Tuesday, May 21, 2024
Homeसंपादकीयमाझा भाव तुझे चरणी...

माझा भाव तुझे चरणी…

कोरोनाच्या संकटामुळे यंदाचा आषाढी वारी सोहळा रद्द करण्यात आल्याने पंढरपुरात प्रथमच फारशी वर्दळ दिसणार नाही. गुलाल, बुक्क्याच्या, प्रसादाच्या, हार-फुलांच्या दुकानातही गर्दी असणार नाही. जागोजागी विठुनामाचा गजर कानी पडणार नाही. अर्थात, ‘देव भावाचा भुकेला’ म्हणत वारकरी आपापल्या ठिकाणी विठ्ठलाची मनोभावे पूजा करतील आणि ‘विठ्ठला, हे संकट लवकर टळू दे’ अशी मनोभावे प्रार्थना करतील.

डॉ. नरेंद्र कुंटे

- Advertisement -

आषाढी एकादशीला लाखोंच्या भक्तांनी फुललेलं पंढरपूर तीर्थक्षेत्र. सर्वत्र विठुनामाचा ऐकू येणारा गजर, विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने तासनतास दर्शन रांगेत उभे राहिलेले भाविक, चंद्रभागेच्या स्नानासाठी झालेली भाविकांची गर्दी, विठ्ठल मंदिराच्या कळसाचं मनोभावे दर्शन घेणारे भाविक, सर्वांच्या चेहर्यावर दिसणारं समाधान, असा हा सारा वैष्णवांचा मेळा. त्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी जमलेला… विविध संतांच्या पालख्यांसोबत हजारो वारकरी दर वर्षी नेमाने पंढरपूरला आषाढी वारीसाठी येतात. त्याचप्रमाणे एस.टी., रेल्वे तसंच खासगी वाहनांमधूनही भाविक मोठ्या संख्येनं पंढरपूरमध्ये दाखल होतात. पहावं तिकडं भाविकांची दाटी दिसून येते. जागोजागी हार-फुलं, प्रसादाच्या दुकानांमध्ये भावकांची मोठी गर्दी असते. शहरातले लॉज, मठ, धर्मशाळा भाविकांच्या सोयीसाठी सज्ज असतात. काही घरांमध्ये, वाड्यांमध्येही भाविकांची व्यवस्था केली जाते. या वारीच्या काळात प्रशासन विविध पातळ्यांवर कार्यरत असतं. येथे करावयाच्या विविध व्यवस्थांची तयारी काही महिने आधीपासून सुरू असते. आषाढीला हा भाविकांचा महासागर पाहून धन्य धन्य झाल्यासारखं वाटतं. कुठलाही भेदभाव न करता सारे विठ्ठलभक्त विठ्ठलभक्तीत, त्याच्या नामस्मरणात दंग असतात. ‘संतभार पंढरीत। किर्तनाचा गजर होत’ असं याचं यथार्थ वर्णन करण्यात आलं आहे.

यंदाच्या वर्षी मात्र पंढरपूरमध्ये हे चित्र पहायला मिळणार नाही. कोरोनाच्या संकटामुळे यंदाचा आषाढी वारी सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे प्रस्थान सोहळ्यापासून पंढरपूरपर्यंत लाखो भाविकांसह मजल-दरमजल करत जाणारा पालखी सोहळा यंदा पाहता आला नाही. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरला. वारकरी बांधवांनी या निर्णयाला अनुमती दिली. शिवाय आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये दर्शनासाठी भाविकांना पास न देण्याचा निर्णयही घेण्यात आला. त्यामुळे यंदाच्या आषाढी एकादशीला प्रथमच भाविकांविना, फारशी वर्दळ दिसून येणार नाही.

गुलाल, बुक्क्याच्या, प्रसादाच्या, हार-फुलांच्या दुकानातही गर्दी असणार नाही. जागोजागी विठुनामाचा गजर कानी पडणार नाही. अर्थात, देव भावाचा भुकेला, या न्यायाने वारकरी आपल्या राहत्या ठिकाणी विठ्ठलाची मनोभावे पूजा करतील, दर्शन घेतील आणि ‘विठ्ठला, हे संकट लवकर टळू दे. पुढच्या वर्षी तुझ्या दर्शनासाठी नक्की येईन’ अशी प्रार्थना करतील. असं असलं तरी, आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या तीर्थक्षेत्राची महती समस्त वारकर्यांकडून आलवली जाणार आहे.

पंढरीच्या भक्तीपिठावर 28 युगांपासून भक्ती, संस्कृती आणि सामाजिकता यांच्या त्रिवेणीसंगमात हा विठ्ठल विष्णूरूप परब्रह्म असला तरी वारकर्यांच्या उत्कट प्रेमभक्तीमुळे महाराष्ट्राची लोकदेवता म्हणून तो महाराष्ट्रापुरताच राहिला नसून देश-विदेशापर्यंतच्या भाविकांना आपलासा वाटू लागला आहे. निवृत्ती ते निळोबा या वारकरी संप्रदायाच्या संत परंपरेतले नामदेव, एकनाथ आणि तुकाराम महाराज यांच्याबरोबरच नामदेवांच्या प्रभावळीतल्या अनेक संतांनी अनुभवलेली भक्ती आणि निती यांची सांगड घालून आपल्याच ठिकाणी पांडुरंग पाहणारी महामानवतेची शक्ती अशा प्रकारे राज्यातच नव्हे तर देशात, जगात पसरत आहे.

भक्तीपिठावरील पंढरीचा राजा हाच आमचा एकमेव आदर्श असा कृपाळू देव आहे ही वारकर्‍यांची श्रद्धा असते. याचं कारण राजकीय परिवर्तनापेक्षाही अध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक परिवर्तनाची संतांनी रोवलेली मुहूर्तमेढच सर्वाधिक महत्त्वाची आहे. वारकरी म्हणजे विश्वासार्हतेचा एक पाईक, श्रध्देच्या बळावर भक्ती करणारा एक साधक होय. मुखात नित्याने असणारी ज्ञानेश्वरी गाथा वाणीला आणि अंत:करणाला आनंद देणारी असते. त्यामुळे वाट पंढरीची, हात विठ्ठलापुढे जोडलेले, मुखातून ओवी-अभंग, कपाळावर बुक्का, खांद्यावर पताका आणि काखेत एक लहानसं गाठोडं या अवस्थेतून सांसारिक निवृत्ती आणि पारमार्थिक प्रवृत्ती यांची वाटचाल म्हणजे वारी, असं यथोचित वर्णन केलं जातं. असा हा अनुपम सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी लोटते. या वर्षी मात्र हा सोहळा डोळ्यात साठवता येत नसल्यामुळे अनेकजण व्याकुळ झाले असतील.

पंढरपूर या क्षेत्राची महती अवर्णनीय आहे. पुंडलिकाने पंढरीत भक्तिपीठ स्थापन केलं. काहीजण त्याला भक्तिपेठही म्हणतात. या भक्तिपेठेत त्याने विठ्ठलनामाचं बीज पेरलं. संतांनी भक्तिपेठेत येऊन आणि विठ्ठल गर्जना करुन हे नामबीज इतकं वाढवलं की, आतापर्यंत असंख्य भाविकांनी विठ्ठलनाम घेतलं तरी पंढरीपेठ अद्याप नामराशीने समृध्दच राहिली आहे. हे विठ्ठलनाम घेण्यासाठी आणि या नामबीजाची परिणती विठ्ठलदर्शनरुपी फळभारात आलेली पाहण्यासाठी भक्त आसुसलेले असतात. संत निळोबाराय सांगतात, पंढरीपेठेत हा पांडुरंग एकटाच अवतरला आहे काय? नव्हे, त्याने आपल्याबरोबर आणखीही समुदाय आणला आहे.

‘पुंडलिक पांडुरंग, संतसंग पद्माळ। चंद्रभागा वाळवंट, भूवैकुंठ पंढरी। वेणुनाद गोपाळपूर, पुष्पावती सार संगम। निळा म्हणे झाला मेळा, या भूगोळा उद्धारी।’ पांडुरंग हा भावाचा भुकेला आहे. पंढरीपेठेत येणार्यास विठ्ठलाचं प्रेमसुख प्राप्त होतं.तिथेही भजन, कीर्तन, नामस्मरण याद्वारे भाविकांच्या मनात ईश्वरविषयक भावभक्तीचा विचार आणि आठव सतत जागवण्याचं कार्य केलं जातं. पंढरीत पुंडलिकाने पेरलेल्या विठ्ठलनामाच्या बीजाविषयी इतर संतांनीही प्रतिकात्मक विचार मांडले आहेत. त्याविषयीचं एक रुपक संतांच्या अभंगात पहायला मिळतं. बीज हे जमिनीतच पेरलं जातं. त्यावेळी जमिनीचा कसही महत्त्वाचा ठरतो. कसदार जमिनीत रोप पेरल्यानंतर बीजांकूर फुटून रोपटं तयार होतं. वाढल्यानंतर त्याचं पीक फोफावतं. भक्तीमार्गातही हीच क्रिया घडते. उत्तम जमिनीत उत्तम बीज पेरलं तर अमाप पीक येतं तसं विठ्ठलनामाचं बीज पेरलं तर त्यालाही ईश्वरदर्शनाची फळं येतात. सुख-आनंद यांची धनराशी तयार होते. संत सांगतात, देह ही ‘भूमी’ आहे. गुरुमंत्र हे ‘सबीज-नाम’ आहे. नामस्मरणाने येणारे अनुभव हे ‘पीक’ होय. संत म्हणतात, इथे नाम घ्या आणि अंत:करणातल्या भावविटेवर उभा असलेला आत्मविठ्ठल पहा. निळोबाराय सांगतात, ‘पुंडलिके पिकविले, विश्वा पुरले न्यावया’ इतके हे अमाप पीक आहे. निवृत्तीनाथ म्हणतात, ‘अनुभवाच्या गावी, नामबीज बहरते.’ ज्ञानदेव म्हणतात, ‘निवृत्तीनाथांनी मला हे नामबीज दिले.’ एकनाथ महाराज म्हणतात, ‘भूमी शोधूनी, बीज पेरिले’.

आपण विठ्ठलाचा विचार करतो तेव्हा हा पांडुरंग अन्य देवतेपेक्षा वेगळा कसा आहे, असा प्रश्न मनात येतो. पायावर मस्तक ठेवून स्पर्श दर्शन ही विशेषता फक्त पंढरीच्या विठ्ठलाकडेच असल्याने भाविक गाभार्याच्या आत ईश्वरसानिध्याचा सुखानुभव घेत असताना ‘देवा बोला हो माझ्याशी’ अशी आर्त हाक घालतात. हे परबह्म भाविकांवर कृपादृष्टी टाकतं आणि ‘दर्शन हेळामात्र तया होय मुक्ती’ या वचनानुसार दर्शनानेच भाविक मुक्तीप्राप्तीचा आनंद घेतो. खरं तर संत देवाकडे मुक्ती मागतच नाहीत. उलट, तुमच्या भक्तीसेवेसाठी आम्हाला पुन्हा जन्माला घालावं, असं तुकोबारायांचं अभंगवचन आहे. असा हा पंढरीचा सोहळा. या सोहळ्यात भक्त अंत:करणाची ओढ घेऊनआपादमस्तक विठ्ठलमय होऊन राहतात. त्यामुळेच ‘हा माझा लडीवाळ देव आहे. तो परब्रम्ह असला तरी बालकृष्ण आहे. मग याला ‘बांधा प्रेमदाव्यांनी’ असं नामदेव महाराजांनी गवळणीमध्ये म्हटलं आहे. त्यांनी ‘जन्मोजन्मी द्यावी तुमची चरण सेवा’ अशी प्रार्थना केली आहे. ‘लहान कोण, थोर कोण, कुणी घ्यावे पारखून। उच्चनीच नुरले काही, पांडुरंग सकलाठायी।’ असाच भाव सार्या वारकर्‍यांमध्ये दिसून येतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या