दुबई | वृत्तसंस्था
आशिया चषकातील भारत विरुद्ध पाकिस्तानच्या क्रिकेटचा बहुचर्चित सामना आज दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळण्यात आला. भारतीय संघाची गोलंदाजी व अभिषेक शर्मा, आणि तिलक वर्माची तुफान फटकेबाजी व सुर्यकुमार यादवच्या नाबाद ४७ धावा यात पाकिस्तानी क्रिकेट संघ गारद झाला. भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानवर ७ गडी आणि २५ चेंडू राखून विजय मिळविला.
नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा क्रिकेट संघाचा कर्णधार सलमान अली आगाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सैम अयुब व एस. फरहान सलामीस फलंदाजीस आले. सामन्याच्या पहिल्याच षटकात हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर सलामीला आलेल्या सैम अयुबला जसप्रीत बूमराहने झेलचीत करत शून्य धाव संख्येवर तंबूत परत पाठविले. पाठोपाठ दुसऱ्या षटकात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर मोहम्मद हॅरिसला हार्दिक पंद्याने झेल बाद करत पाकिस्तानच्या संघास दुसरा धक्का दिला.मोहम्मद हॅरिसने पाच चेंडूत तीन धावा केल्या.तिसऱ्या षटका अखेर २ गडी बाद २० धावा अशी स्थिती पाकिस्तानच्या संघाची होती.
आठव्या षटकाच्या चौथ्या चेंडूत अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर तिलक वर्माने फखर झमानला झेल बाद केले. फखरने १५ चेंडूत १७ धावा केल्या.दहाव्या षटकात अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर अभिषेक शर्माने पाकिस्तानचा क्रिकेट संघाचा कर्णधार सलमान अली आगाला अवघ्या तीन धाव संख्येवर झेलबाद केले. तेराव्या षटकात कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर अक्षर पटेलने हसन नवाजला ५ धावांवर झेल बाद केले. पाठोपाठ कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर मोहम्मद नवाज शून्य धावसंख्येवर पायचीत झाला. सतराव्या षटकात कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर हार्दिक पंड्याने सलामीला आलेला एस फरहानला झेल बाद केले. एस फरहानने ४४ चेंडूत ४० धावा केल्या. अठराव्या षटकाच्या चौथ्या चेंडूत फहीम अश्रफ ११ धावा करत वरून चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. एकोणाविसाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूत जसप्रीत बुमराहने एस मुकीमला क्लीन बोल्ड करत १० धावांवर माघारी पाठविले. शाहीन आफ्रिदी ने १६ चेंडूत नाबाद ३३ धावा केल्या. २० व्या षटका अखेर पाकिस्तानच्या संघाने ९ गडी बाद १२७ धावा केल्या.
भारतीय संघाकडून अभिषेक शर्मा व शुभमन गिल सलामीस फलंदाजीस आले. सलामीला आलेल्या अभिषेक शर्माने पहिल्याच षटकात शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर तुफान फटकेबाजी करत ५ चेंडूत १२ धावा केल्या. सामन्याच्या दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूत एस अयुब कडून शुभमन गिल ७ चेंडूत १० धावा करत झेलचित झाला.सामन्याच्या चौथ्या षटकात एस अयुबच्या गोलंदाजीवर सलामीवीर अभिषेक शर्मा फहीम अश्रफ करवी झेल बाद झाला. अभिषेक शर्माने तुफान फटकेबाजी करत १३ चेंडूत ३१ धावा केल्या.
तिलक वर्मा व सुर्यकुमार यादवच्या जोडीने पाकिस्तान संघाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत असताना तेराव्या षटकात एस अयुबने तिलक वर्माला ३१ धावांवर बाद केले.शिवम दुबेने नाबाद १० धावा केल्या तर सुर्यकुमार यादवने ३७ चेंडूत ४७ नाबाद धावा करत पाकिस्तानच्या संघास नमविले.




