Friday, April 17, 2026
Homeब्रेकिंग न्यूजआषाढीची भावदिंडी : भाग १३ - वळीव ना वरुषे….

आषाढीची भावदिंडी : भाग १३ – वळीव ना वरुषे….

नंदन रहाणे

गेल्या 100 वर्षांत नद्यांवर आणि खाड्यांवर जिकडे तिकडे पूल झालेत. अगदी लहानसहान ओहोळ, नाले त्यावरही साकव बांधले गेलेत. मात्र, त्याआधी प्रवास करणे फारच अवघड होते. विशेषतः पावसाळा असला की सारेच वाहाव ओसंडून वाहात असायचे. धारांना तीव्र वेग आणि ओढही असायची. त्यात जागोजागी भोवरे, पाण्यात लपलेले खडक… यामुळे नावाडी पण नावा चालवायला तयार नसत. मग पाणी उतरेपर्यंत 4-8 दिवससुद्धा वाट पाहत तीरावर थांबून राहावे लागत असे. इतिहासातल्या अनेक मोहिमा नद्यांंनी उतार न दिल्याने लांबलेल्या आहेत. आपल्या महाराष्ट्रातल्या नद्यांची पात्रे तशी फारशी रूंद नाहीत मात्र उत्तर भारतातल्या नद्या फारच मोठ्या आहेत आणि पावसाळ्यात त्यांचे पाणीही पात्राबाहेर पडून मैलोनमैल पसरते. अशावेळी जनजीवन अस्ताव्यस्त होते. खेड्यापाड्यांचे, घरादारांचे नुकसानही होते. मात्र, होणारी हानी मुकाटपणे सोसण्याशिवाय गत्यंतरही नसतेच….

- Advertisement -

वारी हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा लोकोत्सव. तो पावसाळ्याच्या ऐन प्रारंभीच साजरा होतो. या पावसाळी वातावरणाचे काही तोटे आहेत; तसे काही फायदे पण आहेत, तापमान उतरून गारवा आल्याने, प्रवास तसा सुसह्य होतो. हवा आर्द्र झाल्याने कंठाला शोष लागत नाही. सारखी तहान लागत नाही. मार्गातल्या नद्यांना मार्गातल्या नद्यांना पाणी असल्याने शेकडो हजारो वारकर्‍यांची सोयही होते. या नद्या म्हणजे समाजाच्या जीवनरेखाच आहेत. त्यामुळे भारतीय संस्कृतीत त्यांना पूज्य मानले गेलेय. त्यांना देवी कल्पून, मूर्तीही घडवल्या गेल्या आहेत, हरिद्वार, काशी, प्रयागराज, मथुरा, उज्जैन, नाशिक, ओंकारेश्वर इत्यादी क्षेत्रीं नद्यांच्या आरतीचे सोहळेही होतात. आध्यात्मिक रचनांमध्ये ‘भवसागर’ हे जसे एक रुपक येते, तसेच ‘भवनदी’ ही कल्पनाही अनेकदा पदांमध्ये वापरली गेलीय. योगीराज चांगदेव यांनीपण तसा एक अभंग रचला आहे. मात्र, त्यातही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच त्यांनी चमत्कृती ओतली आहे.

ळीव ना वरुबे नई पूर आला।
कोरडिये नई जन हा बुडाला॥1॥
बुडतो तो काय, बोंबही न होये।
थडीयेचा थडी कवतुक पाहे॥2॥
बुडाला बुडाला ऐसे लोक म्हणती।
सेखी मात्र उडी कोणी न घालती॥3॥
मुक्ताई सांगडी बटेश्वर तारू।
सांगा सुखे उतरला पैलपारू॥4॥

वाघावर वाहन म्हणून बसणे, हातात नागाचा चाबूक धरणे, दर 100 वर्षांनी नवा देह धारण करून 1400 वर्षे जगणे अशा अद्भुत गोष्टींनी ज्यांच्या भोवती गूढतेचे दाट वलय आहे, त्या चांगदेवांचे हे शब्द. ते म्हणतात ना वळीव कोसळला, ना पावसाळा सुरु झाला… नदीला मात्र पूरही आला! बरं, आला तो आला, पण डोळ्यांना मात्र दिसेना ॥ आणि त्या कोरड्या नदीपात्रात तर उदंड जन बुडाले !!! पहा, कसे अजब, अतर्क्य लिहितात चांगदेव… ते संसारनदीचे वर्णन करताहेत. ही नदी कायम पुराने भरलेली असते. माणसे जितकी निघून जातात, त्यापेक्षा जास्त भर तिच्यात पडत असते. त्यांचा काही पाऊस पडताना दिसत नाही, ना अचानक लोकांचा लोंढा कुठून तरी येतो… संसार हा असार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पात्र सदैव कोरडेच भासते. त्यात माणसांची आयुष्येच्या आयुष्ये विरघळून जातात. म्हणजेच ती लोकं निरर्थकात बुडतात…

एवढे लोक बुडतात खरे, पण नाकातोंडात व्यवहाराचे पाणी जातांना ते आरडाओरडा ही करीत नाहीत की ‘वाचवा, वाचवा’ असेही म्हणत नाहीत. आपखुशीने संसारनदीत स्वतःला बुडू देतात. काठावर जे बसलेले असतात तेही खुशाल गंमत पाहात राहतात. माणूस दिसेनासा झाला की मग तेे, अरे हा बुडाला.. तो डुबला.. नाहीसा झाला म्हणतात… पण कोणीच कोणाला वाचवण्यासाठी नदीपात्रात उडी घेत नाही! अशा विचित्र भवनदीत ‘वटेश्वर’ नामक नौका आणि ‘मुक्ताई’ नावाची। सांगडी आहे । आणि त्यांच्या साह्याने हा चांगदेव मात्र सुखाने पैल-तीरावर पोचला आहे !!!

ताज्या बातम्या

Ahilyanagar : शालार्थ आयडी चौकशीसाठी नगरच्या शिक्षणाधिकार्‍यांना एसआयटीची नोटीस

0
नाशिक |प्रतिनिधी| Nashik जळगाव येथील बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यात विशेष तपास पथकाने (एसआयटी) जळगाव जिल्ह्यातील विद्यमान माध्यमिक शिक्षणाधिकारी तसेच तत्कालीन 11 शिक्षणाधिकार्‍यांसह एकूण 48 अधिकार्‍यांना...