Sunday, April 19, 2026
Homeनाशिकआषाढीची भावदिंडी : भाग १४ - सोडू नये अपुले धैर्यबळ…

आषाढीची भावदिंडी : भाग १४ – सोडू नये अपुले धैर्यबळ…

नंदन रहाणे
जगाचे आणि जीवनाचे हेच वैशिष्ट्य आहे की ते एकरंगी नाही. शेकडो रंगांच्या हजारो छटा तर दिसतातच, पण त्यांच्या मिसळणीतून जी अगणित अनोळखी रंगद्रव्ये तयार होतात ती पण आपल्याला पाहायला मिळतात, तुम्हांला गुलाबी अथवा जांभळा रंग आवडतो म्हणून फक्त तोच नजरेसमोर येत राहील असे अजिबात होत नाही, लाल, पिवळा, हिरवा, निळा, तपकिरी, बदामी, राखाडी, काळा असे इतर रंगही तुम्हाला पाहावे लागतातच. भले सोनच आवडत असो तुम्हाला…. मग शेवंती, कण्हेरी, अबोली पाटल, कमळ, झेंडू, मोगरा ही व अशी अन्य फुलेही तुमच्यासमोर येणारच. द्राक्षे जर तुम्ही पसंत करीत असाल तर फक्त तीच काही तुमच्या वाट्याला येणार नाहीत… पेरू, केळी, बोरे, करवंदे, जांभळे, फणस, आंबे, अननस, चिकू, पपई पण पुढ्यात येणारच की! कधी कधी तर, जे आवडते ते कधीच मिळत नाही, भलतेच हातात येते असेही घडते… मग त्याचाही स्वीकार करणे भागच पडते! तुमची इच्छा असो वा नसो जीवन तुम्हाला कल्पनाही करता येणार नाही इतक्या वेगवेगळ्या वाटांवरून पुढे पुढे नेतच राहाते… आपण कोण आहोत ? कोठून आलो? पुढे कुठे जाणार? या प्रश्नांचा शोध माणूस ज्याप्रमाणे घेत असतो, त्याप्रमाणेच हे जीवन म्हणजे नेमके काय? त्यात हे इतके दुःख, वैफल्य, अपयश, व्यथावेदना का आहेत? आपल्याच वाट्याला त्या काय म्हणून येतात ? या प्रश्नांनीही माणूस यस्त असतो. त्यांची उत्तरे तो अनेक मार्गानी शोधतो… सुचतील ते किंवा सांगितले जातील तसे उपायही तो करू बघतो… पण या व अशा त्याची सुटका होता होतच नाही! माणसाच्या हाती असते फक्त काळाच्या बरोबर पुढे पुढे वाहात जाणे!… पण, मग जर हे असे सारे आहे, तर केवळ प्रवाहपतित न होता, खेद खंत करीत न जगता आयुष्याचे सार्थक कसे करावे हे संत सांगतात, विसोबा खेचर हे नामदेवरायांचे गुरू. ते काय उपदेश
करतात तो नीट समजून घ्या-
जे जे असेल प्रारब्धी।
तेन चुके कर्म कधी।
होणार त्यासारखी बुद्धी।
कर्मषा प्रगटे ।।१।।
नकळे पुढील होणार।
भूत वा भविष्य हा विचार।
कर्मधर्म तद‌नुसार।
भोगणे लागे सर्वथा ।।२।।
ऐसा लिहून गेला विधाता।
मग कासया करावी चिंता।
आपुलिया संचिता।
कर्म रेषा प्रमाण ।।३।।
काळ अनुकूल अथवा प्रतिकूल।
परि सोडू नये अपुले धैर्यबळ ।
अनाचारी मन केवळ ।
नये बाटवू सर्वथा ।।४।।
अखंड वाणी हरिस्मरणी ।
सुख विश्रांती कीर्तनी ।
खेचर विसोबा म्हणे प्राणी ।
मनुष्य देह दर्लभ ।। ५ ।।

गुरुवर्य विसोबा खेचर हे पांचाळ होते. म्हणजे त्यांचे दगड, लाकूड, लोखंड, तांबे-पितळ आणि सोने चांदी अशा पाचही माध्यमांवर प्रभुत्व होते. याचा अर्थ असा की घरे मंदिरे उभारण्यापासून रथ, पालख्या तयार करण्यापर्यंत व तलवार-कु-हाडी, डेगा पराती बनवण्यापासून ते दागिने घडवण्यापर्यंत सर्व प्रकारच्या कलाकौशल्यांमध्ये ते निपुण होते. शेकडो विद्यार्थ्यांना शैव-तत्वज्ञानाचे घडे देणारे गुरुकुलही ते चालवीत असत. औंढा नागनाथ येथे नामदेवांची त्यांच्याशी भेट झाली, तेव्हा त्यांचे वय १०० वर्षे पार करून पुढे गेलेले होते. त्यांनीच नामदेवरायांना ईश्वराच्या सर्वव्यापकत्वाचा साक्षात्कार घडवला. मात्र, नामदेवांसोबत तेही संतमंडळात सामील होऊन सोप्या सुलभ भक्तीचा प्रचार, प्रसार करू लागले हे त्यांचे मोठेपण….

असे प्रचंड आकलन असणारे, बहुमुखी प्रतिमेचे धनी संत विसोबा खेचर आपल्यासारख्या सामान्य संसारी माणसांना सांगतात की, बाबारे, जन्माला आलास ना… तर मग जे काही नशिबात असेल ते तुला भोगावेच लागेल. ते कोणालाच चुकणार नाही. जे घडायचे असते ते कळत नाही, मात्र माणसाची बुद्धी तशीच फिरत जाते व जसे त्याने कर्म केलेले असते, तसेच त्याला भोगावे लागते. ब्रह्मदेवच जर ती कर्माची रेषा लिहून जातो, तर मग आपण उगाच चिंता कशाला करावी? जीवन जगतांना कधी काळ अनुकूल असतो तर कधी प्रतिकूल… मात्र, आपण आपल्या धैर्यांचे बळ कधीही सोडू नये व अनाचाराच्या इच्छेने मनाला बाटवू नये. सतत हरीचे स्मरण करावे, मुखाने त्याचेच नाम घ्यावे आणि थकलेल्या जीवाला कीर्तनात रमवून विश्रांतीचे सुख मिळवावे. हा खेचर विसोबा तुला हेच सांगतोय प्राण्या, की हा मनुष्याचा देह अति दुर्लभ आहे. त्याचे सार्थक करून घे।

- Advertisement -

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्ह्यात बालविवाहाविरोधात प्रशासनाची मोठी कारवाई

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar बालविवाहासारख्या सामाजिक कुप्रथेला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एप्रिल 2025 ते मार्च 2026 या कालावधीत व्यापक कारवाई करत 155 प्रकरणांमध्ये हस्तक्षेप केला असून...