नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिकमधील बहुचर्चित अशोककुमार एकनाथ खरात (Ashok Kharat Case) ऊर्फ कॅप्टन याच्या गुन्ह्यांच्या तपासात आता एक खळबळजनक वळण मिळाले आहे. गेल्या महिनाभरापासून विशेष तपास पथकाच्या कोठडीत (Custody) असलेल्या खरातचे धागेदोरे आता नाशिकमधील (Nashik) एका आलिशान हॉटेलपर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणात शिर्डीतील साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष आणि राजकीय पदाधिकारी शैलेश श्रीहरी कुटे यांच्याविरोधात गंभीर तक्रार प्राप्त झाली असून, एसआयटीने त्यांची मंगळवारी रात्री उशिरापर्यंत चौकशी केल्याने खळबळ उडाली आहे.
संशयित खरातवर नाशिक शहरात व आहिल्यानगरमध्ये महिला अत्याचार, खंडणी आणि सावकारीसह एकूण १७ गुन्हे दाखल आहेत. सध्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) दाखल असलेल्या लैंगिक अत्याचाराच्या पाचव्या गुन्ह्याचा तपास एसआयटी प्रमुख पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, एसआयटीला प्राप्त लेखी तक्रारीनुसार केलेल्या तपासात, खरात हा शहरातील एका आलिशान हॉटेलमध्ये वारंवार मुक्कामी असायचा. या हॉटेलचे मालक संशयित शैलेश कुटे आणि खरात यांच्यात नियमित संवाद असल्याचे चॅटिंगमधून स्पष्ट झाले आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : अशोक खरातची रवानगी न्यायालयीन कोठडीत; उद्या सहाव्या गुन्ह्यात पुन्हा कोर्टात हजर करणार, आजच्या सुनावणीत काय घडलं?
शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती आणि कळवणचे (Kalwan) किरणकुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कुटे यांची कसून चौकशी केली असून, त्यातून महत्त्वपूर्ण माहिती हाती लागल्याचे समजते. खरात आणि व्यावसायिक कुटे हे एकमेकांच्या नियमित संपर्कात होते, हे मोबाईलमधील तांत्रिक तपासात सिद्ध झाले आहे. प्राप्त लेखी तक्रार अर्जातील मुद्द्यांनुसार आता एसआयटी (SIT) सखोल तपास करत असून कुटे यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाणार आहे, असे समजते. आता कॅप्टन खरात आणि या बड्या व्यावसायिकाच्या मैत्रीतून कोणते काळे कारनामे उघड होतात, याकडे संपूर्ण नाशिकचे लक्ष लागले आहे.
२०२५ चे ‘ते प्रकरण आणि जुना वाद
हे हॉटेल आणि संबंधित व्यावसायिक वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०२५ मध्ये हनी ट्रॅपचा संशय व्यक्त करण्यात आला होता. तेव्हा गुन्हा दाखल नसल्याने चौकशी टळली होती. आता खरात प्रकरणामुळे पुन्हा एकदा जुन्या प्रकरणातील संशयाची सुई वळली आहे.
तपासाचे मुख्य मुद्दे
- खरात आणि कुटे यांच्यातील चॅटिंग नेमके कशा संदर्भात ?
- खरात हॉटेलमध्ये मुक्कामी असताना पीडितांनाही तिथे नेले जात होते का?
- खरातच्या कुकमांमध्ये हॉटेल व्यवस्थापन किंवा मालकाचा प्रत्यक्ष सहभाग आहे का?
- संशयित खरातला कायदेशीर किंवा आर्थिक मदत कुटे यांच्याकडून मिळाली आहे का?





