अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
विधानसभा निवडणुकीत मतमोजणीनंतर ईव्हीएम मशिनची पडताळणी करण्यासाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना आज मंगळवारी (दि. 21) जिल्हाधिकारी कार्यालयात मतदान यंत्राच्या तपासणी प्रक्रियेबाबत माहिती देण्यात येणार आहे. ही माहिती दिल्यानंतरही समाधान न होणार्या उमेदवार यांच्या मागणीनुसार ईव्हीएम मशीनच्या मेमरीची पडताळणी करण्यात येणार आहे. दरम्यान, ईव्हीएम मशिनच्या पडताळणीसाठी जिल्ह्यात सर्वाधिक दहा उमेदवारांनी अनामत रक्कम भरली होती. त्यातील पाच उमेदवारांनी माघार घेतली आहे.
विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर 2024 रोजी झाली. निवडणुकीतील दुसर्या आणि तिसर्या क्रमांकावरील उमेदवारांना ईव्हीएम मशिन पडताळणीचा विशेष अधिकार निवडणूक आयोगाने दिला आहे. एका मशिनच्या पडताळणीसाठी 47 हजार 200 रूपये शुल्क आहे. हे शुल्क भरण्यासाठी मुदत दिलेली आहे. राज्य निवडणूक आयोगाने पुणे येथील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय प्रबोधिनीमध्ये 13 जानेवारी रोजी राज्यातील जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तसेच निवडणूक शाखेतील अन्य महत्वाचे अधिकार्यांना प्रशिक्षण दिले आहे. त्यानुसार पडताळणीची मागणी करणार्या उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींन आज जिल्हाधिकारी कार्यालयात कशा पध्दतीने ईव्हीएम मशीनची पडताळीची प्रक्रिया करण्यात येणार याबाबत तोंडी माहिती देण्यात येणार आहे.
यात समाधान होणार्या आणि पडताळणीतून माघार घेणार्या उमेदवारांचे अर्ज घेण्यात येवून त्यांचे पडताळणीचे शुल्क परत करण्यात येणार आहे. तर पडताळणीच्या निर्णयावर ठाम राहणार्यांच्या मागणीनुसार मतदान यंत्रणाची पडताळणीसाठी पुढील प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाच्या सुत्रांच्यावतीने सांगण्यात आले. ईव्हीएम पडताळणी पूर्णच पाच उमेदवारांनी या प्रक्रियेतून माघार घेतली आहे. त्यामध्ये संदीप वर्पे (कोपरगाव), प्राजक्त तनपुरे (राहुरी), बाळासाहेब थोरात (संगमनेर), प्रभावती घोगरे (राहाता), अभिषेक कळमकर (अहमदनगर शहर) या उमेदवारांचा समावेश आहे. प्रा. राम शिंदे (जामखेड-कर्जत), अॅड. प्रताप ढाकणे (पाथर्डी-शेवगाव), राणी लंके (पारनेर), राहुल जगताप (श्रीगोंदे) आणि शंकरराव गडाख (नेवासा) या पाच उमेदवार या प्रक्रियेत आहेत.