Friday, November 22, 2024
HomeनगरAssembly Election 2024 : नगर दक्षिणेत अपक्ष देणार 'काँटे की टक्कर'

Assembly Election 2024 : नगर दक्षिणेत अपक्ष देणार ‘काँटे की टक्कर’

अहिल्यानगर । प्रतिनिधी

जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. अनेक तालुक्यात तिरंगी अथवा बहुरंगी होणार असल्याचे प्राथमिक चित्र आहे. दरम्यान, नगर दक्षिण जिल्ह्यात अनेक मतदारसंघात अपक्षांनी निवडणुकीत तगडे आव्हान निर्माण केले असून या निवडणुकीत काँटे की टक्कर देणार असल्याचे दिसत आहे. वाढलेली अपक्षांची संख्याही यंदाच्या विधानसभा निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत आठ अपक्ष उमेदवारांनी विधानसभेत विजय संपादन करत मुंबईला जाण्याची संधी मिळालेली आहे. यात १९५७ च्या विधानसभा निवडणुकीत ९ पैकी तब्बल ८ जागांवर अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला होता. हा तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसला मोठा धक्का होता. काँग्रेसचा फक्त एकच उमेदवार निवडून आला होता.

तत्पूर्वी १९५१ च्या निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व जागा काँग्रेसने पटकावल्या होत्या. १९५१ पासून आजपर्यंत जिल्ह्यातून २१ अपक्ष उमेदवारांना आमदारकीची लॉटरी लागली आहे. १९५७ चे आठ अपक्ष आणि पुढील निवडणुकांमध्ये १४ अपक्ष उमेदवारांना विधानसभेत जाण्याची संधी मिळाली. यात १९६२ बाळासाहेब नागवडे (अहमदनगर उत्तर नगर तालुका), १९६७ एम. ए. गाडे (शिर्डी), १९७२ बाबुराव भारस्कर (श्रीगोंदा), नारायणदास बार्शीकर (अहमदनगर दक्षिण-शहर), गणपत म्हस्के (पाथर्डी), शंकरराव कोल्हे (शिर्डी), १९७८ मारुती (दादापाटील) शेळके (अहमदनगर उत्तर), चंद्रभान घोगरे (शिर्डी), १९८५ प्रसाद तनपुरे (राहुरी), बाळासाहेब थोरात (संगमनेर), १९९० तुकाराम गडाख (शेवगाव), १९९५, १९९९ शिवाजी कर्डिले (अहमदनगर उत्तर-नगर तालुका) आणि २००४ बबनराव पाचपुते (श्रीगोंदा) या अपक्षानी जिल्ह्यात विजय संपादन केलेला आहे.

दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत नगर दक्षिणेत अनेक मतदारसंघांत अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत. या अपक्षांमुळे विधानसभा निवडणुकीतील रंगत वाढली असून अपक्षांमुळे प्रत्येक मतदारसंघातील उमेदवारांची संख्या दहापेक्षा अधिक आहे. विशेष करून श्रीगोंदा आणि श्रीरामपूर मतदारसंघात नोटासाठी स्वतंत्र मतदान यंत्र बसवावे लागणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या समोर अनेक इच्छुक उमेदवार सर्वांचीच अडचण झाली आहे. आपल्याला उमेदवारी मिळणार नसल्याचे लक्षात येताच अनेक इच्छुकांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली. यामुळे विधानसभा निवडणुकीत अपक्षांची गर्दी वाढली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या शह काटशहाच्या राजकारणात या अपक्षांना आपली लॉटरी लागणार असल्याचा विश्वास आल्याने त्यांनी देखील पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

ग्रामीण भागात आता धुराळाच !

नुकतीच दिवाळीची धामधूम कमी झाली असून आता विधानसभेची धामधूम वाढली आहे. यंदा सर्वच मतदारसंघांत मोठ्या संख्येने उमेदवार निवडणूक रिंगणात असून या सर्वांनी कोणत्याही परिस्थितीत विजय संपादन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ग्रामीण भागात नुसता धुराळाच सुरू आहे. काहीही करून मतदारांना गुंगवून ठेवण्यासाठी उमेदवार सध्या होऊन द्या खर्च, या भूमिकेत दिसत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या