्र आणि वेदानुसार, जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूसह एकादशी देवीची मनोभावे उपासना करते त्यांना पापातून मुक्तता मिळते असा समज आहे. तसंच उत्तरोत्तर प्रगतीसाठी आषाढी एकादशीची उपासना कामी येते असाही समज आहे.
आषाढी एकादशीला बरेच जण उपवास करतात. उपवासाचे अनेक पदार्थ खाऊनही या दिवशी काही जण उपवास ठेवतात तर काही जण अगदी निर्जळी उपवास करतात. एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एकभुक्त राहायचे असते. एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णूपूजन करावे. हा संपूर्ण दिवस उपवास करायचा असतो. रात्री हरिभजन करत जागरण करायचे. विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालवायचा असतो. यादिवशी पंढरपूरमध्ये असणारे वारकरी तर उपवासासहित विठ्ठलाची आरती, विठ्ठल नामाचा जयघोष करत असतात. आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणे सोडायचे. या दोन्ही दिवशी विष्णू देवाची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधीही करण्यात येतो. वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक मुख्य संप्रदाय आहे. तर विठ्ठल हा विष्णूचा अवतार समजण्यात येतो. या संप्रदायात वार्षिक, सहमाही जशी दीक्षा घेण्यात आली असेल तशा स्वरूपात वारी काढण्यात येते. पण वारी पायी केली तर शारीरिक तप घडते असाही समज आहे. तसंच सर्व पाप यामुळे निघून जाते असाही समज आहे. म्हणूनच अत्यंत मनोभावे हे आषाढी एकादशीचे व्रत करण्यात येते.