मुंबई । Mumbai
महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा दिवस एका ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार ठरला. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अखेर राजकीय मतभेद बाजूला सारून आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी अधिकृत युतीची घोषणा केली. वरळीतील एका संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी ‘मराठी माणूस’ आणि ‘महाराष्ट्र धर्म’ टिकवण्यासाठी एकत्र येत असल्याची ग्वाही दिली. मात्र, या बहुचर्चित युतीवर भाजपने लागलीच खोचक शब्दांत टीका केली आहे.
भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि मंत्री आशिष शेलार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (ट्विटर) वर एक कविता पोस्ट करून ठाकरे बंधूंना डिवचले आहे. शेलारांनी आपल्या कवितेतून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना म्हटले की, “मातोश्रीवरील विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं होतं.” या काव्यमयी टीकेतून त्यांनी शिवसेनेच्या (UBT) अंतर्गत वर्तुळातील नेत्यांवर प्रहार करत, आता राजकारणात टिकण्यासाठी ही युती करावी लागल्याचे सुचवले आहे.
त्यांनी लिहिले की,
घेरलं होतं मातोश्रीवरील “विठ्ठलाला” बडव्यांनी..
तुमच्या मते, पक्षाचा ताबा घेतला होता चार कारकुनांनी…
एवढ्या मोठ्या संघटनेला संपवण्यात तुम्हाला व्हायचे नव्हते “भागीदार”
सगळ्या पदांचे राजीनामे देत भाषण केले होते खुमासदार !
आज तेच बडवे आणि तेच कारकून चालणार का?
त्यांच्यासोबत बेमालूमपणे भागीदार होणार का?
“लाव रे तो व्हिडीओ” असे आता मुंबईकर म्हणतील
तुमची जुनी भाषणे काढून आरसा समोर धरतील!
तुमचा चेहरा बघून तुम्हाला भीती नाही ना वाटणार?
एकत्र येऊन पालिकेची तिजोरी नाही ना लुटणार?
मुंबईकर गल्लोगल्लीत तुम्हाला विचारणार…
“नेमके कशासाठी झाला होतात त्यावेळी वेगळे?”
“नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?”




