Friday, November 22, 2024
Homeनगरनिवडणुकीच्या आचारसंहितेचा कापसाच्या बाजार भावावर परिणाम

निवडणुकीच्या आचारसंहितेचा कापसाच्या बाजार भावावर परिणाम

देवळाली प्रवरा |वार्ताहर|Deolali Pravara

सध्या सुरु असलेल्या कापूस पिकाच्या बाजारभावाला आचारसंहितेने कोलदांडा घातला आहे. त्यामुळे पांढरे सोने काळवंडले आहे. सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र सुरू आहे. त्यामुळे आचारसंहिता ही पाळली जात आहे. अनेक ठिकाणी गाड्यांची तपासणी होऊन बेहिशोबी रकमा सापडल्याने कापूस व्यापार्‍यांनी याचा धसका घेतला आहे. व्यापारासाठी पैसे आणायचे कसे? हा प्रश्न त्यांना सतावित असल्याने शेतकर्‍यांचा माल उधारीवर घेतला जात आहे. पैसे दोन दिवसांनी थोडे – थोडे करुन दिले जात आहेत. याचा कापसाच्या भावावर परिणाम झाला आहे. परिणामी यामध्ये शेतकरी भरडला जात आहे.

- Advertisement -

यंदा सुरुवातीला दुष्काळ पडण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे शेतकर्‍यांनी कमी पाण्याचे पीक म्हणून कपाशी पिकाची निवड केली. परिणामी तालुक्यात विक्रमी कपाशी पिकाची लागवड झाली. पुढे पाऊस वेळेवर पडला आणि दुष्काळाचे सावट दूर झाले. कपाशी पिकाला पोषक वातावरण मिळाले. कपाशीचे पीक जोमात आले. बहरलेलं पीक बघून बळीराजाचं मनं भरुन आलं. कपाशीला कापूस मोठ्याप्रमाणात लागला आणि पुन्हा एकदा पावसाने दणका दिला. अनेक शेतकर्‍यांचा कापूस भिजला तर काहींच्या वाती झाल्या. आठवडाभराच्या अंतरावर तालुकाभर कपाशीची लागवड झाल्याने कापूस काढणीही सर्वत्र एकाच वेळी आली. त्यातच दिवाळीचा सण तोंडावर आला. बघता-बघता मजूरांचा तूटवडा निर्माण होऊ लागला. शेतकर्‍यांच्या तोंडच पाणी पळाले. तरी देखील मजूर मिळत नसल्याने अनेक शेतकर्‍यांचा कापूस शेतातच गळून पडण्याच्या अवस्थेत सापडला आहे. ज्या शेतकर्‍यांनी कापसाची वेचणी करुन कापूस विक्रीला नेला असता पावसाने भिजल्याचे कारण पुढे करुन व्यापार्‍यांनी सहा हजार रुपये क्विंटलने कापूस खरेदी करुन अक्षरशः शेतकर्‍यांची लूट केली. त्यात दोन किलोची घट वेगळीच.

यंदा कापसाला शासनाने 7 हजार 521 रुपये हमी भाव जाहीर केला. परंतु या भावाने कुठेच कापूस खरेदी दिसत नाही. शासनाची खरेदीकेंद्र कुठेच नाही. उलट सर्वत्र खाजगी कापूस खरेदी केंद्राचा सुळसुळाट झाला आहे. हे खाजगी खरेदीदार शेतकर्‍यांची मोठ्याप्रमाणात लूटमार करीत आहेत. परंतु, निवडणुकीच्या रणधुमाळीत यांच्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही. याचा नेमका फायदा या लोकांनी उचलून आपले उखळ पांढरे करून घेण्याचा सपाटा लावल्याने पांढरे सोने काळे पडले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आजही कापूस सात हजार रुपये भावाने खरेदी केला जात असल्याने शासनाच्या हमीभावापर्यंत अजूनही कापूस पोहचला नसल्याने शेतकर्‍यांची घोर निराशा झाली असून शेतकर्‍यांना कापसाचे भाव भविष्यात वाढण्याची शक्यता वाटत असल्याने कापूस तसाच शेतकर्‍यांच्या घरात पडून असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.

कपाशी पिकाला सुरवातीपासून शेवटपर्यंत एकूण सुमारे 27 ते 30 हजारा पर्यंत एकरी खर्च येतो या मध्ये पाणी भरण्याचा खर्च धरलेला नाही. एकरी साधारणपणे दहा क्विंटल कापूस धरला तर सात हजार प्रमाणे 70 हजार रुपये.त्यातून वेचणीचे गेले. आधिक मेहनतीचे तिस हजार गेले. एकूण 37 ते 40 हजार गेले. खाली फक्त 25 ते 30 हजार रुपये सहा महिन्यात राहीले.त्यासाठी अवघे कुटुंब राबले.सांगा काय महीना उत्पन्न मिळाले ?

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या