Sunday, September 29, 2024
Homeनगरआषाढी एकादशीनिमित्त दर्शनासाठी साईभक्तांची गर्दी

आषाढी एकादशीनिमित्त दर्शनासाठी साईभक्तांची गर्दी

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

आषाढी एकादशी निमित्ताने साईबाबांना विठ्ठल स्वरूप मानणार्‍या लाखो साई भक्तांची साईनगरीत मांदियाळी जमली, साई-विठ्ठलाच्या नामघोषाने अवघी साईनगरी दुमदुमली. आषाढी एकादशी निमित्त शाबुदाणा खिचडी महाप्रसादाचा जवळपास 55 हजार भाविकांनी लाभ घेतला. बुधवारी आषाढी एकादशी निमित्त शिर्डीत विविध राज्यातून साई भक्तांनी साई दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. शिर्डी परिसरातील अनेक गावांतील नागरिकांनी संस्थानच्या प्रसादलयात येऊन शाबुदाणा खिचडीचा आस्वाद घेतला. आषाढी एकादशीनिमित्त साई प्रसादालयात आयोजित शाबुदाणा खिचडी महाप्रसादामध्ये सुमारे 55 हजार भाविकांनी प्रसाद ग्रहण केला.

- Advertisement -

तर 29 हजार 200 भाविकांनी अन्नपाकिटांचा लाभ घेतला. यासाठी संस्थानने 71 पोते शाबुदाणा, 45 पोते शेंगदाणे, 1020 किलो तूप आणि सुमारे 3600 किलो बटाटे यासह इतर अनेक साहित्याचा वापर केला. कर्नाटकमधील देणगीदार एस. प्रकाश यांच्या देणगीतून साईबाबा समाधी मंदिर, द्वारकामाई, चावडी आणि गुरुस्थान याठिकाणी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. पहाटे मंगलस्रानानंतर साईंच्या समाधीवरील मूर्तीवर पुष्पहार व सुवर्ण अलंकाराबरोबर तुळशीचा हार घातला. तसेच शिर्डी माझे पंढरपूर या आरतीच्यावेळी उपवासाचा नैवेद्य दाखवला. मोठ्या संख्येने भाविकांनी शाबुदाणा खिचडीचा लाभ घेतल्याचे संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर व प्रसादालय प्रमुख रमेश गोंदकर यांनी सांगितले़

- Advertisment -

ताज्या बातम्या