नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारताच्या हॉकी संघाने चीनचा पराभव करत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपदावर आपले नाव कोरले आहे. भारतीय संघाने उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली होती. तर, पाकिस्तानला हरवून चीनने फायनलमध्ये प्रवेश केला होता. आज भारताची चीनशी सामना होता. एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत बलाढ्य भारतीय संघाला चीनने तगडे आव्हान दिले. पण चौथ्या सत्रात भारतीय संघाने कमाल करत १-० ने आघाडी घेत पाचव्यांदा जेतेपद पटकावले. सलग दुसऱ्यांदा भारताने जेतेपद मिळवले आहे.
चीन विरुद्धच्या अंतिम सामन्यात तिसऱ्या क्वार्टरपर्यंत दोन्ही संघाला गोल करता आला नव्हता. सलामीच्या सामन्यात ज्या चीनला भारताने सहज मात दिली तो संघ एका वेगळ्या उद्देशाने खेळताना दिसला. भारतीय पुरुष हॉकी संघाने सुरुवातीला काही संधी निर्माण केल्या. पण चीनच्या गोलीने सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन करत भारताचे प्रयत्न अपयशी ठरवले. तिसऱ्या क्वार्टरपर्यंत एकाही संघाला गोल नोंदवता आला नाही. चौथ्या क्वार्टरमध्ये भारताकडून जुगराज सिंगने एक गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. चीनने अखेरच्या सेकंदापर्यंत गोल करण्याचा प्रयत्न केला पण भारतीय खेळाडूंनी कडवी झुंज देत विजय आपल्या नावे केला.
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जबरदस्त रोमांच पाहायला मिळाला. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या या सामन्यात पहिल्यांदाच फायनलमध्ये धडक देणाऱ्या चीननं भारताला झुंजवलं, पण हार मानेल तो भारतीय संघ कसला. एकजुटीचं बळ दाखवत भारतीय संघानं चीनला शेवटपर्यंत अक्षरशः लोळवले.
पॅरिसमधील ऑलिम्पिक स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा कांस्य पदक जिंकणारा आणि गत चॅम्पियन भारतीय संघ सुरुवातीपासूनच या स्पर्धेचा प्रबळ दावेदार होता. घरच्या मैदानात खेळणाऱ्या चीन विरुद्धच्या लढतीनंच भारताने या स्पर्धेतील विजयी मोहिमेला सुरुवात केली होती. यजमान चीन शिवाय भारतीय संघाने जपान, मलेशिया, मलेशिया, दक्षिण कोरिया आणि पाकिस्तान यांना पराभूत केले होते. साखळी फेरीनंतर उपांत्य फेरीत भारताने दक्षिण कोरियाला दुसऱ्यांदा मात देत अपराजित राहत फायनल गाठली. एवढेच नाही तर फायनल बाजीही मारली.
भारतीय हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४ मध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली आहे आणि अंतिम फेरीपर्यंत एकही सामना गमावलेला नाही. यंदाच्या टूर्नामेंटमध्ये अपराजित राहिलेल्या भारतीय हॉकी संघाने पाचव्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. यापूर्वी, भारताने २०११, २०१६, २०१८ (पाकिस्तानसह संयुक्त विजेते) आणि २०२३ मध्ये ट्रॉफी जिंकली होती.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा