कोलंबो | Colombo
आशिया चषक २०२३ च्या सुपर-४ सामन्यात रविवारी (१० सप्टेंबर) रोजी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान या दोन बलाढ्य संघातील सामना रंगणार आहे. आशिया चषकात दुसऱ्यांदा हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघातील यापूर्वीचा समाना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे या सामन्यात पावसाची शक्यता लक्षात घेऊन मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
पावसाची शक्यता पाहता एशियन क्रिकेट काउंसीलने या सामन्यासाठी एक राखीव ठेवला आहे. आशिया कप २०२३ च्या सुपर ४ मध्ये फक्त एका सामन्यासाठीच राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील याआधीचा सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे भारत-पाकिस्तान सुपर फोर सामन्यासाठी आता राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त सुपर फोरच्या इतर कोणत्याही सामन्यासाठी राखीव दिवस नाही.
भारत-पाकिस्तान सामना रविवारी कोलंबोमध्ये होणार आहे. या सामन्यादरम्यान पावसाची ९० टक्के शक्यता आहे. हवामान स्वच्छ असेल तर सामना सहज होईल. थोडा वेळ पाऊस पडल्यास किंवा ओव्हर कट करून सामना पूर्ण करता आला तर हेही करता येईल. मात्र आणखी पाऊस पडल्यास सामना रद्द होईल. त्यानंतर सामना राखीव दिवशी पूर्ण करण्यात येईल.
टीम इंडिया सुपर फोरमध्ये तीन सामने खेळणार आहे. त्यांचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध आहे. यानंतर दुसरा सामना श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. हा सामना १२ सप्टेंबर रोजी कोलंबो येथे होणार आहे. यानंतर तिसरा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. हा सामना १५ सप्टेंबर रोजी कोलंबोमध्ये होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना १७ सप्टेंबर रोजी होणार आहे. हा सामनाही कोलंबोमध्ये होणार आहे.