Tuesday, October 22, 2024
Homeनगरउमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरु

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरु

सुट्ट्यांमुळे अर्ज भरण्यासाठी अवघे 6 दिवस || इच्छुकांकडून कागदपत्रांची जुळवाजुळव

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महाराष्ट्राच्या 15 व्या विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आज मंगळवार (दि.22) पासून सुरू होणार असून अर्ज भरण्याची मुदत 29 ऑक्टोबरला संपणार आहे. यामुळे यंदा विधानसभेसाठी अर्ज भरण्यासाठी मिळणार्‍या आठ दिवसांत दोन दिवस सुट्ट्या राहणार असून यामुळे उमेदवारी दाखल करण्यासाठी प्रत्यक्षात अवघ्या सहा दिवसांचा कालावधी मिळणार आहे. दरम्यान, 30 नोव्हेंबरला अर्जांची छाननी होणार आहे. तर अर्ज मागे घेण्याची मुदत 4 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, विविध पक्षांच्या इच्छुकांनी उमेदवारीसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली आहे. यंदाची विधानसभा निवडणूक चांगलीच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. सत्ताधारी महायुती विरोधात महाविकास आघाडीसह राज्यात ऐनवेळी तयार झालेली तिसरी आघाडी आणि अन्य लहानमोठ्या पक्षाच्या उमेदवार्‍यांमुळे नगर जिल्ह्यातील 12 मतदारसंघांत बहुरंगी लढती रंगणार असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात 12 मतदारसंघांत 37 लाख 60 हजार 512 मतदार असून 3 हजार 763 मतदान केंद्र आहेत. विधानसभा निवडणुकीची अधिसूचना आज जाहीर झाल्यानंतर उमेदवारी दाखल करणे, दाखल अर्जाची छाननी, माघार, प्रत्यक्षात मतदान तसेच त्यानंतर मतमोजणी प्रक्रिया होणार आहे.

जिल्ह्यात 18 ते 19 हजार कर्मचार्‍यांसह दहा टक्के राखीव कर्मचारी यांची नेमणूक करण्यात येणार आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवाराला 40 लाख रूपयांची खर्चाची मर्यादा ठरवून दिलेली आहे. तसेच उमेदवारी अर्ज दाखल करणार्‍या खुले प्रवर्गातील उमेदवारांसाठी दहा हजार रूपये तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी पाच हजार रूपये अनामत रक्कम राहणार आहे. जिल्ह्यात विधानसभेच्या 12 मतदारसंघातील मतदान प्रक्रियेसाठी 8 हजार 531 बीयु, 4 हजार 779 सीयु, 5 हजार 155 व्हीव्हीपॅट उपलब्ध झाले आहेत. जिल्हा पातळीवर या यंत्राचे रॅन्डेमायझेन करून ते मतदारसंघनिहाय लवकरच पाठवण्यात येणार आहेत. दरम्यान, आजपासून उमेदवारी दाखल करण्यासाठी मुदत असून सकाळी 11 ते दुपारी 3 यावेळी इच्छुकांना अवघ्या पाच समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.

अर्ज भरण्यासाठी गुरुपुष्यामृतला गर्दी होण्याची शक्यता

विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत असली, तरी गुरुपुष्यामृतचा मुहूर्त साधण्यासाठी बहुतांश मतदारसंघांत 24 ऑक्टोबर रोजीच अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडण्याची शक्यता आहे. यंदा अर्ज दाखल करण्यासाठी सात दिवसांचा अवधी आहे. यापैकी 26 चा शनिवार आणि 27 ऑक्टोबरचा रविवार वगळता पाच दिवस अर्ज भरता येणार आहेत. विशेष म्हणजे सर्व दिवस शुभ आहेत. अर्ज माघारीसाठी मात्र दिवाळीनंतरच पडद्यामागच्या हालचालींना वेग येणार आहे. जिल्ह्यात विधानसभेचे 12 मतदारसंघ आहेत. या दहाही मतदारसंघांत प्रमुख पक्षांसह काही अपक्षही मोठ्या प्रमाणात रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. निवडणूक मग कोणतीही असली तरी स्पर्धेतील उमेदवारांकडून अर्ज भरताना चांगल्या मुहूर्ताची वाट बघितली जाते. चांगला दिवस, त्या दिवसातील चांगली वेळ याचे गणित बघूनच अर्ज भरला जाण्याची परंपरा आहे. 24 ऑक्टोबर रोजी गुरुपुष्यामृत आहे. हा दिवस शुभ मानला जातो, त्यामुळेच याच दिवशी अर्ज भरण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात गर्दी होण्याची शक्यता आहे. 24 ऑक्टोबरशिवाय 28 व 29 ऑक्टोबर हे दिवसही चांगले आहेत. 28 ऑक्टोबरला वसुबारसने दिवाळीच्या पर्वाला सुरुवात होते, तर 29 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी आहे. या दोन्हीही दिवशी अर्ज मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे. या उमेदवारी अर्जांची छाननी 30 ऑक्टोबरला आहे. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी म्हणजे 1 नोव्हेंबरपासून दिवाळी सुरू होत आहे. 2 नोव्हेंबरला (शनिवार) पाडवा, तर 3 नोव्हेंबरला (रविवार) भाऊबीजेची शासकीय सुट्टी असणार आहे. त्यामुळे या दोन दिवसांत अर्ज माघारीची शासकीय प्रक्रिया नसेल. मात्र, 4 नोव्हेंबरला अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशीच प्रत्येक मतदारसंघांत माघारीच्या घडामोडींना वेग येणार आहे.

असे आहेत निवडणूक टप्पे
निवडणुकीचं नोटिफिकेशन : आज 22 ऑक्टोबर
अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 29 ऑक्टोबर
अर्जांची तपासणी : 30 ऑक्टोबर 2024
अर्ज मागे घेण्याची तारीख : 4 नोव्हेंबर
मतदान : 20 नोव्हेंबर 2024
मतमोजणी : 23 नोव्हेंबर 2024

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या