Sunday, November 24, 2024
Homeनगरनगर शहरात महायुती पाठोपाठ महाआघाडीत रस्सीखेच

नगर शहरात महायुती पाठोपाठ महाआघाडीत रस्सीखेच

सर्व पक्षांकडून विधानसभेसाठी दबावाचे राजकारण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे गुर्‍हाळ संपण्याचे चिन्हे नसताना आता विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तापलेल्या वातावरणावर नगर शहरात अनेकजण हातोडा मारण्याच्या तयारीत आहेत. महायुतीत असणारे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे विद्यामान आमदार संग्राम जगताप याठिकाणी प्रतिनिधीत्व करत असताना भाजपकडून स्थानिक नेत्यांसह थेट बीडवरून पंकजा मुंडे यांना नगर शहरातून लढण्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. यासह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उबाठाकडून देखील या मतदारसंघाची मागणी केल्याने याठिकाणी उमेदवारीसाठी चांगलीच रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली असून निवडणुकीत महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांचा पराभव करत महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके विजयी झाले. लंके यांच्या विजयाने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या तरी आनंदाचे वातावरण आहे. येत्या तीन महिन्यांत म्हणजेच सप्टेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने मतदारयादीचा कार्यक्रम सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे राजकीय पक्षांसह निवडणूक यंत्रणा सावध झाली असून विधानसभेची तयारी सुरू करण्यात आली आहे. यामुळे येणार्‍या काही महिन्यांत नगर शहरात सर्व राजकीय पक्षांकडून मोठे शक्तीप्रदर्शन होणार आहे. नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व सध्या आ. जगताप करत आहेत.

सध्या ते राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत आहेत. महायुतीमध्ये नगर शहर विधानसभा मतदासंघाची जागा राष्ट्रवादीचे अजित पवार यांनाच जाईल असे बोलले जात आहे. असे असले तरी भाजपसह शिवसेना शिंदे गटातील अनेकांची विधानसभा लढविण्याची इच्छा असल्याचे दिसून येत आहे. भाजपाकडून अ‍ॅड. अभय आगरकर, भैय्या गंधे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांची नावे चर्चेत आहेत. तर अभय आगरकर यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना नगर शहरातून उमेदवारी करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे महायुतीचा घटक असणारे शिवसेना शिंदे गटाकडून जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, शहर प्रमुख दिलीप सातपुते यांना विधानसभा निवडणुकीची आस आहे. तर विरोधात असणार्‍या महाविकास आघाडीमध्ये उध्दव ठाकरे गटाकडून जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे, दिवंगत अनिल राठोड यांचे चिरंजीव विक्रम राठोड, शहर प्रमुख संभाजी कदम यांची नावे चर्चिले जात आहेत. काँग्रेसकडून शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी प्रबळ दावा सांगितला आहे. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी तयारी चालविली आहे.

या मतदारसंघात 25 वर्षे शिवसेनेचे वर्चस्व होते. स्व. राठोड यांनी येथून 25 वर्षे प्रतिनिधीत्व केले. चार वेळा महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला. 2019 च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे 26 नगरसेवक निवडून आले. गत विधानभा निवडणुकीत राठोड यांचा निसटत्या पराभवास सामोरे जावे लागले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी, शिवसैनिकांनी एक दिलाने काम करून महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या विजयासाठी मोठे परिश्रम घेतले. लंके यांच्या विजयात शिवसेनेचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे विधानसभेला नगर शहर मतदारसंघाची जागा शिवसेना ठाकरे गटाला देण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. यामुळे नगर शहरात महायुतीसोबत महाविकास आघाडीमधून उमेदवारांची संख्या वाढताना दिसत आहे. यात ऐनवेळी जागा वाटपात नगर शहर कोणाच्या गळाला लागणार यावर निवडणुकीच्या निकालाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

एक गठ्ठा मतदानावर सर्वांचाच डोळा
नगर शहरात लोकसभा निवडणुकीत काही विशिष्ठ भागातून महाविकास आघाडीचे उमेदवार लंके यांना एक गठ्ठा मतदान झाले. या मतदानामुळे भाजपचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांची मोठी पिछेहाट झाल्याचे मतमोजणीची आकडेवारी सांगते. यामुळे आतापासून त्या एक गठ्ठा मतदारांवर सर्वपक्षांचा डोळा असला तरी हे एक गठ्ठा मतदार कोणाला कौल देणार यावर नगर शहर विधानसभेचा निकाल अवलंबून राहणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या