अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात 151 उमेदवारांनी निवडणुक लढवली होती. त्यांनी सोमवारी (23 डिसेंबर) अंतिम निवडणूक खर्च निवडणूक आयोगाला सादर केला. यामध्ये सर्वाधिक 30 लाख 9 हजार 230 रूपयांचा खर्च शिर्डी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. यानंतर दुसर्या क्रमांकावर अहमदनगर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार संग्राम जगताप आहे. त्यांनी 29 लाख 73 हजार 268 एवढा खर्च केला आहे. तर तिसर्या क्रमांकावर श्रीरामपूर मतदारसंघातील काँग्रसचे उमेदवार हेमंत ओगले असून त्यांनी 28 लाख 93 हजार 448 रूपये खर्च केला आहे.
निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक खर्चासाठी 40 लाखांची मर्यादा दिली होती. जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघांतून 151 उमेदवार निवडणुकीत होते. उमेदवारांनी अर्ज दाखल केलेल्या तारखेपासूनच खर्चाच्या सर्व नोंदी ठेवणे बंधनकारक होते. उमेदवारांना खर्चाच्या नोंदीसाठी एक स्वतंत्र बँक खाते उघडावे लागले. या खात्यातूनच खर्च करावा लागत होता. उमेदवाराने आयोजित केलेल्या मिरवणुका, प्रचार सभा या कार्यक्रमांचे आयोगाच्या वतीने चित्रीकरण केले जात होते. खर्च निरीक्षकांच्या समक्ष उमेदवारांच्या खर्चाची तपासणी व पडताळणी करण्यात आली. उमेदवारी अर्ज ते मतदान या दरम्यानच्या काळात ही प्रक्रिया राबविण्यात आली. दरम्यान, त्यानंतर अंतिम खर्च तपासणीस 18 डिसेंबरपासून सुरूवात झाली होती. त्यासाठी केंद्रिय निवडणूक आयोगाचे निवडणूक खर्च निरीक्षक देवांशी विश्वास, अरूण चौधरी आणि जयंतकुमार यांची नियुक्ती केली होती. निकाल जाहीर झाल्याचे 30 दिवसांत सर्व उमेदवारांचा खर्च फायनल करण्यात आला आहे.
विधानसभा मतदार संघनिहाय उमेदवारांचे नाव व खर्च पुढील प्रमाणे : अकोले – किरण लहामटे (28,74,488), अमित भांगरे (25,74,377), वैभव पिचड (24,69,605), संगमनेर – अमोल खताळ (23,57,460), बाळासाहेब थोरात (28,31,467), शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील (30,09,230), प्रभावती घोगरे (18,80,780), कोपरगाव – अशुतोष काळे (24,01,235), संदीप वर्पे (19,22,006), श्रीरामपूर – लहू कानडे (27,97,887), भाऊसाहेब कांबळे (15,42,328), हेमंत ओगले (28,93,448), पाथर्डी – मोनिका राजळे (20,04,161), प्रताप ढाकणे (20,48,152), चंद्रशेखर घुले (13,60,576), हर्षदा काकडे (19,11,272), राहुरी – शिवाजी कर्डिले (26,59,769), प्राजक्त तनपुरे (26,32,533), पारनेर – काशिनाथ दाते (22,77,599), राणी लंके (12,08,530), अहमदनगर शहर – संग्राम जगताप (29,73,268), अभिषेक कळमकर (17,91,125), श्रीगोंदा – विक्रम पाचपुते (14,17,647), राहुल जगताप (15,80,622), अनुराधा नागवडे (16,62,100), अण्णासाहेब शेलार (7,94,740), कर्जत-जामखेड – रोहित पवार (24,12,024), राम शिंदे (22,22,113), नेवासा – विठ्ठल लंघे (24,34,554), शंकरराव गडाख (18,60,292), बाळासाहेब मुरकुटे (17,71,906).