Friday, November 1, 2024
Homeनगरनाव एक, अनेक उमेदवार; कुणाचा होणार गेम?

नाव एक, अनेक उमेदवार; कुणाचा होणार गेम?

नाम साधर्म्यामुळे मतदारांची फसगत होण्याची शक्यता || प्रमुख पक्ष आणि उमेदवारांची वाढली डोकेदुखी

अहिल्यानगर | Ahilyanagar

राज्यातील विविध विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्यानंतर अनेक मतदारसंघांमध्ये एकाच नावाचे अनेक उमेदवार दिसून येत आहेत. मोठ्या पक्षांच्या नेत्यांच्या नावाशी साधर्म्य असलेली नावं असल्याने मतदारांमध्ये गोंधळ वाढण्याची शक्यता आहे. तर इकडे या नाम साधर्म्यामुळे फटका आपल्याला बसतो की काय या शंकेने प्रमुख पक्ष आणि उमेदवारांची चिंता वाढली आहे. या उमेदवारांनी माघार न घेतल्यास काही मतदारसंघात निकालावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या ‘सेम टू सेम’ उमेदवारांना माघार घेण्यासाठी प्रमुख नेते व उमेदवारांनी त्यांची मनधरणी सुरू केली आहे. नावातील या साधर्म्याचा फटका उमेदवारांनी किती बसणार हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल. परंतु अटीतटीच्या लढतीत प्रतिस्पर्धी उमेदवारास पराभूत करण्यासाठी ही चाल अनेकांची डोकेदुखी ठरू लागली आहे.

- Advertisement -

पुण्यातील पर्वतीमध्ये महायुतीकडून भाजपच्या माधुरी मिसाळ निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अश्विनी नितीन कदम यांना उमदेवारी दिली आहे. अश्विनी नितीन कदम या सिंहगड रस्त्यावर राहतात. जनता वसाहत येथील अश्विनी अनिल कदम यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.
पुण्यातील वडगावशेरीत अजित पवार गटाचे सुनिल टिंगरे विरुद्ध शरद पवार गटाचे बापू पठारे लढतायत. इथं नगर जिल्ह्यातल्या श्रीगोंद्यातील बापू पठारे नावाच्या दुसर्‍या व्यक्तीनं अपक्ष अर्ज भरलाय. नाशिकच्या नांदगावात महायुतीचे उमेदवार सुहास कांदे यांची चिंता वाढली आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला असताना आता आणखी एका सुहास कांदेंची एन्ट्री झाली आहे.

नाशिक पूर्व मध्ये गणेश बबन गिते हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत. तर गणेश बबन गिते यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. माढा विधानसभेत शरद पवार गटाच्या अभिजीत पाटलांविरोधातही तब्बल 4 अभिजीत पाटील नावाचे वेगवेगळे उमेदवार उभे राहिले आहेत. चारपैकी एक अभिजीत पाटीलनं बहुजन समाज पार्टीकडून तर इतर तिघांनी अपक्ष उमेदवारी दाखल केलीय. दुसरीकडे अपक्ष लढणार्‍या बबन शिंदेंचे पुत्र रणजीत शिंदेंविरोधातही 2 इतर अपक्ष रणजीत शिंदेंनी अर्ज केलाय. इंदापूर मतदारसंघांमध्ये हर्षवर्धन पाटील या नावाने तब्बल तिघांनी उमेदवारी दाखल केली आहे. यामध्ये हर्षवर्धन शहाजीराव पाटील (रा.बावडा ता.इंदापूर जि.पुणे) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून उमेदवारी दाखल केलीय. तर हर्षवर्धन गोपाळराव पाटील (रा.एकशिव ता.माळशिरस जि.सोलापूर ) आणि हर्षवर्धन श्रीपती पाटील (रा.निमगांव केतकी ता.इंदापूर जि.पुणे) या दोघांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.

यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसकडून दत्तात्रय विठोबा भरणे (रा.भरणेवाडी ता.इंदापूर जि.पुणे) हे मैदानात आहेत. तर दत्तात्रय सोनबा भरणे (रा.विठ्ठलवाडी ता.शिरुर जि.पुणे) यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. म्हणजे इंदापूर विधानसभेत दत्तात्रय भरणे या नावाने दोघांनी उमेदवारी दाखल केली आहे. जळगावातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात एकाच नावाचे तीन-तीन उमेदवार आहेत. शरद पवार गटाकडून रोहिणी एकनाथ खडसे यांच्या नावात साधार्म्य असेलेले रोहिणी गोकुळ खडसे (रा. बाभूळगाव, जिल्हा अकोला) व रोहिणी पंडित खडसे (रा. मालेगाव) तीन रोहिणी खडसे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून उभे असलेले चंद्रकांत निंबाजी पाटील यांच्या नावाचे साधर्म्य असलेले चंद्रकांत चुडामण पाटील,आणि चंद्रकांत शिवाजी पाटील असे दोन उमेदवार रिंगणार आहेत.

बांद्रा पूर्वेत अजित पवार गटाचे उमेदवार जिशान सिद्धीकींच्या नावाशी साधर्म्य असलेला मोहम्मद झिशान सिद्दीकी नावाचा व्यक्ती अपक्ष उभा राहिलाय. करमाळा विधानसभेत महायुती पुरस्कृत अपक्ष उमेदवार संजय शिंदेंविरोधात इतर 3 संजय शिंदे नावाच्या अपक्षांनी अर्ज केलेत. चारही अर्ज वैध ठरल्यामुळे मतदारांना ईव्हीएम मशीनवर चार उमेदवार हे संजय शिंदे नावाचे दिसणार आहेत. हे चारही अर्ज वैध (मंजूर) झालेले आहेत. विशेष म्हणजे 2019 च्या निवडणुकीतही अपक्ष संजय शिंदेंविरोधात 3 संजय शिंदे उमेदवार होते. त्यामुळे निवडून आल्यानंतर मूळ संजय शिंदेंनी आपलं नाव बदलून ते संजयमामा शिंदे असं करून घेतलं. त्यामुळे आता ईव्हीएम मशीनमध्ये एक नाव संजयमामा शिंदे तर इतर 3 उमेदवार संजय शिंदे म्हणून असतील.

रत्नागिरीच्या दापोलीत मविआच्या संजय कदमांविरोधात दोन संजय कदम अपक्ष आहेत. महायुतीच्या योगेश कदमांच्या मतदारसंघातही दोन इतर योगेश कदम अपक्ष चिपळूणमध्ये महायुतीच्या शेखर निकमांसमोर एक शेखऱ निकम अपक्ष तर मविआच्या प्रशांत यादवांविरोधातही एक अपक्ष प्रशांत यादवनं अर्ज भरलाय. एकाच नावाचे अनेक उमेदवार निवडणुकीत उतरवण्याची परंपरा रायगडकरांनी कायम राखली आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघात तीन बाळराम पाटील, तीन प्रशांत ठाकूर नावाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. आमदार प्रशांत ठाकूर हे भाजपचे तर मुळचे शेकापचे असलेले बाळाराम पाटील शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवार आहेत. कर्जत विधानसभा मतदारसंघातून आमदार महेंद्र थोरवे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत. त्यांच्या नावाशी साधर्म्य असलेला आणखी एक अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहे. उरण मतदारसंघातून शेकापचे प्रीतम म्हात्रे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या नावाशी साधर्म्य असलेले दोन अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

मनोहर भोईर हे शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार आहेत. त्यांच्याशिवाय आणखी एक मनोहर भोईर नावाचा उमेदवार निवडणूक लढवत आहे. अलिबाग विधानसभा मतदारसंघात महेंद्र दळवी नावाचे चार, तर दिलीप भोईर नावाचे दोन उमेदवार निवडणूक लढवत आहेत. आमदार महेंद्र दळवी हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत. कल्याण पूर्व विधानसभेसाठी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश दशरथ गायकवाड यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. महेश गायकवाड यांनी भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या विरोधात बंडखोरी केली आहे.तर त्याच्या नावाशी साधर्म्य असलेले दुसरे महेश प्रकाश गायकवाड यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

सातारा जिल्ह्यातीलच कोरेगाव विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांना या ठिकाणी पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. त्यांचे नाम साधर्म्य असलेल्या एका अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार महेश शिंदे आणि त्यांचे नामसाधर्म्य असलेल्या आणखी दोघांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. औरंगाबाद-सिल्लोड विधानसभा मतदारसंघ सुरेश बनकर (उद्धव ठाकरे गट), सुरेश बनकर (अपक्ष)
औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघ-राजू शिंदे (उद्धव ठाकरे गट), राजू शिंदे (अपक्ष) नागपूर जिल्ह्यातील काटोल हा माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांचा 1995 पासूनचा मतदारसंघ असून यावेळी मात्र ते निवडणूक रिंगणात नाहीत. त्यांच्या ऐवजी त्यांचा मुलगा सलील देशमुख शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने उमेदवार आहे. असे असले तरी काटोल मतदारसंघांत आणखी एका अनिल देशमुख यांनी नामांकन अर्ज दाखल केला आहे.

माजी गृहमंत्री अनिल वसंतराव देशमुख यांच्या नावाप्रमाणे नाव असलेले अनिल शंकरराव देशमुख हे नरखेड तालुक्यातील थुगाव (निपाणी) येथील रहिवासी आहेत. अमरावतीच्या तिवसा विधानसभेत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर विरुद्ध भाजपचे राजेश वानखडे यांच्यात थेट लढत होणार आहे. ही स्थिती असतानाच दोन अपक्ष असलेल्या राजेश वानखडे नावाच्या उमेदवारांनी देखील आपलं नामांकन दाखल केलं आहे. त्यामुळे भाजपचे अधिकृत उमेदवार राजेश वानखडे यांची चांगलीच डोकेदुखी वाढणार असल्याचे चित्र पाहायला मिळतेय. राजेश श्रीराम वानखडे – भाजप , राजेश बळीराम वानखडे – अपक्ष
राजेश रामदास वानखडे – अपक्ष.अशा तीन एकाच नावाच्या उमेदवारांनी तिवसा विधानसभेतून नामांकन अर्ज दाखल केलाय. सांगलीमध्ये दिवंगत काँग्रेस नेते माजी मंत्री मदनभाऊ पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील या अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या नावाचे दोन उमेदवार उभे आहेत.

अहिल्यानगरमधील कर्जत जामखेड मतदार संघामध्ये नावांमध्ये साम्य असलेले सहा उमेदवार आहेत.राम शंकर शिंदे भाजप, राम प्रभू शिंदे अपक्ष, राम नारायण शिंदे अपक्ष. रोहित राजेंद्र पवार (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष), रोहित चंद्रकांत पवार (अपक्ष), रोहित सुरेश पवार (अपक्ष)

हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या संतोष टारफे यांच्याविरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. संतोष विरुद्ध संतोष अशी लढत असणार्‍या या मतदारसंघात आणखी दोन संतोष टार्फे नावाच्या उमेदवारांनी देखील अपक्ष म्हणून नामांकन अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमधून शिवसेना ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार संतोष टारफे यांची चांगलीच डोकेदुखी वाढणार असल्याचं दिसून येत आहे. संतोष कौतिका टार्फे (शिवसेना ठाकरे गट अधिकृत उमेदवार), टार्फे संतोष लक्ष्मण (अपक्ष ), टार्फे संतोष अंबादास (अपक्ष)

गंगाखेड विधानसभामध्ये विशाल कदम हे शिवसेनेचे (उबाठा गटाचे) प्रमुख उमेदवार असून त्यांची थेट लढत रासपचे प्रमुख उमेदवार रत्नाकर गुट्टे यांच्याशी होणार आहे. तर आणखी दोन विशाल कदम नावाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. विशेष म्हणजे हे दोघेही अपक्ष उमेदवार आहेत.

चष्मा, दाढी, मिशीही सेम टू सेम
तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित आर आर पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात भाजपमधून अजित पवार गटामध्ये आलेल्या माजी खासदार संजय पाटील आहेत. मात्र, रोहित पाटील यांच्या विरोधात रोहित पाटील नावाचे तीन उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे एक नाव असलेले चार रोहित पाटील तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. विशेष म्हणजे या चौघांचे फोटो सारखेच भासतात. चष्म्याच्या फे्रमही सेम टू सेम आहेत. एवढेच नव्हेतर दाढी आणि मिशांहीची चेहरापट्टीची सारखीच आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या