शेवगाव/पारनेर |तालुका प्रतिनिधी| Shevgav| Parner
उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून उमेदवारांनी आतापर्यंत केलेल्या खर्चविषयक पहिल्या तपासणीत प्रमुख उमेदवारांच्या खर्चात तफावत आढळली असून सर्वच उमेदवारांनी खर्चातील तफावत मान्य केली आहे. खर्च निरीक्षक यांनी उमेदवारांच्या खर्चात ही तफावत नोंदवली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील 12 मतदारसंघांतील उमेदवारांकडून करण्यात येणार्या खर्चावर निवडणूक यंत्रणेची करडी नजर असल्याचे दिसत आहे.
रविवारी झालेल्या खर्च तपासणीच्या बैठकीला उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पारनेर मतदारसंघात राणी लंके व काशिनाथ दाते यांनी सादर केलेल्या खर्चात कोणतीही तफावत आढळलेली नाही. शेवगाव मतदारसंघात मोनिका राजळे यांनी सादर केलेल्या खर्चात 55 हजार 657 रुपयांची तफावत आढळली आहे. प्रताप ढाकणे यांनी सादर केलेल्या खर्चात 115 रुपयांची तफावत आढळली. चंद्रशेखर घुले यांनी सादर केलेल्या खर्चात 140 रुपये तफावत आढळली आहे. नगर शहर मतदारसंघात संग्राम जगताप यांनी सादर केलेल्या खर्चात, तसेच अभिषेक कळमकर यांनी सादर केलेल्या खर्चात तफावत आढळून आली.