अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरोधात महाविकास आघाडी असा सामना दिसत असला तरी प्रत्यक्षात निवडणुकीत अनेक लहान-मोठ्या पक्षांसह अपक्ष मोठ्या संख्येने निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. याचा अनुभव पहिल्या दिवशीच्या उमेदवारी अर्ज विक्रीतून आला आहे. पहिल्या दिवशी जिल्ह्यातील 12 मतदारसंघांत 196 व्यक्तींनी स्वत: साठी अथवा आपल्या नेत्यांसाठी 376 उमेदवारी अर्ज विकत नेलेले आहेत. यात सर्वाधिक अर्जाची विक्री श्रीरामपूर मतदारसंघात 24 व्यक्तींनी 56 अर्ज नेले आहेत. ही संख्या सर्वाधिक आहे. 39 व्यक्तींनी कोपरगाव मतदारसंघातून उमेदवारी अर्ज विकत नेलेले आहेत.
दरम्यान, पहिल्याच दिवशी शेवगाव तालुक्यातून 3 आणि कर्जत- जामखेड तालुक्यातून 1 असे दोन मतदारसंघांतून 4 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी काल मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या 29 तारखेपर्यंत इच्छुकांना उमेदवारी अर्ज विकत नेऊन दाखल करता येणार आहेत. पहिल्या दिवशी जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांतून मोठ्या संख्येने उमेदवारी अर्जाची विक्री झालेली आहे. यामुळे यंदा मोठ्या संखेने विधानसभेसाठी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात महायुतीच्या भाजप आणि अजित पवार गटाचे उमेदवार वगळता उर्वरित महाविकास आघाडीच्या प्रमुख उमेदवारांची घोषणा झालेेली नाही. मात्र, त्या आधीच मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल होत असल्याने यंदा विधानसभेसाठी इच्छुक चांगलाच भाव खाणार असल्याचे दिसत आहे.
मंगळवारी अकोले मतदारसंघात 8 व्यक्तींनी 8 अर्ज नेले आहेत. कर्जत-जामखेडमध्ये 9 व्यक्तींनी 18 अर्ज, श्रीगोंदा मतदारसंघात 19 व्यक्तींनी 35 अर्ज, कोपरगावमध्ये 27 व्यक्तींनी 39 अर्ज, पारनेरमध्ये 8 व्यक्तींनी 19 अर्ज, श्रीरामपूर मतदारसंघात 24 व्यक्तींनी 56अर्ज, संगमनेरमध्ये 11 व्यक्तींनी 25 अर्ज, शिर्डीत 14 व्यक्तींनी 23 अर्ज, नेवासा 20 व्यक्तींनी 41 अर्ज, शेवगाव-पाथर्डीत 18 व्यक्तींनी 46 अर्ज, राहुरी मतदारसंघात 20 व्यक्तींनी 29 अर्ज आणि नगर शहरात 18 व्यक्तींनी 37 उमेदवारी अर्ज नेलेले आहेत. यासह पहिल्याच दिवशी शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात 3 आणि कर्जत-जामखेड मतदारसंघात 1 असे चार उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत.
अफवांचे पिक
उमेदवारी दाखल करण्यास सुरूवात झाली असून सध्या जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात विविध राजकीय अफवांचे पिकच दिसत आहे. यांनी महाविकास आघाडीला सोडले, ते महायुतीच्या संपर्कात आहेत, अशी विविध चर्चा मंगळवारी झडतांना दिसत होत्या. दुसरीकडे सर्वच मतदारसंघात मोठ्या बंदोबस्तात उमेदवारी अर्जांची विक्री सुरू झाली. यावेळी एकाच वेळी पाचच लोकांना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षाकडे सोडण्यात आले.
27 तारखेला पहिले प्रशिक्षण
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. निवडणुकीदरम्यान आवश्यक कामांसोबत मतदान प्रक्रिया पारपाडण्यासाठी 21 हजार कर्मचारी- अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचार्यांना निवडणुकीसाठी आवश्यक असणारे पहिले प्रशिक्षण हे 27 तारखेला देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 12 मतदारसंघात वेेगवेगळ्या ठिकाणी हे प्रशिक्षण पारपडणार आहे.