Friday, November 22, 2024
Homeनगरविधानसभा निवडणूक प्रक्रिया मुक्त, निर्भय वातावरणात पार पाडावी

विधानसभा निवडणूक प्रक्रिया मुक्त, निर्भय वातावरणात पार पाडावी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

निवडणूक प्रक्रिया निर्भय आणि मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकारी- कर्मचारी यांनी त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदार्‍या अत्यंत संवेदनशीलपणे पार पाडत समन्वयाने काम करण्याच्या सूचना निवडणूक खर्च निरीक्षक ग्यानचंद जैन यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात खर्च पथकातील अधिकारी, कर्मचार्‍यांसोबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी राजू लाकुडजोडे उपस्थित होते. जैन म्हणाले, भारतीय लोकशाहीला जगात महत्व आहे.

- Advertisement -

देशामध्ये आतापर्यंत झालेल्या निवडणुका मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडल्या गेल्या. भारतीय लोकशाहीला अधिक मजबूत करण्यासाठी अधिकारी, कर्मचार्‍यांनी एकसंघपणे तसेच जबाबदारीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवाराला 40 लक्ष रुपयांपर्यंत खर्च करण्याची मुभा आहे. उमेदवाराच्या प्रत्येक खर्चावर बारकाईने नजर ठेवावी. ईएसएमएस प्रणालीचा प्रभावीपणे वापर करत अवैध मद्य, रोकड वाहतुकीवर स्थापन करण्यात आलेल्या विविध पथकांनी करडी नजर ठेवावी.

निवडणूक लढविणार्‍या उमेदवाराचा प्रत्येक खर्च नोंद होईल, यादृष्टीने सर्व पथकांनी काम करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. बैठकीस निवडणूक खर्च निरीक्षणासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, जैन यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या माध्यम कक्षास भेट देऊन माहिती घेतली. त्यांनी माध्यम कक्षाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.

खर्च निरीक्षकांच्या नियुक्त्या
विधानसभेच्या 12 मतदार संघासाठी निवडणूक खर्च निरीक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. देबशीष बिस्वास (आय.आर.एस.) यांची अकोले, संगमनेर, शिर्डी व कोपरगाव विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे संपर्क अधिकारी म्हणून अपर प्रवरा सब डिव्हीजनचे सहायक अभियंता प्रमोद माने असणार आहेत. अरुण चौधरी (आय.आर.एस. सी अँड सीई) यांची श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव व राहुरी विधानसभा मतदार संघासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे संपर्क अधिकारी म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक रोहित निरगुडे असणार आहेत. ग्यानचंद जैन (आय.आर.एस. सी अँड सीई) यांची पारनेर, अहमदनगर, श्रीगोंदा व कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्ती करण्यात आहे. त्यांचे संपर्क अधिकारी म्हणून पाणी पुरवठा विभागाचे सहायक शिवम दापकर असणार आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या